महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवमुक्तीच्या
लढ्यातील जागतिक नेतृत्व. माणसाला माणूसपण मिळवून देणारा,आपल्या तत्वाशी प्रामाणिक
असणारा प्रसंगी गांधीलाही नडणारा नेता म्हणजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांची प्रेरणा
घेऊन अनेक नेते निर्माण झाले.परंतु सध्यस्थितीत चित्र जरा 'विचित्र' दिसत आहे. त्या
काळी एक नेता आणि लाखो कार्यकर्ते होते. सामाजिक
कार्य करण्यासाठी आता तर गलोगल्ली अनेक सामाजिक संस्था आणि त्यांचे नेते निर्माण झाले
आहेत. आमच्या प्रत्येक घरात आता नेता निर्माण झाला आहे.’ नेते जास्त आणि कार्यकर्ते
कमी’ अशी परिस्थिती झाली आहे.
सामाजिक कार्य, चळवळ करतोय असं म्हणणं आता 'स्टेटस' ठरत आहे. जगातील विद्वान नेत्याचे अनुयायी आणि आजचे नेते
खरंच विद्वान म्हणण्या इतपत आहेत का? विद्वान वगैरे खूप लांबच्या गोष्टी झाल्या. ते
शिक्षित तरी आहेत का? आज आमचे नेते कोण आहेत?
पांढरे कपडे घालून, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हातात सोन्याचे कडे, आलिशान गाड्या,
फ्लेक्सवर मोठाले फोटो. शिक्षणाचा गंध नसणाऱ्या आमच्या नेत्यांचे फोटो जागतिक कीर्तीच्या
प्रकांडपंडित असणाऱ्या बाबासाहेबांसोबत आहेत.' शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणणाऱ्या'
प्रज्ञासुर्याचे 'आजचे वाघ' शाळेत कोणत्या इयत्तेत शिकले असतील याचा थांगपत्ताही लागत
नाही. पोटापाण्यासाठी त्यांना खूप कष्टही करावे
लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमविण्याचे मार्ग त्यांना माहित झाले आहेत. आलिशान गाड्या,मोठाल्या माङया, 'शाळा शिकून काय दिवा लावणार बे' असं म्हणून टाळकी गोळा करून ग्रुप स्थापन करून यांचं सामाजिक
काम सुरु आहे. सामाजिक काम करत असताना समाजाचे नेमके प्रश्न काय आहेत याचा कोणताही
गंध नेत्यालाही नाही आणि त्याच्या कार्यकर्त्यालाही नाही. एखाद्या ठिकाणी देणगी, फळेवाटप, कपडेवाटप करणे यालाच
सामाजिक कार्य समजलं जात आहे. सध्याच्या युगाची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे याचा
कोणताही गंध आधुनिक नेत्यांना नाही. जागतिकीकरणाने नवे प्रश्न निर्माण केले आहेत. शिक्षणाचे
खाजगीकरण झाले आहे. नोकऱ्यांचे कंत्राटीकरण झाले आहे. या सगळ्यामध्ये आमचा आजचा युवक
भरडून निघत आहे. मोठमोठ्या शिक्षणसंस्थेमध्ये तो शिक्षण घेऊ शकतो काय? त्याला शिकून
नोकरी भेटत आहे काय? जातीव्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती अधिकाधिक घट्ट का होत आहे. या
सर्व प्रश्नांवर विचारमंथन करणारे किती नेते समाजात आहेत? समाजाच्या उध्दाराचा कृतियुक्त
कार्यक्रम किती 'दादा ,अण्णा, भाऊ' यांच्याकडे आहे?
एखाद्या ठिकाणी डोनेशन देऊन, कपडे, फळे
वाटप करून, रक्तदान करून पोरांना शिक्षण मिळणार नाही, नोकऱ्या मिळणार नाहीत. खरी गरज
शिक्षण घेऊन मोक्याच्या जागा पटकावण्याची आहे.
डोनेशन देऊन, कपडे, फळे वाटप करून, रक्तदान करून पेपरात तुमचा फोटो येईल, चार
ओळीची बातमी येईल, तुमच्या नेते पणाला अजून रुबाब येईल पण यात समाजाचा काय फायदा? वाढदिवसाला
गर्दी करून, रस्ते अडवून डीजे लावून केक कापून समाजातील पोरांना शिक्षण मिळणार नाही,
त्यांना नोकऱ्याही मिळणार नाही आणि नाही जातव्यवस्था उध्वस्त होईल.
तुमच्या नेतेगिरीला आमचा विरोध नाही. तुम्ही खूप मोठे व्हा. पण तुमच्या सोबत समाजाला
सुद्धा मोठं करा. तुमच्या नेतेगिरीला दिशा द्या. कारण तरुणांची आदर्शाची संकल्पना बदलत चाललेली आहे. खाऊ
पिऊ घालणारा, राडा करणारा, दारू,बिर्याणी देणारा 'दादा,अण्णा,भाऊ' हाच खरा नेता अशी
त्यांची धारणा झाली आहे. त्यामुळे शिक्षण सोडून वेगळ्या मार्गाने हा तरुण भरकटत आहे.
खाणं पिणं, राडा हा तात्पुरता असतो. त्यातून कसल्याही प्रश्नाची उकल होत नाही.खऱ्या
नेत्याला समाजाच्या, युवकांच्या, महिलांच्या
प्रश्नांची जाण असते. ते प्रश्न सभागृहात, कायदेमंडळात किंवा शासनाच्या विविध
टप्प्यावर जो मांडतो आणि आपल्या कौशल्याने सोडवून घेतो तोच खरा
नेता. 'दादा,अण्णा,भाऊ' यांना सत्तेसाठी स्वार्थी
नेत्यांनी 'व्होट बँक ' साठी मोठं केलं आहे. 'दादा,अण्णा,भाऊ' यांना आशीर्वाद देऊन स्वतःच्या वाटेतील इतर काटे
दूर करण्यासाठी वापर केला जातो. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला कार्यभाग साधला जातो. आणि वेळ आल्यावर सहज पणे 'दादा,अण्णा,भाऊ' याना कुठेतरी अडकवून अलगद बाजूला
करून नव्या 'दादा,अण्णा,भाऊ' यांना जन्म दिला
जातो. त्याचं पालन पोषण केलं जात. (संजय दत्त याचा 'वास्तव' चित्रपट यावर योग्य भाष्य करतो.) यांच्या नेतेपणावर
शिक्कामोर्तब करण्यामध्ये अज्ञानी समाजाचा जितका महत्वाचा रोल आहे त्यापेक्षा जास्त
महत्वाचा रोल ' शिकलेल्या लोकांच्या अकार्यक्षमतेचा' आहे.
चार पुस्तके शिकून नेतेगिरी करणारे सुद्धा आहेत.
पण त्यांच्या कार्यकक्षा मर्यादित आहेत. पदोन्नती,वेतनवाढ,पेन्शन या प्रश्नातच तो गुरफुटून
गेला आहे. 'अति शिकलेला आणि जास्त हुकलेला' वर्ग मोठा आहे. तो स्वतःला 'सो कोल्ड' समजतो.
बंगल्यात रहायला आलेल्या या वर्गाने स्वतःला १/२ बीएचके मध्ये बंदिस्त करून घेतले आहे.
त्यांच्या जाणिवा नेणिवा सुद्धा कैद झाल्या आहेत.
यांची पोर-पोरी मोठ्या शाळा ,कॉलेजात शिकतात. मोठं मोठ्या कार्यालयात, बँकेत,
आयटी कंपनीमध्ये काम करून गलेलठ्ठ पगार घेतात. मॉल मध्ये खरेदी करतात. वीक एन्ड एन्जॉय
करतात. पण बाबासाहेब, फुले शाहू यांची नावंही
यांना माहित नाहीत. कधी समाजाच्या कार्यक्रमात,
जयंतीमध्ये दिसत नाहीत. चार चौघात 'जय भीम' म्हणण्याची लाज वाटते. झोपडपट्टीतील आपल्या
बांधवांसाठी आपल्या ज्ञानाचा,पदाचा काही तरी उपयोग करावा असं यांच्या मनात कधीच येत
आहेत. पांढरपेशा वर्ग म्हणून हा मिरवत आहे.
समाजाला आर्थिक ताकद यांना पुरवता येईल पण हा वर्ग मश्गुल आहे स्वतःच्याच सुखात.
समाजात विचारवंत म्हणून मिरवणाऱ्या आमच्या मार्गदर्शक
नेत्यांची वैचारिक भाषा सामान्य समाजबांधवाला समजत नाही. विचारवंत खूप शिकले आहेत.
ते इतके शिकले आहेत की स्वतःला बाबासाहेबापेक्षाही मोठे समजू लागले आहेत. विचारवंत
'अति विचार' करतात त्यामुळे ते इतरांना तुच्छ समजतात. छोट्या कार्यकर्त्यांना यांच्याकडून
कसलाच मान मिळत नाही. त्यामुळे समाजाची आणि विचारवंतांची नाळ तुटते. प्रत्येकाला स्वतःचा
विचार महान वाटत असल्याने दोन विचारवंतांच पटत नाही. त्यामुळे दोन चार विचारवंतांना
एकाच विचारपीठावर आणताना सामान्य कार्यकर्त्याची किती दमछाक होते हे जवळून पाहिले आहे. विचारवंतांची निष्ठासुद्धा कुणाच्या तरी चरणी असल्या
कारणाने वेळ आल्यावर राजकीय, सामाजिक भूमिका घेतली जात नाही. काही जणांना नोकरी जाईल
या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे शिकलेल्या बुद्धिजीवी वर्गाकडून समाजासाठी भरीव असं
काम झालं नाही आणि नेतृत्वही मिळालं नाही.
टीव्ही, वर्तमानपत्रात किंवा व्हॉटस अप विद्यापीठाच्या
विविध विचारमंचावर आम्हांला आमचे खूप नेते निर्माण झालेले दिसत असतील पण बांधवानो खुश
होऊ नका कारण वामनदादांच्या शब्दांत सांगायचे झाले तर
' नेतेगिरीचा छंद आहे,
काम भीमाचे बंद आहे '

No comments:
Post a Comment