Sunday, February 26, 2017

अजून किती दिवस दुसऱ्याची बायको नटविणार ?


       
सत्ता नावाची सुंदरी प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते. ती  मोहक तर असतेच असते पण तिची ताकदही फार मोठी असते. तिच्या जोरावर तुम्ही भल्या भल्या लोकांना वाकवू शकता ,आपल्या बोटांवर नाचवू शकता. त्यामुळेच तर मग साम-दाम -दंड-भेद वापरून सत्ता नावाच्या सुंदरीसोबत विवाह करण्यास नवरदेव उत्सुक असतात. केंद्राची सत्तासुंदरी सध्या नरेंद्राच्या ताब्यात आहे तर महाराष्ट्राची सत्तासुंदरी देवेंद्रच्या ताब्यात आहे. स्थानिक पातळीवरची सत्ता सुंदरीही नुकतीच नरेंद्र, देवेंद्र यांच्या घराण्यातच नांदायला गेली आहे. सत्ता सुंदरी आपल्याच घराण्यात यावी यासाठी देवेंद्रने चांगलाच जोर लावला होता. त्यासाठी प्रसंगी गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची ताकद वाढवली.त्यांच्या  कष्टाचे चीजही झाले असेच म्हणावे लागेल.
       आम्ही बहुजन, दलित मात्र या सत्तासुंदरी सोबत अजूनही विवाह करू शकलो नाही. आमची ताकद नाही अशातला भाग नाही. आम्ही आमची ताकद दुसऱ्यांच्या वरातीत नाचण्यात घालवत आलो आहोत.  आणि त्याबद्दल आमच्या नेते नावाच्या नवरदेवाला कसल्याही प्रकारची लाजही वाटत नाही हे सुद्धा विशेष.  कालपर्यँत आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरातीत भान विसरून नाचत होतो आणि आज भाजपच्या वरातीत नाचत आहोत. दुसऱ्याच्या वरातीतच नाचण्यात आम्हांला धन्यता वाटते. सत्तासुंदरी आमच्या बळावर मिळवण्यासाठी आम्ही कसलाच प्रयत्न करीत नाही. डिजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग असतात आम्ही पण त्याच प्रमाणे पैशाच्या तालावर आणि दारूच्या नशेत पार गुंग होऊन नाचत असतो.
                        आमची काही विद्वान लोक म्हणतील की भाजप मधून पण आमचे लोक, आमच्या जातीची माणसं निवडून आलीच आहेत की. आमचे वाघ आता डरकाळ्या फोडणार आहेत... वगैरे वगैरे.  अहो, विद्वान लोकहो सत्ता कोणत्या पक्षाची आहे ? तुमचे स्थान त्या पक्षात काय आहे ?  आमचे वाघ स्वतःचे हक्काचे घर सोडून दुसऱ्याच्या महालात गेले आहेत पण ते त्याचे मालक नाहीत तर त्याचे आश्रित आहेत. वेळ संपताच तुमच्या उमेदवाराला लाथा मारून बाहेरही काढतील. तुम्ही वाघ असा अगर अजून कोणी तुम्हाला त्यांच्या घरात शेळी बनूनच रहावं लागेल त्याच काय ? भाकरी पेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या असे सांगणारा महामानव आमचा बाप आहे असे  आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून माईक वर सांगतो. आणि स्टेज वरून खाली येताच पुन्हा लाचारी करायला मोकळे होतो. बाबासाहेबांचे नाव घेऊन, त्यांचा फोटो घेऊन आमचे नेते बाबासाहेबांना दिवसाढवळ्या विकत आहेत आणि आम्ही पण अश्याच नेत्यांना निवडून देऊन " खरकट्या हातात निळा झेंडा घेऊन, उष्ट्या तोंडाने " जय भीम म्हणत आहोत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही.  
                खरं तर यावेळेस सत्ता सुंदरी आमच्यावर फिदा झाली असती. कोणतीही सुंदरी असो ती ताकदवर माणसाच्या प्रेमात पडते. सत्ता सुंदरीचं पण तसच आहे. या निवडणुकीत मुळातच  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस  गांगरून गेले होते. शक्तीहीन झाल्यामुळे ते दिशाहीनही झाले होते. त्यामुळे सत्तेच्या स्वयंवरातील दोन स्पर्धक आपोआपच गार झाले होते. आणि राहिलेले  दोन आपापसात भांडत होते. त्यामुळे  आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून "तिसरी आघाडी" करून आमचा खंबीर, तगडा नवरदेव रिंगणात उभा करायला हवा होता. यावेळी आम्ही नवरदेवचं उभा केला नाही मग काय डोंबल्याचं लग्न होणार? लेचे पेचे उमदेवार तेही बेकीच्या ताकदीवर  उभे राहिले आणि सपाटून पडले . आता फक्त दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं. " कष्ट करायचं ,उष्ट खायचं " एवढेच काय ते आमचे जीवन.
      याला जितके नेते कारणीभूत आहेत तितकीच कारणीभूत आमची जनता आहे. ५ वर्षे शरद पवारला नाव ठेवायची,  ५ वर्षे नरेंद्र मोदीला नाव ठेवायची,  ५ वर्षे देवेंद्र फडणवीसला नाव ठेवायची आणि बरोबर मतदानाच्या दिवशी पुन्हा त्यांनाच मतदान करायचे. हा निव्वळ बकवासपणा आहे असे आम्हास वाटते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आमच्या राष्ट्रीय पक्षाच्या आणि त्याच प्रमाणे स्थानिक आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारांना किती मते पडली ? केवळ ५००, ७००  च्या घरातच आम्हाला मते मिळाली आहेत. समोर आपला नवरदेव असताना दुसऱ्याच्या नवरदेवाला कसं काय आमच्या लोकांनी घोड्यावर बसवलं समजायला वाव नाही. समाजाने आता ज्यांना घोड्यावर बसविले आहे त्यांच्या "गाढवलाथा" वेळ येताच मिळतीलच. विकला न जाणारा नेता निर्माण करण्यासाठी विकला न जाणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे हेच आम्ही मुळात विसरून गेलो आहोत. विकल्या जाणाऱ्या आणि आंधळेपणाने मतदान करणाऱ्या आमच्या समाजबांधवांमुळे प्रामाणिकपणे  काम करणाऱ्या , प्रामाणिकपणे  आंबेडकरी पक्षाला मतदान  करणाऱ्या लोकांचा हिरेमोड होत आहे. त्यांचे खच्चीकरण होत आहे.
    आमच्याकडे ताकद आहे. कष्ट करण्याची वृत्ती आहे. वेळप्रसंगी पैसाही खर्च करू शकतो. मग आमच्या कष्टातून, आमच्या पैशातून दुसऱ्याची बायको आम्ही का नटवायची ? आम्ही आमचीच बायको नटवू शकणार नाही का ? दुसऱ्याची बायको नटवून आम्हांला काय मिळणार आहे.? त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही आमचीच बायको नटवू , सत्तासुंदरी सोबत आम्हीच विवाह करू त्यासाठी आता पासूनच तयारीला लागणे ही काळाची गरज आहे.

बुद्धजय भालशंकर (भीमटोलाकार)
सोलापूर
मो. ९९६०३७२७३६

 (सा.बहुजन आवाजच्या २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २०१७ या अंकात प्रकाशित )

Monday, February 20, 2017

अशी ही बनवा बनवी.

                 
 
  मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय मनोरंजनात्मक सिनेमा म्हणजे 'अशी ही  बनवा बनवी'. हसून हसून बेजार करायला लावणारा हा चित्रपट आज ही टीव्हीवर लागला की आवर्जून पाहिला जातो. पुरुष असूनही स्त्री भासवून राहण्यासाठी जागा पटकावली जाते आणि त्यातून घडणारे मजेशीर किस्से या चित्रपटात आहेत.  अभिनय कसा करायचा हे या चित्रपटाकडून शिकावे लागेल. मुळातच तुम्ही वेगळे आहात पण काही तरी मिळवण्यासाठी तुम्हांला संपूर्णपणे बदलावे लागते. प्रसंगी पुरुषाची स्त्री सुद्धा व्हावं लागतं. आता या सिनेमाची आठवण अशी मध्येच का झाली ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  या चित्रपटाची आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या आमच्या आणि तुमच्याही आजूबाजूला हा चित्रपट घडत  आहे. आणि दर पाच वर्षांनी हा चित्रपट पुन्हा आपल्या वास्तव जीवनात घडत असतो. निवडणुकीच्या हंगामात हमखास आम्हांला 'बनवाबनवी' ची प्रचिती येते. 
       सध्या स्थानिक निवडणुकीसाठी 'बनवाबनवी' ची पात्रे ज्यांना निवडणूक भाषेत 'उमेदवार' असे म्हटले जाते.  तर या उमेदवारांचा अभिनय पाहून तर आम्हांला बुवा हसायलाच येत.  अतिशय भारी मनोरंजन आमचे सध्या होत आहे.(मनोरंजनाची सोय केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार ) या उमेदवारांच्या चेहऱ्यावरील भाव, बोलण्यातील नम्रता, हात जोडणे काय, जेष्ठ व्यक्ती दिसली रे दिसली की पाया पडणे काय? बिचाऱ्या जेष्ठ नागरिकांची किती पंचायत होत आहे. कोण कधी येईल आणि पाय धरेल याचा नेम नाही. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. आणि आशीर्वाद तरी किती जणांना द्यायचा.?   उमेदवार  पण इतकं नम्र बोलत आहेत की 'सदाशिव पेठेतील' मराठी पण फिकी पडेल.  ताई, आई ;लक्ष असू द्या. आजी तुमची सेवा करायची संधी द्या. ( खरं तर 'मेवा खायची' साधी द्या) . आमचंच  बटण दाबा. आमच्या पक्षाला मत म्हणजे विकासाला मतं  ( 'डोंबल्याचा विकास?'  आजीच्या मनात येणारा विचार).  आम्ही निवडून  आलो की तुमच्या प्रभागाचा विकास करू. असे ठरलेले डायलॉग प्रत्येक उमेदवार मारतो.खरंतर आता हे डायलॉग खूप बोअर झाले आहेत पण तरीही या डायलॉगचा मोह उमेदवारांना सुटत नाही.
    आमच्या सोलापुरात इतकी भारी अभिनय संपन्न व्यक्ती आहेत हे पाहून आमची छाती ५६ इंचाची झाली आहे. विकासाची भाषा प्रत्येकाच्या तोंडी आहे, त्यामुळे  सोलापूर आता 'स्मार्ट' होऊन सिंगापूरला पण मागे टाकतं का काय अशी स्वप्नं आम्हांला या नेत्या मंडळींची भाषणं ऐकून दिवसाढवळ्या पडत आहेत.  इतका जबरदस्त अभिनय हे लोक करत आहेत. सोलापूर म्हणजे ' आबे तुबे ची भाषा. बोलण्यात एक करारीपणा'. पण ही भाषा निवडणूक काळात एकदम गायब . आता अतिशय सौम्य अशी भाषा उमेदवारांच्या तोंडी बघून चमत्कार झाल्याचा भासच आम्हांला होत आहे. या आनंदाच्या भरात पटकन सदाशिव पेठेत जावे एक शेंडीवाला पकडावा आणि त्याला म्हणावं ," चलं सोलापुरात आता शुद्ध भाषा ही तुझी मक्तेदारी राहिली नाही.बघ आमचं सोलापूर कसं भाषेच्या बाबतीत चकचकीत झालं आहे ".  निवडणुकीतील अनेक उमेदवारांना आपण हरणार आहोत हे चांगलेच माहित असतं.  पण तरीही त्यांच्या बोलण्यात, चेहऱ्यावर ते मुळीच जाणवू देत नाहीत.  त्यांचा चेहऱ्यावर विजय आमचाच होणार अशी भावना असते. असा अभिनय केवळ निडणुकीतील उमेदवारच करू शकतो. त्यामुळे आम्ही ठरवले आहे या लोकांची शिफारस सरळ ऑस्कर समितीकडे करायची. भारताला खरंच अभिनयाचं ऑस्कर मिळून जाईल.      
         मतदारांना खुश करण्यासाठी मोफत वाय फायचे स्वप्न दाखवण्यात येत आहे. काही जणांना पार्टी देण्यात येत आहे. पार्टी पण मग ओली सुकी दोन्ही प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीतील 'बनवा बनवीच्या' सिनेमाने मात्र अर्थव्यस्थेला चालना दिली आहे. नोटबंदीनंतर सर्वच त्रस्त झाले होते. लोकांना आता रोजगार भेटला आहे. खायची प्यायची सोय झाली आहे. बाजारात पैसा येत आहे. बकऱ्या ,कोंबड्याच्या भाव वाढला आहे. हॉटेल मालकांचा धंदा जोरात चालू आहे. रॅलीच्या माध्यमातूनही नवी ' रोजगार निर्मिती ' होत आहे. मनरेगा पेक्षा अतिशय फायदेशीर आणि कष्ट न करता रोजगार मिळतो, खायची प्यायची सोयही होते. त्यामुळे प्रत्येकजण यात हात धुवून घेत आहे.
        ‘बनवा बनवी’ मध्ये सध्या राज्यात सेना भाजपवाले आघाडीवर आहेत.  भलेही सत्तेमध्ये भागीदार असले तरी यांचे अजून प्रेम जुळून आले नाही. संसाराला अडीच वर्षे होत आली तरी यांच्या कुरबुरी मिटल्या नाहीत. विधानसभेच्या वेळीस यांनी अतिशय भारी परफॉर्मन्स अभिनयात दिला होता. एकमेकांवर काय चिखलफेख केली होती.  (आणि जनतेच्या डोळ्यांत धूळफेखही) . इतिहासचं या लोकांनी उकरून  काढला होता. अफजलखानाच्या फॊजा काय ? वेगवेगळी विशेषणं एकमेकांना वापरून समोरच्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याच  अफजलखानाच्या फोजा सोबत मौजा मारताना जनाची नाही पण मनाचीही यांनी ठेवली  नाही.  सध्या काहीजण औकात दाखवण्याची भाषा करीत आहेत. मातोश्रीवाले म्हणत आहेत की भाजप गुंडाचा पक्ष आहे तर नागपूरवाले म्हणत आहेत शिवसेना खंडणीखोरांचा पक्ष आहे. एकमेकांची उणीधुणी जाहीररित्या काढली जात आहे. प्रचाराची भाषा पार रसातळाला गेली आहे. खंडणीखोर, गुंड मग एकमेकांना साथ का देत आहेत?  इतकाच तिटकारा आहे तर मग सत्ता का सोडत नाहीत? सत्ता यांना सुटणार नाही.  आता हे एकमेकांना शिव्या देत आहेत पण निवडणुका झाल्या आणि गरज पडली तर पुन्हा एकमेकांना मिठ्या मारतील. एकमेकांचे गोडवे गातील. 
       उमेदवारांच्या सोबतच मतदारांचा अभिनय पण जबरदस्त असतो. प्रत्येक उमेदवाराला आश्वासन दिले जाते, आमचं मत तुम्हालाच. काळजी करू नका तुम्ही. या वेळीस तुम्हीच ‘भाऊ नगरसेवक’. आपल्याच वहिनी निवडून येणार. चिंता नसावी. आमच्यासहित आपण प्रत्येकाने आपल्या भागातील उमेदवारांना हेच आश्वासन दिले आहे हे आम्ही जाणतोच. शेवटी मत ज्याला द्यायचे त्यालाच दिले जाणार आहे.
         उमेदवार कितीही अभिनय करो, तो  अभिनय किती खरा किती खोटा हे  ठरवणारा असतो तो  मतदार.  कुणाला पाडायचे कुणाला निवडून द्यायचे हे मतदार नावाची समीक्षा यंत्रणा ठरवत असते. आत्ताचे मतदार हे अतिशय सुज्ञ झाले आहेत. कोण ढोंगीपणाने वागत आहे आणि कोण तळमळीने बोलत आहे हे आता मतदार लगेच ओळखतात. बनवा बनवीच्या चित्रपटाला किती यश मिळवून द्यायचं हे मतदार राजा ठरविणार आहे. भल्या भल्या मात्तबरांना पाणी पाजण्याची किमया मतदार राजाने केली आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे निकाल लागण्याची शक्यता सध्या जास्त आहे. हा लेख वाचेपर्यंत तुम्हांला  उमेदवारांच्या बनवा बनवीचा आणि त्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद काय आहे याची प्रचिती आली असेल. अनेक ठिकाणी धक्कादायक निकालही आले असतील. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. किती ही बनवा बनवी केली तरी आपले पितळ उघडे पडणारच आहे मग तो चित्रपट असो किंवा वास्तवातील जगणं असो.
     बनवा बनवीचा नाद सोडून जोपर्यंत निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नावर लढवली जाणार नाही तो पर्यंत आमची लोकशाही यशस्वी होणार नाही.   उमेदवारांनी कितीही  ' बनवा बनवी' करू द्या शेवटी कुणाला निवडायचे हे सुज्ञ मतदार जाणून आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही  या बनवाबनवीचा आनंद लुटत आहोत तुम्हीही लूटा. टेन्शन घ्यायचं काम आपलं नाही ते उमेदवाराचं आहे. त्यामुळे सध्याच्या आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतील उमेदवाराच्या मनातील ओळी आम्ही देत आहोत   ------
      " बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, 
        साडी अशी नेसू आणि गालावरी  हसू
         ज्याला जसे हवे तसे, तसे दिसू, 
          भीती वाटे मला कि कुठेतरी फसू 
          बनवा बनवी अशी ही बनवा बनवी "
बुद्धजय भालशंकर 
मो. नं. ९९६०३७२७३६
                 

Sunday, February 19, 2017

'भीमटोलाने ' चपराक लगावली आहे.


             वाचकांचा आवाज 
        खबरदार...! जात बघून मतदान कराल तर  हा भीमटोला मागच्या अंकात वाचला . अतिशय सडेतोड प्रहार  बुद्धजय भालशंकर यांनी केला आहे.  वास्तव तर त्यांनी मांडलेच  आहे पण गद्दार आंबेडकर अनुयायांना जोराची चपराक लगावली आहे. त्या बद्दल त्यांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन. अतिशय मुद्देसूद असा हा भीमटोला आहे. जातीसाठी तुम्ही माती खायला तयारही असाल पण तुमचा उमेदवार तुमच्यासाठी  माती खायला तयार नाही त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जात बघून मतदान करणाऱ्यांना भानावर आणले आहे. अतिशय जबरदस्त भाषा शैलीतून त्यांनी या भीमटोलाची मांडणी केली आहे.

    व्हॅलेंटाइन डे ची मांडणी सुध्या अप्रतिम. त्यांच्या  कल्पक बुद्धीला तोड नाही. आजच्या तरुण पिढीला  'व्हॅलेंटाइन डे' म्हणजे नेमके काय हे त्यांनी अतिशय चांगली उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे. महापुरुषांची खरोखर वेगळी मांडणी यातून झाली आहे असे मला वाटते. बदलणाऱ्या जीवनशैलीला त्यांच्याच भाषेत महापुरुष समजावून सांगण्याची नवीन पद्धत बुद्धजय यांनी निर्माण केली आहे. असा प्रयोग या पूर्बी कुणीच केला नव्हता.  आजच्या युवकांसमोर हा आदर्श गरजेचा होता. बहुजन आवाजचा मागचा अंक खूपच नाविन्यपूर्ण होता आणि तो संग्रही ठेवण्यासारखा आहे. बहुजन आवाजच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा !!!!

आयु. सतीश सोनवले
जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर 
      
                    

Friday, February 17, 2017

इस्रो बंगलौर,येथे कार्यरत असणाऱ्या तरूणीची भीमाटोला वाचून आलेली प्रतिक्रीया



नव्या वर्षाची सुरुवात "भीमटोला" च्या वाचनाने
       
     नव्या वर्षात चांगली पुस्तके वाचण्याचा मी संकल्प केला आहे. पहिले पुस्तक त्यासाठी मी भीमटोला निवडले.  बुद्धजय तू खरंच फारच भन्नाट लिहलं आहेस. तुझा प्रत्येक लेख अप्रतिम. तुझा प्रत्येक मुद्दा मनाला भावतो.  भाषेवरची तुझी जबरदस्त पकड आहे.
 विषयही वेगवेगळे निवडले आहेस.   "हुंडा नको मामा ,फक्त पोरगी द्या मला "हा लेख मला खूप आवडला. मस्त सुरुवात करून अप्रतिम वास्तव मांडल आहेस. जावयाला तू पार बैलचं करून टाकलं आहेस. तुझा लेख वाचून पोरी
हुंडा देणार नाहीत आणि पोरं हुंडा घेणार नाहीत.  मी तरी ठरवून टाकलं आहे लग्नात हुंडा देणार नाही.
   "नागपूरच्या चड्डिला,बारामतीचा नाडा" हा लेख वाचून तर हसून हसून बेजार झाले.  फारच सही लिहल आहेस तू.
  तुझा पहिला लेख "मास्तर टेन्शन नका घेऊ,आधी झाडू मारा घंटा वाजवा अन् जमलं तर पोरांना शिकवा " हा फारच अप्रतिम. सरकारच्या जी.आर.ला तू बोलायला लावलस.  हसू ही आलं आणि वाईटही वाटलं. फारच त्रास आहे शिक्षकांना,हे तुझ्या लेखातून जाणवलं.
   बाहुबलीच्या लेखातून तू समाजाला  चांगलच फटकारलं आहेस.  तुझे प्रश्न खरेच योग्य आहेत.  समाजचं वास्तव मस्त मांडल आहे तू.  तुझ्या निरीक्षणशक्तीला माझा तर सलाम बाबा. पार वाभाड काढतोस तू.
    "राष्ट्रवादा" वरचा तुझा लेखही फारच  भारी.  बुद्ध,आईंनस्टाईन, आंबेडकर, नेहरू यांची उदाहरणे देऊन खरं तर तू माझ्या सारख्या असंख्य लोकांना भानावर आणलं आहेस.
   खूप चांगल लिहल आहेस तू.  समाजाला दिशादर्शक असं तुझं लिखाण आहे.  55 च्या 55 लेख सुपर आहेत. तुझ्या भाषाशैलीची जादू पुस्तक खाली ठेऊ देत नाही. पुस्तक पूर्णच वाचव लागतं. त्या शिवाय चैन नाही पडत. वाचकांना तू चांगल पुस्तक दिल आहेस. भीमटोला खूप मोठं नाव करणार याची मला खात्री आहे.
  तू मोठा लेखक हो, या साठी माझ्या तुला शुभेच्छा. मी तुझी खूप आभारी आहे कारण एवढं चांगल पुस्तक तू माझ्यासारख्या वाचकांना दिलं आहेस. All  the best.keep it up 💐💐💐
                 -मोनाली मेश्राम
                     बंगलोर

Monday, February 13, 2017

खबरदार... ! जात बघून मतदान कराल तर

 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. सगळीकडे नुसती धावाधाव सुरु झाली. उमेदवारांची पळवापळवीही झाली. काहींनी तर इकडून तिकडे पटापट  उड्याही मारल्या. उंदरांपेक्षाही जलदगतीने उड्या मारण्याचे कौशल्य आपणांस निवडणुकीच्या हंगामात दिसून येते. या निवडणुकीचे वैशिष्ट्य पाहिले तर आमच्या दृष्टीने  भटजी-शेटजींचा पक्ष, जातीयवाद्यांच्या पक्ष धार्मिकपणाचा अहंभाव असणारा पक्ष हा 'बहुजनांचा पक्ष ' झाला आहे. कालपर्यंत काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसने निळ्या झेंड्याचा वापर करून सत्ता उपभोगली.  भाजप, सेनेला बहुजनांचा, दलितांचा, निळ्या झेंड्याचा तिटकारा होता. पण निळ्या झेंड्याशिवाय सत्ता हस्तगत होऊ शकत नाही हे त्यांना समजले असल्यामुळे लागलीच त्यांनी 'नवी झूल' अंगावर पांघरली आहे. केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे स्थानिक पातळीवरही  हा पक्ष सत्तेत येऊ शकतो असा आशावाद निर्माण झाल्यामुळे मग  अनेक पक्षाच्या मातब्बरांनी पक्षनिष्ठा खुंटीवर टांगली आणि 'कमळ ' हातात घेतले. काहींना ते शक्य न झाल्यामुळे  त्याचा जवळचा म्हणून मग शिवधनुष्य हाती घेतले. या कार्यात स्वतःला आंबेडकरी वाघ म्हणवून घेणारे 'लांडगे' मागे राहिले नाहीत हेही विशेष.अनेकांनी भाजपाच्या चिखलात उतरून कमळाला आलिंगन दिले. आमच्या समाजाच्या अनेकांना कदाचित फार मोठा आनंद झाला असेल आपल्या नेत्याला, दादाला, भाऊला, अण्णाला तिकीट मिळाले. तर हा आनंद नाही तर तुमच्या अंधकारमय भविष्याची पाऊलवाट आहे.
       प्रचाराचा धुमधडाका सुरु झाला आहे. घरोघरी, बुध्दविहारात उमेदवार हात जोडून, लोटांगण घालत  येत आहेत. लक्ष असू द्या. मी तुमचाच आहे. त्यात 'मी तुमच्या जातीचा,मी तुमच्या धर्माचा' यावर फार मोठा जोर.मग आमच्या पण लोकांच्या हृदयाला पाझर फुटू लागतो. काहींची मग लगेच टिमकी वाजते, 'आपल्याला  पक्षाचं काय करायचं? आपला माणूस निवडून आला म्हणजे झालं.'  आम्ही इथंच मार  खातो. कालपर्यंत आम्ही याच षड्यंत्रात अडकलो होतो. त्यामुळे आमची राजकीय प्रगती होऊ शकली नाही. नोकरीत जात नको, शिक्षणात जात नको म्हणून बोंबलणारे भाजप, सेनेवाले निवडणुकीत मात्र 'जात' बघूनच तिकीट वाटप करतात. (सर्वच पक्ष असे करतात.) निवडणुकीच्या वेळेस बरं यांना जात आठवते. त्यांना माहिती आहे आमची लोकं जात बघूनच मतदान करतात, धर्म बघूनच मतदान करतात.
    सोलापूरसह महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी जातीची गणितं बघूनच तिकीट वाटप झाले आहे. अनेक आंबेडकरी उमेदवारांनी भाजपचा आसरा घेतला आहे. आता जर आम्ही यांना मतदान केले तर आम्ही आमचा भविष्य काळ पुसून टाकू. कारण स्थानिक स्तरापासून ते दिल्लीपर्यंत जातीयवादी पक्ष बळकट होतील. सध्या राज्यसभेत भाजपाला बहुमत नसल्याने कायदा पारित करण्यासाठी फार झगडावे लागते. आता जर आम्ही जात बघून  मतदान केले आणि जर २०१९ ला भाजप सत्तेत आला तर राज्यसभेतही या पक्षाचे बहुमत होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अप्रत्यक्षपणे यात आपापली मोलाची भूमिका उमटवितात. आणि एकदा का जातीयवादी पक्ष सत्तेत आला तर प्रत्येक कायदा विना अडथळा पास होणार. बहुजनांच्या हक्कांवर गदा  आणली जाईल. शिक्षण, नोकर भरती सगळे दरवाजे बंद होतील. त्यामुळे आता  जातीचा विचार करू नका त्या पेक्षा पक्षाचा विचार  करा.
      उमेदवार कोणत्या पक्षाकडून उभा आहे ते पहा.  'तुम्ही जातीसाठी माती खायला' तयारही  असाल पण तुमचा उमेदवार तुमच्यासाठी माती खायला तयार नाही त्याचे काय? तुमच्या बद्दल, बाबासाहेंबाबद्ल त्याला काहीच वाटत नाही त्याला तुमचे  काही देणे घेणे नाही. म्हणून तर हा जातीयवादी पक्षाकडे गेला आहे. आता त्याचा बाप बाबासाहेब आंबेडकर नसून हेडगेवार,गोळवलकर,सावरकर  हे त्याचे बाप आहेत. पक्षाच्या पुढे  कोणताही उमेदवार काहीच करून शकत नाही. पक्षाच्या विरोधात तो मतदान करू शकत नाही कारण त्याचे सदस्यत्व रद्द होते. सत्तेसाठी आमचे 'डुप्लिकेट' वाघ लाचार झालेत. ते वेळप्रसंगी सत्तेला, खुर्चीला लाथ मारणार नाहीत. त्यामुळे विनाकारण समाजाने 'जातीसाठी' माती खाऊ नये असे आमचे म्हणणे आहे. . 
     उमेदवार जेंव्हा तुमच्याकडे मत मागायला येईल तेंव्हा त्याला विचारा , ' बाबा रे आमचा रोहित वेमुला तुमच्या पक्षाने मारला. त्याला न्याय कधी मिळणार? एस. सी. ,एस. टी ,ओ . बी. सी. यांच्या नोकऱ्यांचे प्रमाण तुझ्या पक्षाचे सरकार सत्तेत  आल्याबरोबर इतके कमी कसे झाले? नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प मांडला  गेला त्यात  एस. सी. ,एस. टी यांची तरतूद मागच्या वेळेस पेक्षा कमी का केली? अखलाखला न्याय कधी मिळणार? मुसलमानांना तुमचा पक्ष पाकिस्तानात पाठवायला निघाला आहे त्या बाबतीत तुमचे काय मत? मग आम्ही तुला मत का द्यायचे?
      'खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' हे जातीयवादी पक्षाचे वागणे आहे. कालपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने   आम्हांला वापरून फेकून दिले. आता  भाजप सेनेवाले तेच करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेत आता  आम्हाला निळे झेंडे दिसत आहेत. स्टेजवर बाबासाहेबाचा  फोटो दिसत आहे. बंधू भगिनींनो  याला बळी  पडू नका.
       मग आम्ही काय करायचे? मतदान कुणाला करायचे? यावेळेस आम्हाला चार वेळा बटन दाबायचे आहे. प्रभागातून चार उमेदवार निवडून द्याचे आहेत. आंबेडकरी समाजाची ताकद ही 'हत्तीची ताकद' आहे. त्यामुळे आपली ताकद दाखविण्याची ही  योग्य वेळ आहे. मतदान करताना आंबेडकरी विचारधारेच्या राष्ट्रीय पक्षाच्या तसेच स्थानिक आंबेडकरी पक्षांचे  पर्याय आमच्या समोर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत केवळ पक्ष बघूनच मतदान करा. भलेही  तुमचा उमेदवार तगडा नसेल, श्रीमंत नसेल, तुमची त्याच्या सोबत ओळखही नसेल पण तो आंबेडकरी पक्षाचा आहे हे बघूनच मतदान करा. जातीयवादी पक्ष मजबूत करण्यापेक्षा आम्ही आमचे पक्ष मजबूत करू. त्यांच्या मतांची टक्केवारी वाढवू.
     काही जण म्हणतील मग विकासाचे काय? नाही तरी आजपर्यंत कसला विकास झाला आहे? रस्ते, पाणी, गटारी शहरात किती भागात उपलब्ध आहेत.? गावकुसाबाहेर बहिष्कृत म्हणूनच आपण जगत होतो. आमच्याच भागाचे उदाहरण घ्या. नालंदा नगरात आज ज्या काही थोड्या फार नागरी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत ते इथल्या नागरिकांनी महानगरपालिकेशी भांडून, आयुक्तांशी भांडून मिळविल्या आहेत. कोणत्याच नगरसेवकाची मदत नालंदा नगरला मिळाली नाही.
    त्यामुळे या निवडणुकीत लाचारी पत्करणारा , जातीयवादी पक्षाच्या आश्रयास गेलेल्या उमेदवाराला एकाकी पाडा आणि स्वाभिमानी उमेदवार निवडून आणा. जातीचे गाजर दाखवून तुम्हाला लुटायला बसलेल्या जातीयवादी पक्षांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. 

बुद्धजय भालशंकर (भीमटोलाकार)
अभियंता, सोलापूर
मो. ९९६०३७२७३६
         (सा. बहुजन आवाजच्या १३ ते १९ फेब्रुवारी २०१७ अंकात प्रकाशित) 




Sunday, February 12, 2017

अग्रलेखांचा बादशहा




      पुरोगामी महाराष्ट्राला थोर अग्रलेखांची परंपरा आहे. किंबहुना या थोर अग्रलेखांमुळेच महाराष्ट्राला पुरोगामीत्व लाभले आहे, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.याचे महत्वाचे कारण म्हणजे या थोर अग्रलेखाचे लेखन पुरोगामीत्व घडवणारे होतेच पण त्यांचे आचरणही पुरोगामी होते.
   मात्र काळाच्या ओघात अग्रलेखांचे आचरण किंवा कृती आणि प्रत्यक्ष लिखाण यात फरक जाणवू लागला आणि लिखाणातही तटस्थपणाऐवजी सोयिस्करपणा जाणवू लागला. आणि त्याच मुळे पूर्वीच्या थोर परंपरेच्या अग्रलेखांची कमतरता जाणवू लागली. या  पार्श्वभूमीवर सडेतोड,वास्तववादी,भूमिका मांडणारा एक तरुण अग्रलेखाच्या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राला परिचित होत आहे, ही  स्वागतार्ह बाब आहे.
    विषयाची सूक्ष्म जाण, सडेतोड मांडणी, जात-पात -धर्म  च्या पलीकडे जाऊन मांडलेली वास्तववादी भूमिका प्रत्यक्ष तिखट, झोबणारी पण तितकीच मिश्किल भाषाशैली हे बुद्धजय यांच्या लेखांचे वैशिष्ट्य आहे.
   कोणत्याही गोष्टीकडे त्रयस्थपणे पाहून केलेले विश्लेषण, तितक्याच समर्पक उदाहरणांची साथ,तरुणाला आपलेशी वाटणारी भाषा हे कोणत्याही थोर अग्रलेखाचे गुणधर्म असतात. हे सर्व गुण या तरुणाच्या अग्रलेखांमध्ये दिसून येतात.याचबरोबर कुठलाही विषय असो त्या प्रत्येक विषयाची सखोल चिकीस्था पाहता हा तरुण भविष्यामध्ये पत्रकारितेमधील 'लंबी रेस का घोडा' ठरेल यात शंका नाही.
   भूतकाळात आपण अनेक अग्रलेखांचे बादशहा पाहिले. आमचा हा गुणसंपन्न तरुण मित्रही 'बादशहा' असून या 'बादशहाचे अग्रलेख' वाचण्यासाठी संबंध महाराष्ट्र आतुर झाला आहे. महाराष्ट्रभर हे पुस्तक धुमाकूळ घालेल यात शंका नाही.
  भीमटोला या पुस्तकास आणि बुद्धजय यांच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.    

महादेव कारंडे 
नायब तहसीलदार ,
बीड.

भाच्चीकडून मामाचे कौतुक

भाच्चीकडून  मामाचे कौतुक
---------------------------------------

      'भीमटोला 'ची भाषा आबालवृद्धांना आवडत आहे. प्रत्येक वर्गाला हे पुस्तक आपले वाटत आहे. वाचताना खूपच चांगलं वाटत आहे. मेंदूत काहीतरी अजब घडत आहे असं वाटतं ,अशी प्रतिक्रिया प्रत्येक वाचकांकडून येत आहे.  'भीमटोला ' प्रत्येक वाचकाला आपलासा वाटत आहे याचे समाधान भेटत आहे. आपण काही तरी नवे करू शकलो आणि समाजातील लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे हा आनंद खूप मोठा आहे. लाखो रुपये कमावता येतील ,पण लाख मोलाची माणसं आणि प्रेम नाही कमवता येतं , हे प्रेम मला भेटत आहे याचा खूप अभिमान वाटत आहे.
 ही सारी पुण्याई महामानवाच्या कष्टाची आणि भारतीय संविधानाची !