Sunday, October 27, 2024

धम्माची वाटचाल धर्माकडे...?

  

मागच्या आठवड्यात बौद्ध समाजाचा एक मित्र कार्यालयात आला होता. त्याच्यासोबत गप्पागोष्टी होत असताना माझे लक्ष त्याच्या हातावर बांधलेल्या पांढऱ्या धाग्यावरती गेले. मित्र बौद्ध आहे. कोणतेही कर्मकांड बौद्ध लोकात होत नाही म्हणून उत्सुकतेने त्याला पांढरा धागा मनगटावर का बांधला? याचे कारण विचारले. मित्राने सांगितले वर्षावास सुरू होता. त्यानिमित्त भंतेजींना आम्ही घरी बोलाविले होते आणि पूजापाठ झाल्यावर भंतेजींनी घरातील सर्व सदस्यांच्या हातावर हा पांढरा धागा बांधला. या धाग्यामुळे निगेटिव्ह गोष्टींपासून संरक्षण होईल, असे भंतेजींनी कुटुंबातील सर्वांना धम्मदेसना देतेवेळी सांगितले. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्वांनीच मनगटावर पांढरा धागा बांधून घेतला आहे असे उत्तर मित्राने दिले.   

      नुकताच ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे म्हणून त्याचा स्वीकार केला अशी अनेक भाषणे ऐकली.अनेक लेख आम्ही वाचले. मागील ६८ वर्षांत आम्ही खरंच बौद्ध झालो आहोत काय? की केवळ बौद्ध असल्याचा देखावा करीत आहोत हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे झाले आहे. कारण आम्ही केवळ आमची बाह्य प्रतीके बदलली आहेत. आमचे आचार-विचार हे बुद्धाच्या विचारांचे नाहीत. देव-देवतांचे फोटो काढून देव्हाऱ्यात आम्ही बुद्धाला आणि बाबासाहेबाला बसविले. पांढरे कपडे घालू लागलो. काळया मंगळसूत्राच्या जागी पांढरे मंगळसूत्र आले. गळ्यात काळया दोऱ्यात साईबाबाचे फोटो असायचे त्याच्या जागी आता बुद्धाचा फोटो आला आहे. आम्ही थोडक्यात देव बाजूला ठेवले आणि त्याच्या जागी बुद्धाला आणि बाबासाहेबाला देव केलं आणि त्यांची पूजाअर्चा सुरू केली. थोडक्यात आमचा मेंदू आजही हिंदू धर्माच्या गुलामगिरीत अडकून पडलेला आहे. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध नेमका कशासाठी दिला हेच अजून समजून आलं नाही. जन्म,वाढदिवस,लग्न,मृत्यू या कार्यक्रमात केवळ त्रिसरण पंचशील आणि इतर काही गाथा म्हणणे म्हणजेच बौद्ध होणे एवढेच आम्हाला माहित आहे. आम्हाला त्या गाथांचा, त्रिसरणांचा, पंचशीलाचा अर्थही माहित नाही. आम्ही केवळ भक्ती भावाने डोळे बंद करून हे सर्व करीत आहोत आणि स्वतःला बौद्ध म्हणवून घेत आहोत. त्यात आता मनगटावर पांढरा धागा बांधण्याचा प्रकार सुरू झाला.       

        भंते हातावर पांढरा धागा बांधून देत आहेत म्हणून तो आम्ही बांधून घेत आहोत. आमच्यापैकी कुणालाही भंतेना प्रश्न विचारू वाटत नाही का? हिंदू लोक मनगटावर लाल धागा बांधतात त्याला आम्ही कर्मकांड मानतो आणि त्याचा कडाडून विरोध करतो. त्यांची चेष्टा करतो. मग जेव्हा आम्ही बौद्ध आमच्या मनगटावर पांढरा धागा बांधतो तेव्हा हे कर्मकांड नव्हे काय? तथागताने ४५ वर्ष लोकांच्या कल्याणाचा धम्म लोकांना वाटला. त्याचा प्रचार प्रसार केला. या ४५ वर्षात तथागतांनी कोणत्या भंतेच्या किंवा कोणत्या उपासकाच्या मनगटावर पांढरा धागा बांधला ते सांगा.   

      धागा शरीरावर बांधला जाईल. मनाचे काय? मनावर काय बांधाल? बुद्धाने माणसाच्या मनाला वळण लावण्याचे काम केले आहे.धागा बांधल्याने व्यक्तिमत्त्व बदलेल काय? धागा बांधून बुद्ध धम्माचा प्रसार होणार आहे काय? धागा बांधून घेतल्याने उपासक शीलवान,प्रज्ञावान होणार आहे काय?धम्म प्रसार करण्यासाठी खरंच हातावर धागा बांधणे गरजेचं आहे काय?     

      ज्या गोष्टीला तथागताने विरोध केला त्याच गोष्टी पुन्हा तथागतांच्या धम्मामध्ये घुसविल्या जात आहेत.अज्ञान, विषमता, तुच्छता, अंधश्रद्धा यांचा अंधार जाळण्याचे मोठे कार्य बुद्धांनी केले. बुद्धाने ईश्वर मानला नाही. आत्मा मानला नाही. धर्म,संप्रदाय, ईश्वर,आत्मा, स्वर्ग - नरक परलोक, पूर्वजन्म,पुनर्जन्म यांच्या संकटात सापडलेल्या समाजाला त्याने त्या संकटातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम राबविला. माणसाला माणसाशी जोडण्याचे काम बुद्धाने केले. तर्कनिष्ठ, बुद्धिवादी, विज्ञानवादी मार्ग त्याने समाजाला सांगितला. आपण प्रेषित आहोत, अवतार आहोत,देव आहोत असा आणि माणसांच्या बुद्धीचा अवमान होईल,ती नाकारली जाईल किंवा तिची गळचेपी होईल असा कोणताही देखावा बुद्धाने उभा केला नाही. बुद्ध तत्त्वज्ञाच्या हिमतीने बोलत होता. सत्याला सत्याचीच शक्ती असावी. त्याला कोणताही अंधश्रद्धेचा, दैवीवादाचा पांगुळगाडा नको होता. बुद्ध स्पष्ट, सरळ, सुबोध अशा पद्धतीने लोकांशी बोलत होता.त्यांना सत्य सांगत होता.   बुद्धाच्या नंतर महायानाने बुद्धाला ईश्वर केले. त्याची भक्ती सुरू केली. बुद्धाच्या मूर्तीची पूजा सुरू केली. बुद्ध पुण्य देणारा, पाप नष्ट करणारा देव ठरला. महायनाने बुद्ध नावाच्या तत्त्वज्ञ माणसाला दैवी रूप देऊन त्याचा देव करून टाकला. आणि हाच दैवी रूपवाला बुद्ध अनेक ठिकाणी पोहोचला.आज जो बुद्ध सांगितला जातोय तो महायानवाला बुद्ध सांगितला जातोय.    

        एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल ती म्हणजे बाबासाहेबांनी पारंपारिक बुद्धाशी आपले नाते जोडले नाही.त्यांनी आपल्याला 'ओरिजनल असा बुद्ध' दिला आहे आणि त्याचेच नाव 'नवयान' आहे. परंतु दुर्दैवाने मूळ बुद्ध आज कोणीच सांगत नाही.   आज बुद्धाचा पंचशील, अष्टांगिक मार्ग साध्या, सरळ सोप्या भाषेत का सांगितला जात नाही? किती भंते बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा वर धम्मदेसना देतात? किती भंते बाबासाहेबांचा नवयान बुद्ध मांडतात.हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच भंते मूळ बुद्ध मांडत आहेत त्याचा प्रचार प्रसार करीत आहेत.     

       जो कोणी बुद्धाच्या धम्माचा प्रचार करीत आहे असे सांगून तर्कवादावर, बुद्धीवादावर न पटणारा बुद्ध सांगत असतील तर तो बुद्ध मूळ बुद्ध नसून तो महायान बुद्ध आहे असे ओळखावे.हिंदू प्रतीके वेगळ्या रूपात, रंगात स्वीकारून बौद्ध होता येणार नाही त्यासाठी अंतर्मनातून बौद्ध व्हावे लागेल. प्रज्ञा, मैत्री, करुणा यांचा स्वीकार करून ते आचरणातही आणावे लागेल.     

       धम्माची धर्माकडे होत असणारी वाटचाल रोखायची असेल तर बाबासाहेबांचा नवयान समजून घेण्याशिवाय पर्याय नाही.


-आयु. बुद्धजय सुशीलादेवी अण्णासाहेब भालशंकर

मो.९९६०३७२७३६

Wednesday, June 26, 2024

सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ

 

महाराष्ट्राला सामाजिक न्यायाची दिशा दाखवून महाराष्ट्राला पुरोगामी बनविण्यात ज्यांचा मोठा आहे त्यात शाहू महाराजांचे नाव अग्रेसर आहे. म. फुले यांच्या नंतर पुरोगामी विचारांची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक नव्या क्रांतिकारी विचारांची देण दिली ते म्हणजे शाहू महाराज. आज त्यांची जयंती.
       राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत त्यांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.

शिक्षण प्रसाराचे कार्य : -    
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. तसा कायदाच त्यांनी बनविला.  ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. मागास जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुकर व्हावे यासाठी त्यांनी वसतिगृहे सुरु केले.उपाशी पोटी शिक्षण घेता येणार नाही म्हणून  विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. (Mid Day Meal - ही संकल्पना महाराजांनी सुरु केली.)  एवढं करूनही जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाहीत त्यांना त्यांनी महिन्याला १ रु. दंड आकारण्यास सुरुवात केली.
     केवळ शिक्षण देऊन चालणार नव्हते तर शिक्षणाचा फायदा असृपश्य वर्गास झाला पाहिजे म्हणून मोक्याच्या जागेवर त्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा कशी प्राप्त होईल हे महाराजांनी पाहिले. अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
    स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.मुलींच्या नोकरीची सोयही त्यांनी केली.  डॉक्टर झालेल्या मुलीला त्यांनी नगरपरिषदेच्या दवाखान्याची प्रमुख बनविले.


अस्पृश्य जातींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न :
अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली.  गंगाधर कांबळे या महार समाजातील व्यक्तीस कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी अस्पृश्य वर्गातील पैलवानांना सरदार, अभंग,पंडित अशा पदव्या दिल्या .

राखीव जागांची तरतूद :
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून  १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली आणि त्याची लागलीच अंमलबजावणी केली. त्यांच्या या निर्णयास उच्च वर्गातून कडाडून विरोध झाला. मात्र शाहू महाराजांनी या विरोधाला भीक घातली नाही. महाराजांचा हा निर्णय अस्पृश्य वर्गाच्या जीवनात क्रांती करणारा ठरला. महाराजांचे हेच धोरण भारताच्या संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आणि अस्पृश्य वर्गास स्वाभिमानाचे जगणे प्राप्त झाले. 

क्रांतिकारी कायदे :
सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.
त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु महाराजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

नगरपालिकेत राखीव मतदारसंघ :
कोल्हापूर नगरपरिषदेचे  प्रतिनिधी राजदारबारा मार्फत नेमण्याची प्रथा बंद करून राजषी शाहू महाराजांनी नगरपरिषदेमध्ये मध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यास सुरूवात केली. प्रत्येक जातीस लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ निर्माण केले. नगरपररषदेचे ४७ मतदारसंघ निर्माण करून ख्रिश्चन,मुसलमान, जैन, लिंगायत , वाणी, जंगम, तेली, सुतार, कुं भार, साळी, कोळी, लोहार, धनगर,पारधी, वडार, मांग, महार, चांभार, भंगी इत्यादी जातीचे ४७ उमेदवार निवडून दिले आणि चांभार समाजातील दत्तोबा पवार यांना नगर परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष केले.

'मूकनायकास' मदत :
 दत्तोबा पोवार हे शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक होते. त्यांनी १९१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी परिचय करून घेतला होता. याच दत्तोबांनी डॉ. आंबेडकरांविषयी महाराजांना सांगितले. दलित समाजातील एक तरुण मुलगा शिक्षण घेऊन तयार झाल्याचे ऐकून महाराजांना आनंद झाला. त्या दोघांची भेट १९१९ मध्ये झाली. दोघांचे स्नेहबंध दृढ झाले. दलितांची बाजू जनतेसमोर आणि भारत दौऱ्यावर आलेल्या साऊथबरो समितीसमोर मांडण्यासाठी डॉ. आंबेडकरांना वर्तमानपत्राची गरज भासू लागली. ही बाब बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या कानावर घातली आणि वर्तमानपत्र सुरू करण्याची योजना त्यांच्यासमोर ठेवली. महाराजांना ही योजना पसंत पडली आणि त्यांनी वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी तत्काळ अडीच हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यातूनच ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू झाले.

माणगाव परिषद :
दत्तोबा पोवार, गंगाराम कांबळे, तुकाराम गणेशाचार्य, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे, निंगाप्पा ऐदाळे यांनी चर्चा करून माणगाव परिषद घेण्याची तयारी चालवली. त्यासाठी निंगाप्पा ऐदाळे डॉ. आंबेडकरांना भेटले. भेटीत २१ व २२ मार्च १९२० ही तारीख निश्‍चित करण्यात आली. त्या परिषदेत शाहू महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत; इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते हिंदुस्थानचे पुढारी होतील.’’
     डॉ. आंबेडकरांनी अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला.डॉ. बाबासाहेब म्हणाले, " राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अस्पृश्यांना समानतेचे, बरोबरीचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिल्याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी असले पाहिजे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो."  शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केले होते.
   बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी  शाहू राजांनी मोठे कार्य केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते" असे गौरवोद्गार काढले होते.
  अश्या या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !


✍️आयु. बुध्दजय भालशंकर
📱९९६०३७२७३६

Wednesday, January 3, 2024

आज नऊ रंग गेले कुठे?

     विद्या सरकारी कार्यालयात काम करणारी बौद्ध समाजाची तरुणी. ग्रामीण भागातील शेतमजुराची ही मुलगी अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात आली.

    आज ३ जानेवारी. विद्या कार्यालयात साडी घालून आली. सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.प्रत्येकजण तिला विचारत होता,"मॅडम,आज काय वाढदिवस आहे का तुमचा,की अजून काही विशेष"? विद्या मात्र स्मितहास्य देऊन शांत रहायची.

   आजूबाजूच्या महिला वर्गाला मात्र काही चैन पडेना.विद्याने साडी का घातली याचं उत्तर त्यांना हवं होतं.शेवटी सर्व महिला ग्रुप विद्याच्या टेबलजवळ आला आणि तिला कारण विचारलं.

    विद्याने उत्तर दिलं,"अहो आज सावित्रीमाई फुले यांची जयंती आहे ना म्हणून साडी घातली".

     एकीने प्रश्न विचारला,"हा ते ठीक आहे जयंती वगैरे पण त्यात साडी घालण्यासारखं विशेष काय"? दुसरी म्हणाली,"अंग वेडी विद्या ,सणासुदीला साडी घालावी असं जयंती वगैरेला थोडीच घालायची असते साडी". तिसरी नाराजीच्या स्वरात म्हणाली," माझा तर मूडच गेला बाई. वाटलं विद्याकडे विशेष कारण असेल.पण कसलं काय?". 

    सर्व महिला मंडळ चेहऱ्यावर नाराजी आणि प्रश्नचिन्ह घेऊन आपापल्या जागेवर जाऊन बसलं.

    ज्यांच्या सोबत आपण काही दिवसांपूर्वी नऊ रंगाच्या साड्या घालून फोटो काढले आज त्यांनाच आपल्या साडीचा प्रश्न पडलेला बघून हताश झालेल्या विद्याने शेजारी बसलेल्या राहुलला विचारले,"सर काय हे,काय म्हणावं अश्या यांच्या वागण्याला"?

   राहुलने उत्तर दिले- "मानसिक गुलामगिरी".

          - आयु. बुद्धजय भालशंकर

              मो.९९६०३७२७३६

  


Friday, November 30, 2018

घोड्यांच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !



 ' सध्या शाळेत खिचडी मिळतेय शिक्षण नाही '  हा भीमटोला वाचून सांगोल्याच्या वाचकाचा फोन आला होता. गुणवत्तापूर्ण शिक्षण असूनही तो बेरोजगार आहे. शिक्षकी पेशाचे काम करण्याऐवजी शेताची कामे करण्यात आणि जनावराचे शेण काढण्यात त्याचे दिवस जात आहेत.  वशिलेबाजीवर लिहा म्हणून या वाचकाने विनंती केली. तसा हा लेख वाचून वशिलेबाजी बंद होईल असे काही नाही. कारण सद्यस्थितीत लोकांनी मनाबरोबरच जनाचीही सोडली आहे. 
           काही दिवसापूर्वी तीन बेरोजगार तरुणांनी  रेल्वेखाली जीव देण्याचा प्रयत्न केला होता  त्याची बातमी पेपर मध्ये वाचली असेल. किती जणांना फरक पडला माहित नाही. रोजगार भेटला काय किंवा नाही भेटला काय जातीची आणि धर्माची अस्मिता टिकली पाहिजे. त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. नोकऱ्या शिक्षण नंतर कधी तरी बघू.  जागृत असणाऱ्या काही तरुणांनी आपल्या नोकऱ्यांसाठी वर्षभरापूर्वी दिल्लीत मोर्चा काढला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही  प्रत्येक जिल्ह्यात बेरोजगारांचे मोर्चे निघाले होते. रोजगार न मिळण्यामागे अनेक कारणे आहेत.  प्रत्येक कारणावर याठिकाणी लिहणे शक्य नाही. सर्वात जास्त चीड ज्या कारणावर  आहे त्या कारणावर लिहण्याचा प्रयत्न केला आहे.  वशिलेबाजी ! सगळ्यात महत्वाचा फॅक्टर नोकरीला लावणारा आणि नोकरी नाकारणाराही. टॅलेंट असणारी मुले प्रवाहाबाहेर आहेत तर ज्यांची शिपाईही व्हायची लायकी नाही ते मोठ्या पदावर आहेत. प्रत्येक क्षेत्रांत नोकरी मिळवण्यासाठी वशिला किंवा पैसे फेकावा लागतो. इतर क्षेत्रात नोकरीसाठी थोडंफार कौशल्य असावं लागतं तरच वशिलेबाजीवर मिळालेली नोकरी टिकवता येते. उदाहरण म्हणून कारखानदारी क्षेत्र घेता येईल. मशीन चालवता येत नसेल तर  नोकरी मिळून पण काही फायदा नाही.
              इतर क्षेत्राप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही वशिलेबाजीचा शिरकाव झाला. आता तर खाजगी शाळेत नोकरी हवी असेल तर खिसा मोठा हवा किंवा वरदहस्त. शिक्षणाची गंगा वंचित वर्गाच्या दारापर्यंत आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील सारखे शिक्षणमहर्षीं कुठे आणि आजचे बाजारू शिक्षण महर्षी कुठे? शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी खाजगी शिक्षण संस्थांना शासनाने परवानगी दिली. पण यातून वंचित वर्गाचे सबलीकरण होण्याऐवजी अनेक सत्तासम्राट बाहुबली निर्माण झाले. आपापली सत्तास्थाने बळकट करण्यासाठीच या शिक्षण संस्थाचा उपयोग करण्यात आला आणि करण्यात येत आहे. समाजाची सेवा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्था कधी प्रायव्हेट कंपन्या बनल्या हे समजलंच नाही. पोरं,बाळ , नातेवाईक,सगेसोयरे,मित्रमंडळीच्या लेकरांची रोजगार हमी योजना म्हणजे शिक्षण संस्था. इतर ठिकाणी थोडंफार कौशल्य लागत हे आम्ही वर नमूद केलं आहे पण शिक्षण संस्थेत तशी गरज नाही. कारण इथे तुम्हीच मालक असता. सत्ताधीश असता. त्यामुळे तुम्हाला नियम लागू होत नाहीत. तुमची कामं करण्यासाठी इतर लोक असतात. त्यात जबाबदारी निश्चित नाही. त्यामुळे कारखाना किंवा सरकारी खात्यात प्रत्येक टेबलावर काम करणाऱ्या व्यक्तीचं  आउटपुट काय हे तपासलं जात.  इथे ही भानगड नाही.  निकाल १००% लागला काय किंवा ५० % लागला काय  पगार मिळायचा तो मिळणारच. शाळा बंद पडली तरी इतर शाळेत समावेशन होतं. प्रत्येक शिक्षक असे वर्तन करतोय असे आम्ही म्हणत नाही. वशिलेबाजीवर आलेल्या किंवा कुणाच्या तरी आशीर्वादावर जगत असलेल्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकापासून ते कर्मचाऱ्यापर्यंतचे वर्तन एकंदरीत असेच आहे. बिनारांगेची नोकरी मिळाल्यामुळे त्याची किंमत नाही. खिसा जसा जसा गलेलठ्ठ होत गेला तशी तशी चरबी वाढल्याने मन, शरीर सुस्त झाले त्यामुळेच मग राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत मराठी टक्का घसरला. कारण ज्ञानदान करणे म्हणजे केवळ पुस्तक वाचून दाखवून स्वाध्याय सोडवायला लावणे हाच अर्थ यांनी घेतला.
          काही जण दहावीचा निकाल पुढे करून आपला बचाव करतील परंतु ती परीक्षा पाठांराची असते. ज्ञानाची नसते. गुणवत्ता तपासायची असेल तर बुद्धीच्या परीक्षा असणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्या परीक्षा किंवा नवोदय मध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून तपासा. दहावीचा १०० %  निकाल लावणाऱ्या शाळेपेक्षा ५०%  शिष्यवृत्तीचा निकाल लावणारी शाळा गुणवत्तेत वरचढ ठरेल. चित्रकला,खेळ,साहित्य,नृत्य इत्यादि कला प्रकारात प्राविण्य संपादन करणारे विद्यार्थी गुणवंत ठरतील. ती शाळा आदर्श ठरेल.  शिक्षण क्षेत्रात फोफावणाऱ्या वशिलेबाजीमुळे काही जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला असेल. परंतु भविष्यातील विद्यार्थ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.  कारण यांना पाठांतर करण्याचं शिक्षण मिळालं , संकल्पना नीट कळाल्या  नसल्यामुळे  ही  पोरं व्यवहारात मागे पडू लागली आहेत.
         शिक्षण क्षेत्रातील बाहुबली अधिक बलवान आहेत. त्यांनी गुणवंत उमेदवारांना विना वशिलाची आणि केवळ परीक्षा फी भरून नोकरी मिळण्याची शाश्वती देणारी शासनाची "पवित्र" प्रणाली नुकतीच कोर्टात जाऊन हाणून पाडली. शिक्षक नेमण्याचा शासनाकडे जाणारा अधिकार त्यांनी आकाशपाताळ एक करून स्वतःकडे ठेवला. यामागील उघड गुपित सर्वाना माहीतच आहे. शिक्षणामुळे समाज शिक्षित होतो परंतु गरज आहे ती सुशिक्षित नागरिकांची. आणि हे काम फक्त तळमळ असणारा शिक्षकच करू शकतो. ज्या माणसाने आयुष्यत कष्ट करून नोकरी मिळवली आहे तोच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस झटतो. शाळा राष्ट्र घडविणारी प्रयोगशाळा आहे. परंतु सद्यस्थितीत शाळा बेरोजगारांची निर्मिती करणारा कारखाना बनली आहे. हे  चित्र बदलायचे असेल तर गरज आहे कष्ट करणाऱ्या आणि अंगात विविध कला गुण  असणाऱ्या  आणि मेंदूचा कौशल्याने वापर करून राष्ट्राची जमीन सुपीक करणाऱ्या शिक्षकाची. 
            समाजाची सुद्धा जबाबदारी वाढली आहे. कारण अनेक पुरस्कारांच्या  यादीवर नजर टाकली तर त्यात वशिलेबाजी हेच कर्तृत्व असणाऱ्या नरांची नावं असतात. अश्याच रत्नांचा कृत्रिम प्रकाश सगळीकडे पसरत आहे. त्याला वेळीच आवर घाला. शाळेत काय चाललंय हे आपल्या पाल्याकडून समजून घ्या. चांगल्या शिक्षकांचा हट्ट संस्थेकडे धरा. तो तुमचा हक्क आहे. गुणवत्ता असणारी  पोरं जनावरांचं शेण काढत असतील आणि मार्च ऑक्टोबरच्या वाऱ्या करून दहावी पास झालेली  ,धड नीट वाचताही न येणारी पोरं वशिलेच्या जोरावर जर शिक्षक म्हणून वर्गात उभी राहत असतील तर मित्रांनो घोड्यांची शर्यत गाढव जिंकू लागले आहे. तुम्हीच सांगा समाजाची आणि शिक्षण क्षेत्राची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे असे कसे म्हणता येईल?  

बुद्धजय भालशंकर 

मो. ९९६०३७२७३६
(सा. बहुजन आवाज ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१८ च्या अंकात प्रकाशित )

Saturday, November 17, 2018

सध्या शाळेत खिचडी मिळतेय, शिक्षण नाही

                                                                                                                                   
 शाळा म्हणजे ज्ञान मंदिर, पिढी घडविण्याचे पवित्र ठिकाण वगैरे वगैरे वर्णने कधी काळी केली जायची. सद्यस्थितीत अशी वर्णने करणे म्हणजे कल्पनेच्या भराऱ्या मारणे ठरेल. कारण ज्ञान वगैरे गोष्टी आज शाळेत मिळत नाही. मिळत असेल तर पालकांच्या खिशाला भोक पाडून अति महागड्या वह्या, गणवेश, बूट मिळतात. शिक्षण घ्यायचे झाले तर बाहेर ट्युशन लावून घ्यायचे अशी एकंदर स्थिती आज शाळेची, शिक्षण व्यवस्थेची  झाली आहे. शिक्षण देण्याची जबाबदारी आता शाळेची नसून खाजगी क्लासवाल्यांची आहे.   सरकारी व शासन अनुदानित खाजगी शाळेत अजून एक महत्वाची गोष्ट मिळते ज्याने विद्यार्थी तृप्त होतात. ती आहे खिचडी. शाळेत ज्ञान मिळो न मिळो खिचडी मिळाली पाहिजे. एक दिवस खिचडीची चव बदलू द्या किंवा खिचडी नाही दिली तर पालक सरळ भांडायला येतात. चांगले शिक्षण द्या म्हणून भांडायला येणारे पालक जमात लुप्त झाली आहे. शाळेतल्या मास्तरला सिल्याबस पेक्षा तांदळाची चिंता जास्त लागून राहते. वर्गात शिकवलेले पोरांच्या डोक्यात किती जातं यापेक्षा त्यांच्या पोटात चविष्ट खिचडी कशी जाईल याच्या विचारात मास्तर जास्त असतो. 
          हे सारं आठवायचं कारण म्हणजे दिवाळी सुट्टी लागायच्या आधी घोषित झालेला राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल. २०१७-१८ या वर्षात महाराष्ट्रातून तब्ब्ल ७० हजारच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले केवळ ९२ विद्यार्थी. या पूर्वीच्या दोन वर्षांची आकडेवारी सुद्धा तशीच आहे. २०१६-१७ या वर्षात ९६ तर २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रातील ७४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. प्रज्ञा शोध परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भारत सरकारकडून दिली जाते. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडे  गुणवत्ता नाही अश्यातला भाग नाही. आमच्या पोरांकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. परंतु आमचे लक्ष केवळ दहावी कसे पास व्हायचे  यावरच जास्त आहे. गुणवत्ता वगैरे या गोष्टीपासून आपण कोसो दूर आहोत. त्यामुळेच मग बुद्धीच्या परीक्षा असणाऱ्या प्रज्ञा शोध सारख्या परीक्षेत आमच्या पोरांचा ‘ निकाल ’ लागतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठी टक्का त्यामुळेच तर कमी आहे. कारण आम्ही संकल्पना समजून घेण्यापेक्षा पाठांतरला जास्त महत्व देतो. पालकांची सुद्धा अपेक्षा आमचा मुलगा/ मुलगी दहावीची परीक्षा पास झाला पाहिजे. दहावीच्या  परीक्षेवर आमचा इतका फोकस आहे की आयुष्यात दुसरी परीक्षाच नाही. परंतु व्यवहारात आल्यावर तुमच्या १० वी च्या  प्रमाणपत्राची किंमत किती आहे.?.आपली पोरं दहावी कशी पास होतील याची धास्ती पालकांना असल्यामुळे  परीक्षा पास  होण्यासाठी साम - दाम- दंड - भेद याचा वापर होत आहे. त्यातूनच कॉप्या पुरवा,व्हॉटस अप वर पेपर फोडा, शिक्षकांना धमक्या द्या, पेपर बघून लिहा आणि परीक्षा पास व्हा हा कार्यक्रम जोरात सुरु आहे.   तर इकडे  १०० % निकाल लावून आमची शाळा कशी भारी आहे हे दाखवून देण्याची स्पर्धा शाळांत लागली आहे. त्यातूनच काही शाळासुद्धा कॉप्या पुरवण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात मागे नाहीत. प्रत्येकजण कॉपी करूनच पास होतो असे मुळीच नाही. काही विद्यार्थी रात्रं दिवस पाठांतर करून पास होतात. त्यालाच ते अभ्यास म्हणतात. पाठांतर नावाच्या अभ्यासावर आमची मुले आता १०० % मार्क मिळवू लागली आहेत. पालक सुद्धा आमची पोर हुशार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.
           मुळातच आमची शिक्षणाबद्दलची संकल्पना स्पष्ट नाही. शिक्षण हे साध्य नसून ते साधन आहे हेच मुळात आम्ही विसरलो असून शिक्षणाला साध्य समजून बसलो आहेत. त्यामुळे अमुक तमुक पदवी मिळावी म्हणून आम्ही धडपड करत असतो. माणसाची हुशारी त्याच्या नावासमोर असणाऱ्या पदव्या वरून ओळखली जाते. तुमच्या पदव्या किती आहेत यापेक्षा तुम्हाला खरंच ज्ञान किती आहे हे कुणीच बघत नाही. म्हणूनच अनेक मोठ्या  समस्या न शिकलेली लोक क्षणात सोडवून मोकळी होतात तर अति शिकलेली लोक तोंडात बोटं घालून हे कसं झालं हे विचारत बसतात. पाठांतर करून मार्क मिळवणे यावरच भर दिला असल्या कारणाने अशी फजिती होत आहे. आज शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती होय. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं पाठांतर कमी तो मागे पडणारा. परंतु व्यवहारातील शिक्षण खूप वेगळे आहे. शाळेत भाषा शिकवली जाते . माणसामाणसातील संवाद कसा असावा हे व्यवहार शिकवतो. पाढे पाठ करणे वेगळे आणि गणित समजणं वेगळं. बायोलॉजि शिकून माणसाच्या शरीराची माहिती पाठ करणे वेगळॆ आणि माणूस जाणणं वेगळं. १० रुपयाचा हार, १५ रुपयाचा नारळ ,५ रुपयेचे तेल खरेदी करून आणि चप्पल सांभाळणाऱ्या बाईला १० रुपये देऊन तुम्ही देवळार्यंत पोहचाल परंतु देव तुमच्यासमोर खरंच प्रकट होईल का ? तुमची आणि त्याची भेट होईल का? त्याच प्रमाणे लाखो रुपये डोनेशन देऊन, फी भरून तुम्ही पदव्या संपादन कराल पण ते शिक्षण आहे का? ते ज्ञान आहे का? 
        पाठांतरापेक्षा संकल्पना जो पर्यंत आम्ही समजून घेत नाही तो पर्यंत आम्ही शिक्षणात फार मोठी प्रगती केली आहे असे म्हणता येणार नाही. शिक्षणाची मोठी जबाबदरी शिक्षकांवर आहे. कारण धडा वाचून दाखवून त्याचा स्वाध्याय पोरांना घरून सोडवून आणायला लावणे म्हणजे ज्ञानदान नव्हे. प्रश्नाची उत्तरे पाठ करून  पेपर पांढऱ्याचा काळा केल्याने मार्क मिळतील, ज्ञान नाही हे जोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत नाही तो पर्यंत पीएचडीच्या प्रबंधासाठीही चोरी होतच राहील. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करा. त्यांच्या प्रश्नाचं निरासरण करा. कारण जगातील प्रत्येक ज्ञानाचा जन्म हा प्रश्नातूनच झाला आहे. टॅलेंट सर्च परीक्षा पुस्तकातील अभ्यासावर मात्र पुस्तकात नसणारे प्रश्न विचारते. विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून प्रश्न सोडवावेत ही अपेक्षा असते. ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात तेच मग पास होतात आणि आम्ही ज्यांना लय हुशार समजून बसलो असतो(९५% मार्क असलेले ) ती मात्र नापास होतात. संशोधन करून पाहण्याची खरं तर आता वेळ आली आहे की बोर्डात पहिली आलेली पोरं आता नेमकी कुठे आहेत आणि आज ज्यांनी समाजात मोठं नाव मिळवलं आहे, शिष्यवृत्ती मिळवली आहे, स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे ती कधी बोर्डात आली होती का?
       मार्कांपेक्षा संकल्पना स्पष्ट करण्याचा मागे लागा. “मार्कवादी” होण्यापेक्षा “ज्ञानवादी” व्हा ! कारण शालेय जीवनात आधी अभ्यास करावा लागतो त्यावर प्रश्नपत्रिका सोडवावी लागते परंतु जीवनाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम एकाच वेळेस मिळतो. पाठांतरापेक्षा ज्ञानाच्या परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करा. कारण त्यातून बुद्धीला चालना मिळते. पाठांतरच करत राहिलात तर शाळेत तुम्हांला केवळ खिचडीची चव मिळेल खऱ्या शिक्षणाची नव्हे !
     
















































Wednesday, October 10, 2018

क्रांतीदूत : तथागत गौतम बुद्ध


   तथागत गौतम बुद्धाची ओळख करून देताना ती शांतिदूत म्हणूनच करून  दिली जाते. पण जगातील  तो पहिला क्रांतिकारक होता हे मात्र आम्ही विसरून जातो. होय तथागत गौतम बुद्ध क्रांतिकारक होते. त्यांचे विचार, त्यांचा धम्म हा क्रांतीच्या विचारांचा आहे. बुरसटलेल्या विचारांना, प्रथांना  येथे मुळीच स्थान नाही. त्यामुळेच  तर  मानवमुक्तीचा  लढा उभारणाऱ्या बाबासाहेबांनी तथागताला शांतिदूतापेक्षा क्रांतीदूत म्हणूनच गुरुचे स्थान दिले.
         इतिहासाच्या पानांवर नजर फिरवल्यावर सारं काही समजून येईल. हडप्पा संस्कृतीनंतर आली ती  वैदिक संस्कृती. ज्या संस्कृतीने माणसामाणसांत भेद  निर्माण केला. विषमतेचे बीज या भूमीत पेरले. जातव्यवस्था, वर्णव्यवस्था निर्माण केली. परमेश्वर,आत्मा या काल्पनिक गोष्टी निर्माण करून मोक्ष प्राप्तीचे भूत लोकांच्या मानगुटीवर जे बसविले ते आजपर्यंत उतरायला तयार नाही. अंधश्रद्धा, पुनर्जन्म वगैरे मध्ये  माणूस गुरफटून गेला. हडप्पा संस्कृतीमध्ये एकही मंदिर नव्हते. कोणताही देव नव्हता. मात्र वैदिक काळात अनेक देव निर्माण झाले. माणसाची जात त्याच्या कर्माऐवजी त्याच्या जन्मानुसार ठरू लागली. माणूस गुलाम झाला. स्त्री, शूद्र यांचे सामाजिक स्थान धुळीस मिळाले. अश्या संस्कृतीला आव्हान देणारा पहिला क्रांतिकारक म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध. त्याने वैदिक संस्कृतीच्या छाताडावर बसून तिला मातीत लोळविले अन माणसाला माणूसपण मिळवून दिले.
         बुद्ध जगातील पहिला धर्म संस्थापक होता ज्याने परमेश्वर नाकारला. चमत्कार नाकारला. आत्मा वगैरे गोष्टींना थारा दिला नाही.  धर्माच्या इतिहासात ही एक प्रकारची क्रांतीच होती.  बुद्ध कोणत्याही  तात्विक चर्चेच्या जाळयात अडकून बसला नाही. त्याने वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला  केला. जातीपातीचा विचार न करता सगळ्यांनाच आपल्या धम्मात प्रवेश दिला. स्त्रियांना आपल्या संघात प्रवेश देऊन पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला.  तत्कालीन समाज जीवनात ही क्रांतिकारी गोष्ट ठरली. लोकांना सन्मानाचे जीवन बौद्ध धम्मात मिळू लागले त्यामुळे ते बुद्धाचे अनुयायी बनू लागले. जनमानसात बुद्ध धम्माचे आकर्षण निर्माण झाले. त्याचा वेगाने प्रसारही झाला.  बुद्धाचे व्यक्तीमत्व आणि धर्मप्रसारासाठीची त्यांची पद्धत यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात हा धम्म झपाट्याने पसरला. दुष्ट प्रवृतींशी भलेपणाने आणि द्वेषाबरोबर प्रेमाने वागणारा बुद्ध अलौकिकच म्हणावा लागेल. विनोद, चातुर्य, हजरजबाबीपणा यांचा प्रयोग करून बुद्ध प्रतिस्पर्ध्याला  पेचात पकडत असे. तथागत आपला धम्म लोकांना अगदी समजणाऱ्या भाषेत ते समजावून सांगत असत.  कोणतीही भीती नव्हती. कर्मकांड नव्हते. पूजाविधी नव्हते. अगदी निराळा असा धम्म बुद्धाने लोकांना दिला.
      वैदिक संस्कृतीला हा फार मोठा धक्का होता. कारण एकप्रकारे त्याचे दुकानच बंद होणार होते. त्यामुळे कसंही करून त्यांना बुद्ध धम्माचा समूळ नष्ट करायचा होता. बुद्धाच्या निर्वाणानंतर वैदिकांना फार मोठे बळ मिळाले.  बुद्धाच्या शिकवणुकीबाबत वाद निर्माण करण्यात आले. महायान, हीनयान हे पंथ त्यातूनच निर्माण झाले. वैदिक संस्कृतीच्या प्रभावातूनच महायान निर्माण झाला. आणि तोच नंतर जगभर पसरत गेला.  महामानवाचा पराभव करायचा असेल  तर त्याच्या बरोबर उलट विचार लोकांत पेरायचा आणि लोकांना तसे आचरण करायला लावायचे ही पद्धत वैदिक लोकांनी बुद्धासाठी वापरली.  मी माणूस आहे. मला ईश्वर, प्रेषित मानू नका असे सांगणाऱ्या बुद्धालाच महायान लोकांनी देव केला. त्याची पूजा - अर्चा सुरु केली. मांडी  घालून ध्यानमग्न अवस्थेत त्याला कैद करून टाकले.  जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघायला शिकवणाऱ्या बुद्धाचेच डोळे बंद केले गेले. आम्ही सुद्धा तोच बुद्ध स्वीकारला. "अत्त दीप भव " हा संदेश आम्ही केवळ पोपटासारखा पाठ केला. त्याचा अर्थ कधीच समजून घेतला नाही.
        बाबासाहेबांना धर्मांतराच्या वेळेस एक प्रश्न विचारण्यात आला होता की, " तुम्ही नेमका कोणता बुद्ध स्वीकारत आहात? महायान की हीनयान? "  बाबासाहेबांनी उत्तर दिले माझा बुद्धधम्म  'नवयान ' आहे.  बुद्धाची शिकवण होती-  मी जे म्हणतोय ते तुम्ही स्वीकारलेच पाहिजे असं काही नाही. तुमच्या बुद्धीच्या तर्कावर तपासूनच त्याचा स्वीकार करा.  बाबासाहेबांनी दिलेला खरा बुद्ध अजून तरी आम्ही स्वीकारला आहे असे म्हणता येणार नाही. कारण आम्ही लोकांनी बुद्धाला  वैदिक संस्कृतीच्या चौकटीत अडकवून ठेवले आहे. खरा बुद्ध खूपच क्रांतिकारी आहे. अतिशय डेंजर आहे. तो तुमच्या बुद्धीला चालना देतो. आंधळेपणा पेक्षा तो तुम्हांला तर्क करायला सांगतो. कोणत्याही गोष्टीचा  (विचार, माणूस , धर्म देव,किंवा एखादी वस्तू ) स्वीकार करण्यापूर्वी त्याच्या गुणवत्तेबाबाबत चर्चा करूनच निर्णय घ्या असे बुद्ध आम्हाला सांगतो. आम्हाला मात्र हे माहीतच नाही. ज्यांना माहित आहे त्यांची अवस्था पोपटासारखी झाली आहे. पाठ तर सगळा बुद्ध आहे मात्र वर्तणुकीत आणण्यात अडचण आहे. केवळ त्रिशरण पंचशील डोळे बंद करून म्हटल्याने तुम्ही खरे बौद्ध होणार आहात काय ? वर्तनाचे काय ? बंधुभाव, मैत्रीभाव आम्ही समाजात निर्माण करीत आहोत काय? पाली भाषेतील वेगवेगळ्या गाथा रोज विहारात म्हटल्याने तुम्ही फार मोठे बुद्धिस्ट होणार नाही. कारण त्या किती गाथांचा अर्थ तुम्हांला माहित आहे हे सर्वात महत्वाचे आहे. का आम्ही पण भट ज्या प्रमाणे संस्कृत मधील श्लोक म्हणतो व बाकीच्यांनी केवळ भक्तिभावाने हात जोडून बसायचे असेच वर्तन करीत रहायचे?  हे बुद्धाला तरी हे अपेक्षित होते का? कारण त्या काळात लोकभाषा पाली होती. वैदिक धर्म प्रसारक संस्कृतचा आधार घेऊन लोकांना मानसिक गुलाम करीत होते अश्या वेळेस गौतम बुद्धाने स्वतःचा धर्म संस्कृत भाषेत न सांगता लोकभाषेत म्हणजेच पाली भाषेत सांगितला. त्याचा तोच उपदेश गाथांच्या माध्यमातून पुढे चालत आला आहे. पण आज पाली भाषा बहुसंख्य लोकांना समजत नाही त्यामुळे धम्माचा उपदेश लोकभाषेत करणे गरजेचे आहे पण ते होत नाही. विधी म्हणणारे काय म्हणत आहे हे लोकांना समजत नाही. ते केवळ हात जोडून बसून राहतात. त्यात विधी लावणारा पाली गाथेचा मराठीत अर्थही सांगत नाही. त्यामुळे आमचा बुद्ध केवळ पूजा अर्चनेसाठी राहिला आहे. वर्तणुकीतला बुद्ध कधीच लुप्त झाला आहे.
     बुद्धाचा धम्म हा पाठांतराचा नसून तो आचरणाचा आहे हेच आम्ही मुळात विसरत चाललो आहोत. त्यामुळे डोळे उघडे असणारा, चालणार बुद्ध आम्हाला पटत नाही. विहारात सगळ्या लोकांसोबत म्हणायचं म्हणून "बुद्धम सरणम गच्छामि " म्हणायचं. घरात चोरून देवही पुजायचा. आषाढी एकादशी धरायची. नवरात्रीत उपवास करायचा. हे सगळं सुरु आहे कारण आम्हांला बुद्धचं कळाला नाही. ज्या बुद्धाने अंधश्रद्धा नाकारली त्याच बुद्धाची मूर्ती अमुक दिशेला तोंड करून ठेवा असे सल्ले दिले जातात. आणि ती तशी ठेवलीही जाते.  राम, कृष्ण,शंकर जाऊन त्यांच्या जागी आम्ही बुद्धाला बसविले आहे. बाकी उपासना, अंधश्रद्धा तश्याच गोचीडासारख्या मनाला चिकटून आहेत. बुद्धाचा देव कधी झाला हे समजलं सुद्धा नाही. वाढदिवस, लग्न, मयताचे विधी बौद्ध पद्धतीने लावण्याचा ज्या प्रकारे  आम्ही हट्ट धरतो त्याच प्रकारे त्या गाथा समजून घेण्याचा हट्ट का धरत नाही? त्या गाथा जर समजून घेतल्या तर समजून येईल की लग्न वगैरे गोष्टी बाजार मांडून करण्याच्या नाहीत. त्या अतिशय साध्या पद्धतीने करायला बुद्ध सांगतो. अफाट पैसा खर्च करण्याऐवजी तो भावी वधू - वरांच्या प्रगतीसाठी वापरता येईल हे आम्हांला समजूनच येत नाही. कारण आम्ही  गाथा, विधी केवळ म्हणायच्या म्हणून म्हणत आहोत कारण लोकांना दाखवायचं आहे आम्ही पण बुद्ध आहोत (घरात व मनात मात्र महारच आहेत ). १९२७ साली बाबासाहेबांचं एक विधान आहे "नवऱ्याला मित्र माना ". गेल्या ६२ वर्षात हे परिवर्तन झालं आहे  काय? कारण आजही आम्हांला  बायको,बहीण, आई यांनी आमच्या हातात चहा आणून दिला पाहिजे. कितीही रात्री घरी आलो तरी त्यांनी उठून आम्हांला जेवण वाढले पाहिजे. वैदिक धर्माची पुरुषसत्ताक चौकट आम्ही खरच  मोडली का? मोर्चा ,अधिवेशनात महिलांना घेऊन जातो मात्र वक्त्यांत आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा नगण्य सहभाग कसा काय ? बुद्धाने कार्यकारणभावाला महत्व दिल होतं. बाबासाहेबांनी याच कार्यकारणभावाने धर्मग्रंथाची आणि बुद्धाचीही चिकित्सा केली. आज आम्ही त्याच कार्यकारणभावाला, त्यांच्या विचारांना तिलांजली देत आहोत. लग्नातील काळ्या मण्यांचे मंगळसूत्र गायब झाले व पांढऱ्या मण्यांचे मंगळसूत्र आले. कारण आम्ही हिंदू पेक्षा वेगळे आहोत हे दाखवायचे आहे.  काळ्याच पांढरं झाल्याने पुरुषप्रधानतेला धक्का कुठे बसला? खरं तर मंगळसूत्र नावाची गोष्ट वैचारिक परिवर्तन करून आम्ही केल्या ६२ वर्षात हद्दपार करायला हवी होती. कारण आमचा धम्म नवरा बायको यांचं नातं मैत्रीचं नातं सांगतो. ज्यात कुणीच लहान नाही की मोठा नाही.  तुम्ही अमुक तमुक गाथा म्हटली काय किंवा नाही म्हटली काय यात काहीच फरक पडणार नाही. तुम्ही बुद्ध किती आचरणात आणत आहत हे महत्वाचे आहे.
     या धम्मचक्र प्रवर्तन दिनी वैदिक चौकटीतील बुद्ध पूजत बसण्यापेक्षा खरा बुद्ध आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. कारण तो बुद्ध क्रांतिकारी विचारांचा आहे. रूढी ,परंपरा नाकारणारा नव्याचा स्वीकार करणारा ,तुमच्या तर्कबुद्धीला आवाहन करणारा आहे. बौद्धिक व सांस्कृतिक क्षेत्रात  नवी जाणीव निर्माण करणारा बुद्ध स्वीकारा. बुद्ध पुजण्यासाठी नसून तो आचरणात आणण्यासाठी आहे हे जेंव्हा समजून येईल तेंव्हा कोणतीही वंदना,गाथा न म्हणताही  तुम्ही बौद्ध झालेले असाल हे मात्र नक्की !

आयु.बुद्धजय भालशंकर
मो.9960372736