तथागत गौतम बुद्धाची
ओळख करून देताना
ती शांतिदूत म्हणूनच
करून दिली
जाते. पण जगातील तो
पहिला क्रांतिकारक होता
हे मात्र आम्ही
विसरून जातो. होय तथागत
गौतम बुद्ध क्रांतिकारक
होते. त्यांचे विचार,
त्यांचा धम्म हा
क्रांतीच्या विचारांचा आहे. बुरसटलेल्या
विचारांना, प्रथांना येथे
मुळीच स्थान नाही.
त्यामुळेच तर मानवमुक्तीचा लढा
उभारणाऱ्या बाबासाहेबांनी तथागताला शांतिदूतापेक्षा क्रांतीदूत
म्हणूनच गुरुचे स्थान दिले.
इतिहासाच्या पानांवर नजर
फिरवल्यावर सारं काही
समजून येईल. हडप्पा
संस्कृतीनंतर आली ती वैदिक
संस्कृती. ज्या संस्कृतीने
माणसामाणसांत भेद
निर्माण केला. विषमतेचे बीज
या भूमीत पेरले.
जातव्यवस्था, वर्णव्यवस्था निर्माण केली. परमेश्वर,आत्मा या काल्पनिक
गोष्टी निर्माण करून मोक्ष
प्राप्तीचे भूत लोकांच्या
मानगुटीवर जे बसविले
ते आजपर्यंत उतरायला
तयार नाही. अंधश्रद्धा,
पुनर्जन्म वगैरे मध्ये माणूस गुरफटून गेला.
हडप्पा संस्कृतीमध्ये एकही मंदिर
नव्हते. कोणताही देव नव्हता.
मात्र वैदिक काळात
अनेक देव निर्माण
झाले. माणसाची जात
त्याच्या कर्माऐवजी त्याच्या जन्मानुसार
ठरू लागली. माणूस
गुलाम झाला. स्त्री,
शूद्र यांचे सामाजिक
स्थान धुळीस मिळाले.
अश्या संस्कृतीला आव्हान
देणारा पहिला क्रांतिकारक म्हणजे
सिद्धार्थ गौतम बुद्ध.
त्याने वैदिक संस्कृतीच्या छाताडावर
बसून तिला मातीत
लोळविले अन माणसाला
माणूसपण मिळवून दिले.
बुद्ध जगातील पहिला
धर्म संस्थापक होता
ज्याने परमेश्वर नाकारला. चमत्कार
नाकारला. आत्मा वगैरे गोष्टींना
थारा दिला नाही. धर्माच्या
इतिहासात ही एक
प्रकारची क्रांतीच होती. बुद्ध कोणत्याही तात्विक चर्चेच्या जाळयात
अडकून बसला नाही.
त्याने वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. जातीपातीचा विचार
न करता सगळ्यांनाच
आपल्या धम्मात प्रवेश दिला.
स्त्रियांना आपल्या संघात प्रवेश
देऊन पुरुषांच्या बरोबरीचा
दर्जा दिला. तत्कालीन समाज जीवनात
ही क्रांतिकारी गोष्ट
ठरली. लोकांना सन्मानाचे
जीवन बौद्ध धम्मात
मिळू लागले त्यामुळे
ते बुद्धाचे अनुयायी
बनू लागले. जनमानसात
बुद्ध धम्माचे आकर्षण
निर्माण झाले. त्याचा वेगाने
प्रसारही झाला. बुद्धाचे
व्यक्तीमत्व आणि धर्मप्रसारासाठीची
त्यांची पद्धत यामुळे देशाच्या
कानाकोपऱ्यात हा धम्म
झपाट्याने पसरला. दुष्ट प्रवृतींशी
भलेपणाने आणि द्वेषाबरोबर
प्रेमाने वागणारा बुद्ध अलौकिकच
म्हणावा लागेल. विनोद, चातुर्य,
हजरजबाबीपणा यांचा प्रयोग करून
बुद्ध प्रतिस्पर्ध्याला
पेचात पकडत असे.
तथागत आपला धम्म
लोकांना अगदी समजणाऱ्या
भाषेत ते समजावून
सांगत असत. कोणतीही भीती नव्हती.
कर्मकांड नव्हते. पूजाविधी नव्हते.
अगदी निराळा असा
धम्म बुद्धाने लोकांना
दिला.
वैदिक संस्कृतीला हा
फार मोठा धक्का
होता. कारण एकप्रकारे
त्याचे दुकानच बंद होणार
होते. त्यामुळे कसंही
करून त्यांना बुद्ध
धम्माचा समूळ नष्ट
करायचा होता. बुद्धाच्या निर्वाणानंतर
वैदिकांना फार मोठे
बळ मिळाले. बुद्धाच्या शिकवणुकीबाबत वाद
निर्माण करण्यात आले. महायान,
हीनयान हे पंथ
त्यातूनच निर्माण झाले. वैदिक
संस्कृतीच्या प्रभावातूनच महायान निर्माण
झाला. आणि तोच
नंतर जगभर पसरत
गेला. महामानवाचा
पराभव करायचा असेल तर
त्याच्या बरोबर उलट विचार
लोकांत पेरायचा आणि लोकांना
तसे आचरण करायला
लावायचे ही पद्धत
वैदिक लोकांनी बुद्धासाठी
वापरली. मी
माणूस आहे. मला
ईश्वर, प्रेषित मानू नका
असे सांगणाऱ्या बुद्धालाच
महायान लोकांनी देव केला.
त्याची पूजा - अर्चा सुरु
केली. मांडी घालून ध्यानमग्न अवस्थेत
त्याला कैद करून
टाकले. जगाकडे
उघड्या डोळ्यांनी बघायला शिकवणाऱ्या
बुद्धाचेच डोळे बंद
केले गेले. आम्ही
सुद्धा तोच बुद्ध
स्वीकारला. "अत्त दीप
भव " हा संदेश
आम्ही केवळ पोपटासारखा
पाठ केला. त्याचा
अर्थ कधीच समजून
घेतला नाही.
बाबासाहेबांना धर्मांतराच्या वेळेस एक प्रश्न
विचारण्यात आला होता
की, " तुम्ही नेमका कोणता
बुद्ध स्वीकारत आहात?
महायान की हीनयान?
" बाबासाहेबांनी
उत्तर दिले माझा
बुद्धधम्म 'नवयान
' आहे. बुद्धाची
शिकवण होती- मी जे
म्हणतोय ते तुम्ही
स्वीकारलेच पाहिजे असं काही
नाही. तुमच्या बुद्धीच्या
तर्कावर तपासूनच त्याचा स्वीकार
करा. बाबासाहेबांनी
दिलेला खरा बुद्ध
अजून तरी आम्ही
स्वीकारला आहे असे
म्हणता येणार नाही. कारण
आम्ही लोकांनी बुद्धाला वैदिक
संस्कृतीच्या चौकटीत अडकवून ठेवले
आहे. खरा बुद्ध
खूपच क्रांतिकारी आहे.
अतिशय डेंजर आहे.
तो तुमच्या बुद्धीला
चालना देतो. आंधळेपणा
पेक्षा तो तुम्हांला
तर्क करायला सांगतो.
कोणत्याही गोष्टीचा (विचार,
माणूस , धर्म देव,किंवा एखादी वस्तू
) स्वीकार करण्यापूर्वी त्याच्या गुणवत्तेबाबाबत चर्चा
करूनच निर्णय घ्या
असे बुद्ध आम्हाला
सांगतो. आम्हाला मात्र हे
माहीतच नाही. ज्यांना माहित
आहे त्यांची अवस्था
पोपटासारखी झाली आहे.
पाठ तर सगळा
बुद्ध आहे मात्र
वर्तणुकीत आणण्यात अडचण आहे.
केवळ त्रिशरण पंचशील
डोळे बंद करून
म्हटल्याने तुम्ही खरे बौद्ध
होणार आहात काय
? वर्तनाचे काय ? बंधुभाव, मैत्रीभाव
आम्ही समाजात निर्माण
करीत आहोत काय?
पाली भाषेतील वेगवेगळ्या
गाथा रोज विहारात
म्हटल्याने तुम्ही फार मोठे
बुद्धिस्ट होणार नाही. कारण
त्या किती गाथांचा
अर्थ तुम्हांला माहित
आहे हे सर्वात
महत्वाचे आहे. का
आम्ही पण भट
ज्या प्रमाणे संस्कृत
मधील श्लोक म्हणतो
व बाकीच्यांनी केवळ
भक्तिभावाने हात जोडून
बसायचे असेच वर्तन
करीत रहायचे? हे बुद्धाला
तरी हे अपेक्षित
होते का? कारण
त्या काळात लोकभाषा
पाली होती. वैदिक
धर्म प्रसारक संस्कृतचा
आधार घेऊन लोकांना
मानसिक गुलाम करीत होते
अश्या वेळेस गौतम
बुद्धाने स्वतःचा धर्म संस्कृत
भाषेत न सांगता
लोकभाषेत म्हणजेच पाली भाषेत
सांगितला. त्याचा तोच उपदेश
गाथांच्या माध्यमातून पुढे चालत
आला आहे. पण
आज पाली भाषा
बहुसंख्य लोकांना समजत नाही
त्यामुळे धम्माचा उपदेश लोकभाषेत
करणे गरजेचे आहे
पण ते होत
नाही. विधी म्हणणारे
काय म्हणत आहे
हे लोकांना समजत
नाही. ते केवळ
हात जोडून बसून
राहतात. त्यात विधी लावणारा
पाली गाथेचा मराठीत
अर्थही सांगत नाही. त्यामुळे
आमचा बुद्ध केवळ
पूजा अर्चनेसाठी राहिला
आहे. वर्तणुकीतला बुद्ध
कधीच लुप्त झाला
आहे.
बुद्धाचा धम्म हा
पाठांतराचा नसून तो
आचरणाचा आहे हेच
आम्ही मुळात विसरत
चाललो आहोत. त्यामुळे
डोळे उघडे असणारा,
चालणार बुद्ध आम्हाला पटत
नाही. विहारात सगळ्या
लोकांसोबत म्हणायचं म्हणून "बुद्धम
सरणम गच्छामि " म्हणायचं.
घरात चोरून देवही
पुजायचा. आषाढी एकादशी धरायची.
नवरात्रीत उपवास करायचा. हे
सगळं सुरु आहे
कारण आम्हांला बुद्धचं
कळाला नाही. ज्या
बुद्धाने अंधश्रद्धा नाकारली त्याच
बुद्धाची मूर्ती अमुक दिशेला
तोंड करून ठेवा
असे सल्ले दिले
जातात. आणि ती
तशी ठेवलीही जाते. राम,
कृष्ण,शंकर जाऊन
त्यांच्या जागी आम्ही
बुद्धाला बसविले आहे. बाकी
उपासना, अंधश्रद्धा तश्याच गोचीडासारख्या
मनाला चिकटून आहेत.
बुद्धाचा देव कधी
झाला हे समजलं
सुद्धा नाही. वाढदिवस, लग्न,
मयताचे विधी बौद्ध
पद्धतीने लावण्याचा ज्या प्रकारे आम्ही
हट्ट धरतो त्याच
प्रकारे त्या गाथा
समजून घेण्याचा हट्ट
का धरत नाही?
त्या गाथा जर
समजून घेतल्या तर
समजून येईल की
लग्न वगैरे गोष्टी
बाजार मांडून करण्याच्या
नाहीत. त्या अतिशय
साध्या पद्धतीने करायला बुद्ध
सांगतो. अफाट पैसा
खर्च करण्याऐवजी तो
भावी वधू - वरांच्या
प्रगतीसाठी वापरता येईल हे
आम्हांला समजूनच येत नाही.
कारण आम्ही गाथा, विधी केवळ
म्हणायच्या म्हणून म्हणत आहोत
कारण लोकांना दाखवायचं
आहे आम्ही पण
बुद्ध आहोत (घरात
व मनात मात्र
महारच आहेत ). १९२७
साली बाबासाहेबांचं एक
विधान आहे "नवऱ्याला
मित्र माना ". गेल्या
६२ वर्षात हे
परिवर्तन झालं आहे काय?
कारण आजही आम्हांला बायको,बहीण, आई यांनी
आमच्या हातात चहा आणून
दिला पाहिजे. कितीही
रात्री घरी आलो
तरी त्यांनी उठून
आम्हांला जेवण वाढले
पाहिजे. वैदिक धर्माची पुरुषसत्ताक
चौकट आम्ही खरच मोडली
का? मोर्चा ,अधिवेशनात
महिलांना घेऊन जातो
मात्र वक्त्यांत आणि
निर्णय प्रक्रियेत त्यांचा नगण्य
सहभाग कसा काय
? बुद्धाने कार्यकारणभावाला महत्व दिल होतं.
बाबासाहेबांनी याच कार्यकारणभावाने
धर्मग्रंथाची आणि बुद्धाचीही
चिकित्सा केली. आज आम्ही
त्याच कार्यकारणभावाला, त्यांच्या
विचारांना तिलांजली देत आहोत.
लग्नातील काळ्या मण्यांचे मंगळसूत्र
गायब झाले व
पांढऱ्या मण्यांचे मंगळसूत्र आले.
कारण आम्ही हिंदू
पेक्षा वेगळे आहोत हे
दाखवायचे आहे. काळ्याच
पांढरं झाल्याने पुरुषप्रधानतेला धक्का
कुठे बसला? खरं
तर मंगळसूत्र नावाची
गोष्ट वैचारिक परिवर्तन
करून आम्ही केल्या
६२ वर्षात हद्दपार
करायला हवी होती.
कारण आमचा धम्म
नवरा बायको यांचं
नातं मैत्रीचं नातं
सांगतो. ज्यात कुणीच लहान
नाही की मोठा
नाही. तुम्ही
अमुक तमुक गाथा
म्हटली काय किंवा
नाही म्हटली काय
यात काहीच फरक
पडणार नाही. तुम्ही
बुद्ध किती आचरणात
आणत आहत हे
महत्वाचे आहे.
या धम्मचक्र
प्रवर्तन दिनी वैदिक
चौकटीतील बुद्ध पूजत बसण्यापेक्षा
खरा बुद्ध आचरणात
आणण्याचा प्रयत्न करूयात. कारण
तो बुद्ध क्रांतिकारी
विचारांचा आहे. रूढी
,परंपरा नाकारणारा नव्याचा स्वीकार
करणारा ,तुमच्या तर्कबुद्धीला आवाहन
करणारा आहे. बौद्धिक
व सांस्कृतिक क्षेत्रात नवी
जाणीव निर्माण करणारा
बुद्ध स्वीकारा. बुद्ध
पुजण्यासाठी नसून तो
आचरणात आणण्यासाठी आहे हे
जेंव्हा समजून येईल तेंव्हा
कोणतीही वंदना,गाथा न
म्हणताही तुम्ही
बौद्ध झालेले असाल
हे मात्र नक्की
!
आयु.बुद्धजय भालशंकर
मो.9960372736
