Tuesday, March 20, 2018

बहिष्कृत भारताचा 'प्रबुद्ध' नायक

भारत देशाच्या इतिहासावर नजर टाकली, त्याचे अवलोकन केले तर आपणास समजून येईल संस्कृतीच्या गप्पा मारणारे किती लबाड आहेत. मुळातच या देशाचा इतिहास अंधारलेला होता.माणसाला माणूसपण नाकारणारी ढोंगी संस्कृती येथे नांदत होती.जातीयव्यवस्थेच्या बंधनात करोडो मानवजात याठिकाणी नागवली जात होती. अन्याय अत्याचारग्रस्त माणसे गुराढोरांहून हीन जीवन जगत होते. थोडक्यात बहिष्कृतांचाच हा देश म्हणा हवा तर.
    विषमतेच्या इतिहासाला समतेची संजीवनी देण्यासाठी १४ एप्रिल १८९१ साली एक महामानव या भारतभूमीत जन्माला आला. सर्वश्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या संस्कृतीचा बुरखा या महामानवाने आपल्या विद्ववतेने फाडला.भारताची संस्कृती, समाजव्यवस्था ज्या पायावर उभी आहे तो चातुवर्णाचा पाया किती भयंकर आहे हे या महामानवाने जगाला दाखवून दिले.मनूने निर्माण केलेली व्यवस्था त्याने लाथाडली. संस्कृतीच्या महासत्तेच्या ढोंगाला त्याने लाथांनी तुडविले.हजारो वर्षाची जातीव्यवस्था उध्वस्त केली आणि संविधानाच्या माध्यमातून नवी समतावादी,बंधुतावादी समाजव्यवस्था या भारताला दिली.
  हजारो वर्षांपासून बहिष्कृत असणारी माणसं स्वाभिमानाने जगू लागली. स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ लागली केवळ या महामानवामुळेच.कोट्यवधींचा अस्पृश्य समाज या भारतात हजारो वर्षांपासून गुलामगिरीत खितपत पडला होता.कोट्यवधींची संख्या असूनही या समाजाने कधीच गुलामगिरीच्या विरोधात बंड केले नाही.कारण त्यांचा मेंदूही गुलामच होता.शिक्षणाचा अधिकार नव्हता ना अर्थजनाचा.सावलीचाही विटाळ होता.अश्या समाजाला या 'विश्वरत्नाने'गदागदा हलविले.स्फूर्तीचे स्फुलिंग चेतविले,बंड करण्याची ताकद दिली. तुम्हीही माणसं आहात याची जाणीव या महामानवाने करून दिली.जगातील मानवमुक्तीचा सर्वात मोठा लढा याच महामानवाने उभा केला आणि माणसाला माणूसपण मिळवून दिले.त्यामुळेच अनेक पिढ्या त्यांच्या ऋणी होत्या,आहेत आणि असतील. आमचा हा उद्गारकर्ता त्यामुळेच कोणत्या देवळात न राहता तो आमच्या हृदयात राहतो.त्यामुळेच या महामानवाचे ऋण व्यक्त करताना कवी म्हणतो,
    ' भीमा किती गावेत तुझ्या कीर्तीचे पोवाडे,
      तुझी कीर्ती वर्णिताना शब्दही अपुरे पडे,
      किती दाखवू होश,किती दाखवू जोश
      फिके पडतात विश्वकोश भीमा तुझ्या नावापुढे
      भीमा तुझ्या नावापुढे.......'
   बाबासाहेबांचे अनेक पैलू आपण जाणतो.बाबासाहेबाना फक्त दलित नेते म्हणून सिमीत केले जाऊ शकत नाही. डॉ बाबासाहेब म्हणजे - जागतिक स्तरावर भारताच्या लोकशाहीचा दीपस्तंभ,समतावादी कायद्याची संहिता,विषमतावादी जातियवाद्यांचा किल्ला उध्वस्त करणारी समतारूपी तोफ, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून समस्त महिलांना स्वातंत्र्य बहाल करणारा आधुनिक मनू, मानवमुक्तीचा ध्यास घेऊन गोलमेज परिषदेत दीन दलितांच्या तसेच भारताच्या स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करणारा कणखर सेनापती, तोंड असूनही बोलता न येणाऱ्या संवेदनाहीन झालेल्या समाजाच्या न्यायासाठी दिनरात्र झटणारा आणि प्रसंगी गांधीलाही नडणारा अस्पृशांचा मूकनायक, हिंदू समाजाला लागलेला जातीयवादाचा रोग नाहीसा करण्यासाठी या व्यवस्थेची चिरफाड करून समाजाचे आणि देशाचे स्वास्थ्य निर्माण करणारा महान डॉक्टर, रिजर्व बँकेच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणारा महान अर्थतज्ञ, दामोदर हिराकुड जलप्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना न्याय देणारा शेतकऱ्यांचा कैवारी, औद्योगिक धोरणे मांडून देशाचा विकास कसा करता येईल हे सांगणारा विकासपुरुष, कामगारांना न्याय देणारा कामगार नेता आणि तथागत बुद्धांची करून पुन्हा या भारत देशात रुजविणारा बोधिसत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
   बाबासाहेबांनी आयुष्यभर हिंदू धर्माला ताळ्यावर आणण्यासाठी संघर्ष केला. अनेकवेळा बाबासाहेबांना जीवघेण्या धमक्या आल्या. बाबासाहेबांना देशद्रोही ठरविण्यात आले तरीही बाबासाहेब न डगमगता समतारूपी समाज निर्मितीसाठी संघर्ष करीत राहिले.आयुष्यभर बाबासाहेबांना हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी त्रास दिला. पण बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल कधीच राग मनात ठेवला नाही.   उलट त्यांच्याविरुद्ध सूड बुद्धीने न वागता त्यांच्यात मानसिक बदल घडून येण्यासाठी बुद्ध विचार प्रस्थापित केले.म्हणून घटनेच्या मूलभूत अधिकाराच्या संज्ञेतून हिंदू धर्माला त्यांनी गाळून टाकले नाही.इतर धर्माप्रमाणेच हिंदू धर्मालाही ते धर्मप्रसाराचे अधिकार देतात.हिंदूच नव्हे तर या देशातील सर्व धर्माना धर्मगुरूंना त्यांच्या धर्मपीठांना ते मूलभूत अधिकारात सामावून घेतात.अट फक्त एकच ती म्हणजे एका धर्माने दुसऱ्या धर्मावर कुरघोडी करून धर्मकलह माजवता कामा नये. खरंच बाबासाहेबांची करुणा किती मोठी. समाज परिवर्तनाचे शिलेदार म्हणवून घेणाऱ्यांना बाबासाहेब समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांची, बुद्धांची करुणा आत्मसात करणे गरजेचे आहे असे मला वाटते. जागतिक स्तरावर बाबासाहेबांना लोकशाहीचा दीपस्तंभ म्हणून ओळखले जाते. लोकशाही म्हणजे केवळ राजकीय लोकशाही असून चालणार नाही त्याचबरोबर ती सामाजिक हवी. हे सांगतांना घटना समितीत २५ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, 'आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट होऊन चालणार नाही. राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीतही झाले पाहिजे.सामाजिक लोकशाहीचा आधारभूत पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही फार दिवस टिकाव धरू शकणार नाही. समता,स्वातंत्र्य व बंधुभाव निर्माण करणाऱ्या जीवनपद्धतीला सामाजिक लोकशाही म्हणतात .'
    संविधान लागू होऊन आता लवकरच ७० वर्षे पूर्ण होतील.पण अजूनही सामाजिक लोकशाही निर्माण होऊ शकली नाही.कारण बाबसाहेबांनंतर तसे नेतृत्व तयार झाले नाही. बाबासाहेबांनंतर नेतृत्व म्हणून जर पहावयाचे असेल तर मला वाटते, आपण बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेकडे, विचारधारेकडे पाहिले पाहिजे व त्यानुसार मार्ग अवलंबिला पाहिजे. योग्य आणि अचूक मार्ग दाखविणारे आता हेच एकमेव साधन आहे. त्यांच्या विचाराचा प्रसार समाजामध्ये झाला पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेबांचे ग्रंथ एकमेकांना भेट द्यावे. त्यावर विविध चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित करावेत.जेणेकरून समाजजागृती होईल. सोशल मीडियाचा यासाठी प्रभावी उपयोग करून घेता येईल. जेणेकरून आपली राष्ट्रव्यापक चळवळ निर्माण होईल.
   नवनवीन साहित्य, संगीत, कला यांच्या निर्मितीसाठीही प्रोत्साहन देऊन चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावे.आपली मुले मोक्याच्या जागा कश्या पटकावतील याचा ध्यास घेतला पाहिजे.शैक्षणीक संस्था, बँका, सहकारी पतसंस्था, उद्योग, माध्यम समूह यापैकी कशातही आमची प्रगती झाली नाही. आमची बौद्धिक ताकद मोठी आहे. रस्त्यावरची लढाईही आम्ही लढतो. त्याच्याबाबतीत आमचा मुकाबला कुणीच करू शकणार नाही. मात्र वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात आम्ही आजही मागासच आहोत. यावर विचारमंथन झाले पाहिजे.
आज महामानवाची जयंती देशभरात धुमधडाक्यात साजरी करीत असताना आम्ही समाज संकल्प करायला हवा. समाजाच्या उत्कर्षाचा एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून तो अंमलात आणला गेला पाहिजे.आजच्या काळात मनुवादी व्यवस्था पुन्हा एकदा आपले डोके वर काढत आहे. धार्मिक, सामाजिक गुलामगिरी लादली जात आहे. एकाच धर्माची संस्कृती थोपवण्याची भाषा बोलली जात आहे. वैचारिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.अशावेळी देशाला तारु शकणारा एकच वाद आहे तो म्हणजे आंबेडकरवाद.मनुवादाला गाडणारा वाद म्हणजे आंबेडकरवाद.
  उद्योग, प्रशासकीय क्षेत्र,राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रसार माध्यमाच्या चाव्या आता आमच्या तरुणांच्या हाती आल्या पाहिजेत.तरच या देशाची शासनकर्ती जमात होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.कोट्यवधी, अब्जावधीचे उद्योग आमच्या समाजाचे निर्माण झाले पाहिजेत.सहकारी पतसंस्था, बँका आमच्या ताब्यात आल्या पाहिजेत. आर्थिक ताकद निर्माण झाली पाहिजे.प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कार्य करावे. इतर बांधवांनी मदतीचा हात द्यावा. नुसते संविधान माझ्या बापाने लिहले म्हटल्याने काहीच होणार नाही. आता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे.महामानवाच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत घडविण्याची जबाबदारी आता आपल्या शिरावर आहे.आपण ती निश्चितच पार पाडू असा आशावाद या भीम जयंती निमित्त बाळगूयात. या बहिष्कृत भारताला प्रबुद्ध भारत करणाऱ्या त्या मूकनायकला अभिवादन करताना एका कवितेच्या ओळी आठवतात,
'मोजू तरी कशी उंची
तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची
तू देव नव्हतास
तू देवदूत ही नव्हतास
तू मानवतेची पूजा करणारा
खरा महामानव होतास '

-बुद्धजय अण्णासाहेब भालशंकर
अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन)
सोलापूर , महाराष्ट्र
मो.९९६०३७२७३६

No comments:

Post a Comment