Friday, November 30, 2018

घोड्यांच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !



 ' सध्या शाळेत खिचडी मिळतेय शिक्षण नाही '  हा भीमटोला वाचून सांगोल्याच्या वाचकाचा फोन आला होता. गुणवत्तापूर्ण शिक्षण असूनही तो बेरोजगार आहे. शिक्षकी पेशाचे काम करण्याऐवजी शेताची कामे करण्यात आणि जनावराचे शेण काढण्यात त्याचे दिवस जात आहेत.  वशिलेबाजीवर लिहा म्हणून या वाचकाने विनंती केली. तसा हा लेख वाचून वशिलेबाजी बंद होईल असे काही नाही. कारण सद्यस्थितीत लोकांनी मनाबरोबरच जनाचीही सोडली आहे. 
           काही दिवसापूर्वी तीन बेरोजगार तरुणांनी  रेल्वेखाली जीव देण्याचा प्रयत्न केला होता  त्याची बातमी पेपर मध्ये वाचली असेल. किती जणांना फरक पडला माहित नाही. रोजगार भेटला काय किंवा नाही भेटला काय जातीची आणि धर्माची अस्मिता टिकली पाहिजे. त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. नोकऱ्या शिक्षण नंतर कधी तरी बघू.  जागृत असणाऱ्या काही तरुणांनी आपल्या नोकऱ्यांसाठी वर्षभरापूर्वी दिल्लीत मोर्चा काढला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही  प्रत्येक जिल्ह्यात बेरोजगारांचे मोर्चे निघाले होते. रोजगार न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत.  प्रत्येक कारणावर याठिकाणी लिहणे शक्य नाही. सर्वात जास्त चीड ज्या कारणावर  आहे त्या कारणावर लिहण्याचा प्रयत्न केला आहे.  वशिलेबाजी ! सगळ्यात महत्वाचा फॅक्टर नोकरीला लावणारा आणि नोकरी नाकारणाराही. टॅलेंट असणारी मुले प्रवाहाबाहेर आहेत तर ज्यांची शिपाईही व्हायची लायकी नाही ते मोठ्या पदावर आहेत. प्रत्येक क्षेत्रांत नोकरी मिळवण्यासाठी वशिला किंवा पैसे फेकावा लागतो. इतर क्षेत्रात नोकरीसाठी थोडंफार कौशल्य असावं लागतं तरच वशिलेबाजीवर मिळालेली नोकरी टिकवता येते. उदाहरण म्हणून कारखानदारी क्षेत्र घेता येईल. मशीन चालवता येत नसेल तर  नोकरी मिळून पण काही फायदा नाही.
              इतर क्षेत्राप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही वशिलेबाजीचा शिरकाव झाला. आता तर खाजगी शाळेत नोकरी हवी असेल तर खिसा मोठा हवा किंवा वरदहस्त. शिक्षणाची गंगा वंचित वर्गाच्या दारापर्यंत आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील सारखे शिक्षणमहर्षीं कुठे आणि आजचे बाजारू शिक्षण महर्षी कुठे? शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी खाजगी शिक्षण संस्थांना शासनाने परवानगी दिली. पण यातून वंचित वर्गाचे सबलीकरण होण्याऐवजी अनेक सत्तासम्राट बाहुबली निर्माण झाले. आपापली सत्तास्थाने बळकट करण्यासाठीच या शिक्षण संस्थाचा उपयोग करण्यात आला आणि करण्यात येत आहे. समाजाची सेवा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्था कधी प्रायव्हेट कंपन्या बनल्या हे समजलंच नाही. पोरं,बाळ , नातेवाईक,सगेसोयरे,मित्रमंडळीच्या लेकरांची रोजगार हमी योजना म्हणजे शिक्षण संस्था. इतर ठिकाणी थोडंफार कौशल्य लागत हे आम्ही वर नमूद केलं आहे पण शिक्षण संस्थेत तशी गरज नाही. कारण इथे तुम्हीच मालक असता. सत्ताधीश असता. त्यामुळे तुम्हाला नियम लागू होत नाहीत. तुमची कामं करण्यासाठी इतर लोक असतात. त्यात जबाबदारी निश्चित नाही. त्यामुळे कारखाना किंवा सरकारी खात्यात प्रत्येक टेबलावर काम करणाऱ्या व्यक्तीचं  आउटपुट काय हे तपासलं जात.  इथे ही भानगड नाही.  निकाल १००% लागला काय किंवा ५० % लागला काय  पगार मिळायचा तो मिळणारच. शाळा बंद पडली तरी इतर शाळेत समावेशन होतं. प्रत्येक शिक्षक असे वर्तन करतोय असे आम्ही म्हणत नाही. वशिलेबाजीवर आलेल्या किंवा कुणाच्या तरी आशीर्वादावर जगत असलेल्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकापासून ते कर्मचाऱ्यापर्यंतचे वर्तन एकंदरीत असेच आहे. बिनारांगेची नोकरी मिळाल्यामुळे त्याची किंमत नाही. खिसा जसा जसा गलेलठ्ठ होत गेला तशी तशी चरबी वाढल्याने मन, शरीर सुस्त झाले त्यामुळेच मग राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत मराठी टक्का घसरला. कारण ज्ञानदान करणे म्हणजे केवळ पुस्तक वाचून दाखवून स्वाध्याय सोडवायला लावणे हाच अर्थ यांनी घेतला.
          काही जण दहावीचा निकाल पुढे करून आपला बचाव करतील परंतु ती परीक्षा पाठांराची असते. ज्ञानाची नसते. गुणवत्ता तपासायची असेल तर बुद्धीच्या परीक्षा असणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्या परीक्षा किंवा नवोदय मध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून तपासा. दहावीचा १०० %  निकाल लावणाऱ्या शाळेपेक्षा ५०%  शिष्यवृत्तीचा निकाल लावणारी शाळा गुणवत्तेत वरचढ ठरेल. चित्रकला,खेळ,साहित्य,नृत्य इत्यादि कला प्रकारात प्राविण्य संपादन करणारे विद्यार्थी गुणवंत ठरतील. ती शाळा आदर्श ठरेल.  शिक्षण क्षेत्रात फोफावणाऱ्या वशिलेबाजीमुळे काही जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला असेल. परंतु भविष्यातील विद्यार्थ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.  कारण यांना पाठांतर करण्याचं शिक्षण मिळालं , संकल्पना नीट कळाल्या  नसल्यामुळे  ही  पोरं व्यवहारात मागे पडू लागली आहेत.
         शिक्षण क्षेत्रातील बाहुबली अधिक बलवान आहेत. त्यांनी गुणवंत उमेदवारांना विना वशिलाची आणि केवळ परीक्षा फी भरून नोकरी मिळण्याची शाश्वती देणारी शासनाची "पवित्र" प्रणाली नुकतीच कोर्टात जाऊन हाणून पाडली. शिक्षक नेमण्याचा शासनाकडे जाणारा अधिकार त्यांनी आकाशपाताळ एक करून स्वतःकडे ठेवला. यामागील उघड गुपित सर्वाना माहीतच आहे. शिक्षणामुळे समाज शिक्षित होतो परंतु गरज आहे ती सुशिक्षित नागरिकांची. आणि हे काम फक्त तळमळ असणारा शिक्षकच करू शकतो. ज्या माणसाने आयुष्यत कष्ट करून नोकरी मिळवली आहे तोच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस झटतो. शाळा राष्ट्र घडविणारी प्रयोगशाळा आहे. परंतु सद्यस्थितीत शाळा बेरोजगारांची निर्मिती करणारा कारखाना बनली आहे. हे  चित्र बदलायचे असेल तर गरज आहे कष्ट करणाऱ्या आणि अंगात विविध कला गुण  असणाऱ्या  आणि मेंदूचा कौशल्याने वापर करून राष्ट्राची जमीन सुपीक करणाऱ्या शिक्षकाची. 
            समाजाची सुद्धा जबाबदारी वाढली आहे. कारण अनेक पुरस्कारांच्या  यादीवर नजर टाकली तर त्यात वशिलेबाजी हेच कर्तृत्व असणाऱ्या नरांची नावं असतात. अश्याच रत्नांचा कृत्रिम प्रकाश सगळीकडे पसरत आहे. त्याला वेळीच आवर घाला. शाळेत काय चाललंय हे आपल्या पाल्याकडून समजून घ्या. चांगल्या शिक्षकांचा हट्ट संस्थेकडे धरा. तो तुमचा हक्क आहे. गुणवत्ता असणारी  पोरं जनावरांचं शेण काढत असतील आणि मार्च ऑक्टोबरच्या वाऱ्या करून दहावी पास झालेली  ,धड नीट वाचताही न येणारी पोरं वशिलेच्या जोरावर जर शिक्षक म्हणून वर्गात उभी राहत असतील तर मित्रांनो घोड्यांची शर्यत गाढव जिंकू लागले आहे. तुम्हीच सांगा समाजाची आणि शिक्षण क्षेत्राची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे असे कसे म्हणता येईल?  

बुद्धजय भालशंकर 

मो. ९९६०३७२७३६
(सा. बहुजन आवाज ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१८ च्या अंकात प्रकाशित )

Saturday, November 17, 2018

सध्या शाळेत खिचडी मिळतेय, शिक्षण नाही

                                                                                                                                   
 शाळा म्हणजे ज्ञान मंदिर, पिढी घडविण्याचे पवित्र ठिकाण वगैरे वगैरे वर्णने कधी काळी केली जायची. सद्यस्थितीत अशी वर्णने करणे म्हणजे कल्पनेच्या भराऱ्या मारणे ठरेल. कारण ज्ञान वगैरे गोष्टी आज शाळेत मिळत नाही. मिळत असेल तर पालकांच्या खिशाला भोक पाडून अति महागड्या वह्या, गणवेश, बूट मिळतात. शिक्षण घ्यायचे झाले तर बाहेर ट्युशन लावून घ्यायचे अशी एकंदर स्थिती आज शाळेची, शिक्षण व्यवस्थेची  झाली आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी आता शाळेची नसून खाजगी क्लासवाल्यांची आहे.   सरकारी व शासन अनुदानित खाजगी शाळेत अजून एक महत्वाची गोष्ट मिळते ज्याने विद्यार्थी तृप्त होतात. ती आहे खिचडी. शाळेत ज्ञान मिळो न मिळो खिचडी मिळाली पाहिजे. एक दिवस खिचडीची चव बदलू द्या किंवा खिचडी नाही दिली तर पालक सरळ भांडायला येतात. चांगले शिक्षण द्या म्हणून भांडायला येणारे पालक जमात लुप्त झाली आहे. शाळेतल्या मास्तरला सिल्याबस पेक्षा तांदळाची चिंता जास्त लागून राहते. वर्गात शिकवलेले पोरांच्या डोक्यात किती जातं यापेक्षा त्यांच्या पोटात चविष्ट खिचडी कशी जाईल याच्या विचारात मास्तर जास्त असतो. 
          हे सारं आठवायचं कारण म्हणजे दिवाळी सुट्टी लागायच्या आधी घोषित झालेला राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल. २०१७-१८ या वर्षात महाराष्ट्रातून तब्ब्ल ७० हजारच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले केवळ ९२ विद्यार्थी. या पूर्वीच्या दोन वर्षांची आकडेवारी सुद्धा तशीच आहे. २०१६-१७ या वर्षात ९६ तर २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रातील ७४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. प्रज्ञा शोध परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भारत सरकारकडून दिली जाते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडे  गुणवत्ता नाही अश्यातला भाग नाही. आमच्या पोरांकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. परंतु आमचे लक्ष केवळ दहावी कसे पास व्हायचे  यावरच जास्त आहे. गुणवत्ता वगैरे या गोष्टीपासून आपण कोसो दूर आहोत. त्यामुळेच मग बुद्धीच्या परीक्षा असणाऱ्या प्रज्ञा शोध सारख्या परीक्षेत आमच्या पोरांचा ‘ निकाल ’ लागतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी टक्का त्यामुळेच तर कमी आहे. कारण आम्ही संकल्पना समजून घेण्यापेक्षा पाठांतरला जास्त महत्व देतो. पालकांची सुद्धा अपेक्षा आमचा मुलगा/ मुलगी दहावीची परीक्षा पास झाला पाहिजे. दहावीच्या  परीक्षेवर आमचा इतका फोकस आहे की आयुष्यात दुसरी परीक्षाच नाही. परंतु व्यवहारात आल्यावर तुमच्या १० वी च्या  प्रमाणपत्राची किंमत किती आहे.?.आपली पोरं दहावी कशी पास होतील याची धास्ती पालकांना असल्यामुळे  परीक्षा पास  होण्यासाठी साम - दाम- दंड - भेद याचा वापर होत आहे. त्यातूनच कॉप्या पुरवा,व्हॉटस अप वर पेपर फोडा, शिक्षकांना धमक्या द्या, पेपर बघून लिहा आणि परीक्षा पास व्हा हा कार्यक्रम जोरात सुरु आहे.   तर इकडे  १०० % निकाल लावून आमची शाळा कशी भारी आहे हे दाखवून देण्याची स्पर्धा शाळांत लागली आहे. त्यातूनच काही शाळासुद्धा कॉप्या पुरवण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात मागे नाहीत. प्रत्येकजण कॉपी करूनच पास होतो असे मुळीच नाही. काही विद्यार्थी रात्रं दिवस पाठांतर करून पास होतात. त्यालाच ते अभ्यास म्हणतात. पाठांतर नावाच्या अभ्यासावर आमची मुले आता १०० % मार्क मिळवू लागली आहेत. पालक सुद्धा आमची पोर हुशार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.
           मुळातच आमची शिक्षणाबद्दलची संकल्पना स्पष्ट नाही. शिक्षण हे साध्य नसून ते साधन आहे हेच मुळात आम्ही विसरलो असून शिक्षणाला साध्य समजून बसलो आहेत. त्यामुळे अमुक तमुक पदवी मिळावी म्हणून आम्ही धडपड करत असतो. माणसाची हुशारी त्याच्या नावासमोर असणाऱ्या पदव्या वरून ओळखली जाते. तुमच्या पदव्या किती आहेत यापेक्षा तुम्हाला खरंच ज्ञान किती आहे हे कुणीच बघत नाही. म्हणूनच अनेक मोठ्या  समस्या न शिकलेली लोक क्षणात सोडवून मोकळी होतात तर अति शिकलेली लोक तोंडात बोटं घालून हे कसं झालं हे विचारत बसतात. पाठांतर करून मार्क मिळवणे यावरच भर दिला असल्या कारणाने अशी फजिती होत आहे. आज शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती होय. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं पाठांतर कमी तो मागे पडणारा. परंतु व्यवहारातील शिक्षण खूप वेगळे आहे. शाळेत भाषा शिकवली जाते . माणसामाणसातील संवाद कसा असावा हे व्यवहार शिकवतो. पाढे पाठ करणे वेगळे आणि गणित समजणं वेगळं. बायोलॉजि शिकून माणसाच्या शरीराची माहिती पाठ करणे वेगळॆ आणि माणूस जाणणं वेगळं. १० रुपयाचा हार, १५ रुपयाचा नारळ ,५ रुपयेचे तेल खरेदी करून आणि चप्पल सांभाळणाऱ्या बाईला १० रुपये देऊन तुम्ही देवळार्यंत पोहचाल परंतु देव तुमच्यासमोर खरंच प्रकट होईल का ? तुमची आणि त्याची भेट होईल का? त्याच प्रमाणे लाखो रुपये डोनेशन देऊन, फी भरून तुम्ही पदव्या संपादन कराल पण ते शिक्षण आहे का? ते ज्ञान आहे का? 
        पाठांतरापेक्षा संकल्पना जो पर्यंत आम्ही समजून घेत नाही तो पर्यंत आम्ही शिक्षणात फार मोठी प्रगती केली आहे असे म्हणता येणार नाही. शिक्षणाची मोठी जबाबदरी शिक्षकांवर आहे. कारण धडा वाचून दाखवून त्याचा स्वाध्याय पोरांना घरून सोडवून आणायला लावणे म्हणजे ज्ञानदान नव्हे. प्रश्नाची उत्तरे पाठ करून  पेपर पांढऱ्याचा काळा केल्याने मार्क मिळतील, ज्ञान नाही हे जोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत नाही तो पर्यंत पीएचडीच्या प्रबंधासाठीही चोरी होतच राहील. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करा. त्यांच्या प्रश्नाचं निरासरण करा. कारण जगातील प्रत्येक ज्ञानाचा जन्म हा प्रश्नातूनच झाला आहे. टॅलेंट सर्च परीक्षा पुस्तकातील अभ्यासावर मात्र पुस्तकात नसणारे प्रश्न विचारते. विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून प्रश्न सोडवावेत ही अपेक्षा असते. ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात तेच मग पास होतात आणि आम्ही ज्यांना लय हुशार समजून बसलो असतो(९५% मार्क असलेले ) ती मात्र नापास होतात. संशोधन करून पाहण्याची खरं तर आता वेळ आली आहे की बोर्डात पहिली आलेली पोरं आता नेमकी कुठे आहेत आणि आज ज्यांनी समाजात मोठं नाव मिळवलं आहे, शिष्यवृत्ती मिळवली आहे, स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे ती कधी बोर्डात आली होती का?
       मार्कांपेक्षा संकल्पना स्पष्ट करण्याचा मागे लागा. “मार्कवादी” होण्यापेक्षा “ज्ञानवादी” व्हा ! कारण शालेय जीवनात आधी अभ्यास करावा लागतो त्यावर प्रश्नपत्रिका सोडवावी लागते परंतु जीवनाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम एकाच वेळेस मिळतो. पाठांतरापेक्षा ज्ञानाच्या परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करा. कारण त्यातून बुद्धीला चालना मिळते. पाठांतरच करत राहिलात तर शाळेत तुम्हांला केवळ खिचडीची चव मिळेल खऱ्या शिक्षणाची नव्हे !