Tuesday, April 4, 2017
Tuesday, March 21, 2017
Tuesday, March 7, 2017
बायकोचे नटणे आवडले; सोशल मीडिया वरही भीमटोलाची चर्चा
-----------------------------------------
मागच्या अंकात प्रकाशित झालेला *" अजून किती दिवस दुसऱ्याची बायको नटविणार?"* हा भीमटोला वाचकांना खूप आवडला. सोशल मीडिया वरही हा भीमटोला शेयर करण्यात आला. अनेक व्हाट्स अप ग्रुप मध्ये हा भीमटोला फिरत होता. अनेक वाचकांनी पेपर सोबतच ब्लॉग वर ही हा भीमटोला वाचला. भीमटोलाने सडेतोड आणि वास्तवदर्शी भूमिका मांडली आहे अशी प्रतिक्रिया अनेक वाचकांनी दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या बंगलोर येथील अधिकारी मोनाली मेश्राम यांनी भीमटोलाच्या कल्पकतेचे कौतुक केले.
वेगळ्या मांडणीतून राजकीय विषय मांडला असून समाजाला विचार करायला लावणारा हा भीमटोला आहे अशी प्रतिक्रिया सांगलीहून आशुतोष कसबे,पुण्यातून महेश लोंढे ,सोलापुरातून विजयकुमार लोंढे, अंगद जेटिथोर यांनी दिली.महेश क्षिरसागर यांनाही हा भीमटोला आवडला. *खबरदार...! जात बघून मतदान कराल तर* हा भीमटोला सुद्धा खूप छान होता अशी प्रतिक्रिया सोलापुरातील वाचक अंजली साबळे यांनी दिली. बहुजन आवाजचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. वाचकांच्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत.
-संपादक
Monday, March 6, 2017
हीच का रे तुमची संस्कृती ?
गुरमेहर कौर. दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज मध्ये शिकणारी युवती. सध्या राष्ट्रवादाचा उमाळा आल्या कारणाने ती चर्चेत आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी खऱ्या अर्थाने आम्हांला स्वातंत्र मिळाले. पण हे स्वातंत्र समाजातील सर्वच घटकांतील लोकांना मिळाले का ? हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही या देशात प्रश्नच विचारायचे नाहीत का? जरा वेगळे मत मांडायचे ठरवले की राष्ट्रवादाची नवी जमात हातात काठ्या, दंडुके घेऊन लगेच रस्त्यावर उतरते. आणि आम्हांला राष्ट्रप्रेम शिकवू लागते. या जमातीच्या लोकांच्या दृष्टीने राष्ट्रवाद म्हणजे पाकिस्तानला शिव्या घालणे , जमेल तितका मुस्लिम द्वेष करणे हा आहे. राष्ट्रवाद कश्यासोबत खातात हे सुद्धा या बांडगुळांना माहित नाही. राष्ट्रवादाचा केवळ तमाशा यांनी मांडला आहे. यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे चित्र सध्या गुरमेहरच्या प्रकरणातून दिसून येत आहे.
दिल्लीतील रामजंस कॉलेज मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप ) गोंधळ घातला. त्यावरूनच गुरमेहरने मी अभाविपला घाबरत नाही अशी पोस्ट सोशल मीडिया वर टाकली.. एक मुलगी आपल्या विरोधात बोलत आहे हे मुळातच नारी संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या जमातीला आवडले नाही. त्यांनी एक वर्षांपूर्वीचा (२ मे २०१६ ) तिचा यूट्यूब वरचा एक विडिओ काढला आणि त्यातील आपल्या सोयीचा भाग कट करून तिची बदनामी सुरु केली. गुरमेहरने अभाविपच्या विरोधात आवाज उठविल्यामुळे तिला बलात्काराच्या धमक्याही मिळाल्या. अभाविप मुळातच मूर्खांची टोळी आहे, संघटना नाही. आपले म्हणणे समोरच्याने ऐकले नाही की लगेच हिंसाचारावर उतरणारी ही टोळी. यांचं बिनडोकपणाचं वागणं एक वेळेस समजून घेता येईल. पण देशाचे गृहराज्यमंत्री आणि भाजपचे खासदार जर गुरमेहरला धमकावीत असतील तर हि लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे. कलम १९ नुसार राज्यघटनेने ' अभिव्यक्ती स्वातंत्र' दिले आहे. मंत्र्यांचं, संसदीय सदस्यांचे काम लोकशाहीचे संरक्षण करणे आहे. इथे तर देशाचे गृहराज्यमंत्री लोकशाहीचा गळाच दाबत आहेत. मुळातच एक सामान्य व्यक्ती त्यात एक मुलगी एकटी आपल्या विरोधात बोलत आहे याची भीती सरकारला आणि अभाविपला वाटत आहे. हे असं धाडस तू कस करू शकते? हे यांना मुळातच पटले नाही त्यामुळेच मग त्यांनी आपल्या भोंगळ्या विचारसरणीचे दर्शन साऱ्या जगाला दिले.
२ मे २०१६ ला नेमका कोणता विडिओ गुरमेहरने पोस्ट केला होता? आज ही हा विडिओ यूट्यूब वर आहे. या विडिओ मध्ये गुलमोहर म्हणते, " मी २ वर्षाची असताना माझे वडील १९९८ च्या कारगिल युद्धात मारले गेले. एक प्रकारचा राग माझ्याही मनात पाकिस्तान आणि मुस्लिमांबद्दल निर्माण झाला होता. ६ वर्षाची असताना मी एका बुरखाधारी महिलेवर चाकूने हल्ला केला. तेंव्हा माझ्या आईने मला सांगितले की बाळा तुझ्या वडिलांना पाकिस्तानने मारले नाही तर युद्धाने मारले". (एका ओळीचा हा एवढाच भाग अभाविप दाखवीत आहे.) विडिओ मध्ये पुढे ती म्हणते की. " मुळातच युद्ध होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. दोन जवळच्या देशात शांततेचे संबंध निर्माण झाले पाहिजेत. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये शांतीचे संबंध निर्माण होण्यासाठी मी प्रयत्न करेन. एका युद्धामुळे माझे वडील गेले पुढच्या काळात तरी कुणाचे वडील जाऊ नये". हा विडिओ संपूर्णपणे न पाहताच गुरमेहरवर राष्टद्रोहाचा शिक्का मारायला वीरेंद्र सेहवाग सारखे खेळाडू पुढे सरसावले. आपल्या अज्ञानपणाचे दर्शन देऊन त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले.
गुरमेहरच्या व्हिडिओचा परिणामही झाला. ऑस्ट्रेलिया मध्ये असणाऱ्या फय्याज खान नावाच्या पाकिस्तानी युवकाने हा विडिओ पाहिला. आणि त्याला तो आवडला. त्याने लगेचच प्रतिक्रिया दिली, " गुरमेहर तू चांगलं मत मांडलं आहेस. मी तुझ्या मताशी सहमत आहे. तुझ्या वडिलांना तर मी परत आणू शकत नाही. पण मी तुला एका भावाचे प्रेम जरूर देऊ शकतो. मला भारतात यायचे आहे आणि त्यासाठी कोणत्याही व्हिसाची गरज लागणार नाही असे राष्ट्र आपण निर्माण करू. सीमेपलीकडे अनेक गुरमेहर आहेत ज्यांना शांतता हवी आहे. भारत आणि पाकिस्तान हे सध्या शत्रू राष्ट्र आहेत पण आपण एकत्र येऊन या दोन्ही राष्ट्राला बहीण भावाचे राष्ट्र बनवू." यात चुकीचे काय आहे ? मानवतावाद हा राष्ट्रवादापेक्षा मोठा नाही का? मानवतावादासाठी काम करणे चुकीचे आहे काय? " अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांनी , क्रीडापटूंनी, सिने सृष्टीतील तारकांनी गुरमेहरला राष्ट्रद्रोही ठरवून टाकले. आपण भारतीय इतके प्रतिक्रियावादी झालो आहोत की सत्य समजून न घेताच पटकन प्रतिक्रिया देऊन टाकतो. यात मात्र मानवतावाद सांगणाऱ्या निष्पाप गुरमेहर सारख्या लोकांचा बळी जातो.
हे सर्व घडत असताना सत्तेचा माज सुद्धा दिसून आला. देशातील जनतेच्या जीवाची काळजी घेण्याचे काम सरकारचे आहे. पण आमचे गृहराज्यमंत्री रिजिजू मात्र गुरमेहरलाच धमकावीत आहेत.तिला संरक्षण देण्याचे सोडून राष्ट्रवाद शिकवीत आहेत. काय हे वागणे ?
राष्ट्रवादाचा टेंभा मिरवणाऱ्या आणि थोर संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या नरड्याना आमचा सवाल आहे- "एकीकडे आम्ही नारीला देवीचा दर्जा देतो, आम्ही नारीला पुजतो म्हणून गळा काढून लोकांना सांगायचं आणि जरा नारीने आपल्या विरोधात बोलले की तिला धमकावायचं, तिला शिवीगाळ करायची, तिच्यावर बलात्कार करू म्हणायचं. हीच का रे तुमची संस्कृती ?"
बुद्धजय भालशंकर(अभियंता)
मो. ९९६०३७२७३६
(सा. बहुजन आवाजच्या ६ मार्च ते १२ मार्च २०१७ या अंकात प्रकाशित )
.
Thursday, March 2, 2017
भीमटोला म्हणजे वर्मावर घाला
बुद्धजयजी आपले "भीमटोला" पुस्तक वाचले अन वाटलं की आपण फुले, शाहू, आंबेडकरांचा सांगावा घेऊन आलात. आपण व्यवसायाने अभियंता, सुंदर इमारती उभ्या करणं आपलं काम पण आपण असाही एक अभियंता आहात की जो सुसंस्कृत समाजमनाची सुंदर इमारत उभी करण्याचे काम भीमटोलाच्या माध्यमातून करत आहे.
शब्दांना आकार देणे सोपं असतं पण त्यांना आत्मा देणे अवघड असतं.आपल्या लेखणीतून शब्दांना आपण आत्मा दिला म्हणून भीमटोला गाजतो आहे.
" भले तर देऊ कासेची लंगोटी,
नाठाळाच्या माथी हाणू काठी "
या संत तुकारामाच्या वचनाप्रमाणे आपली लेखणी कार्य करते आहे. ज्याच्या त्याच्या कामाचे मोल आपण भीमटोलाच्या माध्यमातून करत आहात. आपणांस हे बाळकडू लहानपणापासूनच प्यायला मिळाले हे आपलं भाग्यच म्हटलं पाहिजे.
माश्यांच्या पिलांना पोहायला शिकवावं लागत नाही. वाघाच्या पिलांना शिकार करायला शिकवावं लागत नाही. मोर पिसांना रंग द्यावा लागत नाही. एवढंच कशाला म्हणतात ना, "गवयाचं लेकरू सुरातच रडतं" त्याचप्रमाने आपणास लिहायला सांगावं लागत नाही. बहुजन आवाजच्या माध्यमातूनही आपल्या लेखणीचा सुगंध आम्हां पर्यंत पोहचतो आहे. आपली लेखणी रसिकांच्या मनःपटलावर अशीच अधिराज्य गाजवत राहो ही सदिच्छा व आपल्या कार्यास आभाळभर शुभेच्छा!
आयु. भास्कर गायकवाड (मुख्याध्यापक )
वेळापूर, ता. माळशिरस
Sunday, February 26, 2017
अजून किती दिवस दुसऱ्याची बायको नटविणार ?
सत्ता नावाची सुंदरी प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते. ती मोहक तर असतेच असते पण तिची ताकदही फार मोठी असते. तिच्या जोरावर तुम्ही भल्या भल्या लोकांना वाकवू शकता ,आपल्या बोटांवर नाचवू शकता. त्यामुळेच तर मग साम-दाम -दंड-भेद वापरून सत्ता नावाच्या सुंदरीसोबत विवाह करण्यास नवरदेव उत्सुक असतात. केंद्राची सत्तासुंदरी सध्या नरेंद्राच्या ताब्यात आहे तर महाराष्ट्राची सत्तासुंदरी देवेंद्रच्या ताब्यात आहे. स्थानिक पातळीवरची सत्ता सुंदरीही नुकतीच नरेंद्र, देवेंद्र यांच्या घराण्यातच नांदायला गेली आहे. सत्ता सुंदरी आपल्याच घराण्यात यावी यासाठी देवेंद्रने चांगलाच जोर लावला होता. त्यासाठी प्रसंगी गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची ताकद वाढवली.त्यांच्या कष्टाचे चीजही झाले असेच म्हणावे लागेल.
आम्ही बहुजन, दलित मात्र या सत्तासुंदरी सोबत अजूनही विवाह करू शकलो नाही. आमची ताकद नाही अशातला भाग नाही. आम्ही आमची ताकद दुसऱ्यांच्या वरातीत नाचण्यात घालवत आलो आहोत. आणि त्याबद्दल आमच्या नेते नावाच्या नवरदेवाला कसल्याही प्रकारची लाजही वाटत नाही हे सुद्धा विशेष. कालपर्यँत आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरातीत भान विसरून नाचत होतो आणि आज भाजपच्या वरातीत नाचत आहोत. दुसऱ्याच्या वरातीतच नाचण्यात आम्हांला धन्यता वाटते. सत्तासुंदरी आमच्या बळावर मिळवण्यासाठी आम्ही कसलाच प्रयत्न करीत नाही. डिजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग असतात आम्ही पण त्याच प्रमाणे पैशाच्या तालावर आणि दारूच्या नशेत पार गुंग होऊन नाचत असतो.
आमची काही विद्वान लोक म्हणतील की भाजप मधून पण आमचे लोक, आमच्या जातीची माणसं निवडून आलीच आहेत की. आमचे वाघ आता डरकाळ्या फोडणार आहेत... वगैरे वगैरे. अहो, विद्वान लोकहो सत्ता कोणत्या पक्षाची आहे ? तुमचे स्थान त्या पक्षात काय आहे ? आमचे वाघ स्वतःचे हक्काचे घर सोडून दुसऱ्याच्या महालात गेले आहेत पण ते त्याचे मालक नाहीत तर त्याचे आश्रित आहेत. वेळ संपताच तुमच्या उमेदवाराला लाथा मारून बाहेरही काढतील. तुम्ही वाघ असा अगर अजून कोणी तुम्हाला त्यांच्या घरात शेळी बनूनच रहावं लागेल त्याच काय ? भाकरी पेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या असे सांगणारा महामानव आमचा बाप आहे असे आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून माईक वर सांगतो. आणि स्टेज वरून खाली येताच पुन्हा लाचारी करायला मोकळे होतो. बाबासाहेबांचे नाव घेऊन, त्यांचा फोटो घेऊन आमचे नेते बाबासाहेबांना दिवसाढवळ्या विकत आहेत आणि आम्ही पण अश्याच नेत्यांना निवडून देऊन " खरकट्या हातात निळा झेंडा घेऊन, उष्ट्या तोंडाने " जय भीम म्हणत आहोत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही.
खरं तर यावेळेस सत्ता सुंदरी आमच्यावर फिदा झाली असती. कोणतीही सुंदरी असो ती ताकदवर माणसाच्या प्रेमात पडते. सत्ता सुंदरीचं पण तसच आहे. या निवडणुकीत मुळातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गांगरून गेले होते. शक्तीहीन झाल्यामुळे ते दिशाहीनही झाले होते. त्यामुळे सत्तेच्या स्वयंवरातील दोन स्पर्धक आपोआपच गार झाले होते. आणि राहिलेले दोन आपापसात भांडत होते. त्यामुळे आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून "तिसरी आघाडी" करून आमचा खंबीर, तगडा नवरदेव रिंगणात उभा करायला हवा होता. यावेळी आम्ही नवरदेवचं उभा केला नाही मग काय डोंबल्याचं लग्न होणार? लेचे पेचे उमदेवार तेही बेकीच्या ताकदीवर उभे राहिले आणि सपाटून पडले . आता फक्त दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं. " कष्ट करायचं ,उष्ट खायचं " एवढेच काय ते आमचे जीवन.
याला जितके नेते कारणीभूत आहेत तितकीच कारणीभूत आमची जनता आहे. ५ वर्षे शरद पवारला नाव ठेवायची, ५ वर्षे नरेंद्र मोदीला नाव ठेवायची, ५ वर्षे देवेंद्र फडणवीसला नाव ठेवायची आणि बरोबर मतदानाच्या दिवशी पुन्हा त्यांनाच मतदान करायचे. हा निव्वळ बकवासपणा आहे असे आम्हास वाटते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आमच्या राष्ट्रीय पक्षाच्या आणि त्याच प्रमाणे स्थानिक आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारांना किती मते पडली ? केवळ ५००, ७०० च्या घरातच आम्हाला मते मिळाली आहेत. समोर आपला नवरदेव असताना दुसऱ्याच्या नवरदेवाला कसं काय आमच्या लोकांनी घोड्यावर बसवलं समजायला वाव नाही. समाजाने आता ज्यांना घोड्यावर बसविले आहे त्यांच्या "गाढवलाथा" वेळ येताच मिळतीलच. विकला न जाणारा नेता निर्माण करण्यासाठी विकला न जाणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे हेच आम्ही मुळात विसरून गेलो आहोत. विकल्या जाणाऱ्या आणि आंधळेपणाने मतदान करणाऱ्या आमच्या समाजबांधवांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या , प्रामाणिकपणे आंबेडकरी पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांचा हिरेमोड होत आहे. त्यांचे खच्चीकरण होत आहे.
आमच्याकडे ताकद आहे. कष्ट करण्याची वृत्ती आहे. वेळप्रसंगी पैसाही खर्च करू शकतो. मग आमच्या कष्टातून, आमच्या पैशातून दुसऱ्याची बायको आम्ही का नटवायची ? आम्ही आमचीच बायको नटवू शकणार नाही का ? दुसऱ्याची बायको नटवून आम्हांला काय मिळणार आहे.? त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही आमचीच बायको नटवू , सत्तासुंदरी सोबत आम्हीच विवाह करू त्यासाठी आता पासूनच तयारीला लागणे ही काळाची गरज आहे.
बुद्धजय भालशंकर (भीमटोलाकार)
सोलापूर
मो. ९९६०३७२७३६
(सा.बहुजन आवाजच्या २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २०१७ या अंकात प्रकाशित )
Monday, February 20, 2017
अशी ही बनवा बनवी.
मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय मनोरंजनात्मक सिनेमा म्हणजे 'अशी ही बनवा बनवी'. हसून हसून बेजार करायला लावणारा हा चित्रपट आज ही टीव्हीवर लागला की आवर्जून पाहिला जातो. पुरुष असूनही स्त्री भासवून राहण्यासाठी जागा पटकावली जाते आणि त्यातून घडणारे मजेशीर किस्से या चित्रपटात आहेत. अभिनय कसा करायचा हे या चित्रपटाकडून शिकावे लागेल. मुळातच तुम्ही वेगळे आहात पण काही तरी मिळवण्यासाठी तुम्हांला संपूर्णपणे बदलावे लागते. प्रसंगी पुरुषाची स्त्री सुद्धा व्हावं लागतं. आता या सिनेमाची आठवण अशी मध्येच का झाली ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या चित्रपटाची आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या आमच्या आणि तुमच्याही आजूबाजूला हा चित्रपट घडत आहे. आणि दर पाच वर्षांनी हा चित्रपट पुन्हा आपल्या वास्तव जीवनात घडत असतो. निवडणुकीच्या हंगामात हमखास आम्हांला 'बनवाबनवी' ची प्रचिती येते.
सध्या स्थानिक निवडणुकीसाठी 'बनवाबनवी' ची पात्रे ज्यांना निवडणूक भाषेत 'उमेदवार' असे म्हटले जाते. तर या उमेदवारांचा अभिनय पाहून तर आम्हांला बुवा हसायलाच येत. अतिशय भारी मनोरंजन आमचे सध्या होत आहे.(मनोरंजनाची सोय केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार ) या उमेदवारांच्या चेहऱ्यावरील भाव, बोलण्यातील नम्रता, हात जोडणे काय, जेष्ठ व्यक्ती दिसली रे दिसली की पाया पडणे काय? बिचाऱ्या जेष्ठ नागरिकांची किती पंचायत होत आहे. कोण कधी येईल आणि पाय धरेल याचा नेम नाही. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. आणि आशीर्वाद तरी किती जणांना द्यायचा.? उमेदवार पण इतकं नम्र बोलत आहेत की 'सदाशिव पेठेतील' मराठी पण फिकी पडेल. ताई, आई ;लक्ष असू द्या. आजी तुमची सेवा करायची संधी द्या. ( खरं तर 'मेवा खायची' साधी द्या) . आमचंच बटण दाबा. आमच्या पक्षाला मत म्हणजे विकासाला मतं ( 'डोंबल्याचा विकास?' आजीच्या मनात येणारा विचार). आम्ही निवडून आलो की तुमच्या प्रभागाचा विकास करू. असे ठरलेले डायलॉग प्रत्येक उमेदवार मारतो.खरंतर आता हे डायलॉग खूप बोअर झाले आहेत पण तरीही या डायलॉगचा मोह उमेदवारांना सुटत नाही.
आमच्या सोलापुरात इतकी भारी अभिनय संपन्न व्यक्ती आहेत हे पाहून आमची छाती ५६ इंचाची झाली आहे. विकासाची भाषा प्रत्येकाच्या तोंडी आहे, त्यामुळे सोलापूर आता 'स्मार्ट' होऊन सिंगापूरला पण मागे टाकतं का काय अशी स्वप्नं आम्हांला या नेत्या मंडळींची भाषणं ऐकून दिवसाढवळ्या पडत आहेत. इतका जबरदस्त अभिनय हे लोक करत आहेत. सोलापूर म्हणजे ' आबे तुबे ची भाषा. बोलण्यात एक करारीपणा'. पण ही भाषा निवडणूक काळात एकदम गायब . आता अतिशय सौम्य अशी भाषा उमेदवारांच्या तोंडी बघून चमत्कार झाल्याचा भासच आम्हांला होत आहे. या आनंदाच्या भरात पटकन सदाशिव पेठेत जावे एक शेंडीवाला पकडावा आणि त्याला म्हणावं ," चलं सोलापुरात आता शुद्ध भाषा ही तुझी मक्तेदारी राहिली नाही.बघ आमचं सोलापूर कसं भाषेच्या बाबतीत चकचकीत झालं आहे ". निवडणुकीतील अनेक उमेदवारांना आपण हरणार आहोत हे चांगलेच माहित असतं. पण तरीही त्यांच्या बोलण्यात, चेहऱ्यावर ते मुळीच जाणवू देत नाहीत. त्यांचा चेहऱ्यावर विजय आमचाच होणार अशी भावना असते. असा अभिनय केवळ निडणुकीतील उमेदवारच करू शकतो. त्यामुळे आम्ही ठरवले आहे या लोकांची शिफारस सरळ ऑस्कर समितीकडे करायची. भारताला खरंच अभिनयाचं ऑस्कर मिळून जाईल.
मतदारांना खुश करण्यासाठी मोफत वाय फायचे स्वप्न दाखवण्यात येत आहे. काही जणांना पार्टी देण्यात येत आहे. पार्टी पण मग ओली सुकी दोन्ही प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीतील 'बनवा बनवीच्या' सिनेमाने मात्र अर्थव्यस्थेला चालना दिली आहे. नोटबंदीनंतर सर्वच त्रस्त झाले होते. लोकांना आता रोजगार भेटला आहे. खायची प्यायची सोय झाली आहे. बाजारात पैसा येत आहे. बकऱ्या ,कोंबड्याच्या भाव वाढला आहे. हॉटेल मालकांचा धंदा जोरात चालू आहे. रॅलीच्या माध्यमातूनही नवी ' रोजगार निर्मिती ' होत आहे. मनरेगा पेक्षा अतिशय फायदेशीर आणि कष्ट न करता रोजगार मिळतो, खायची प्यायची सोयही होते. त्यामुळे प्रत्येकजण यात हात धुवून घेत आहे.
‘बनवा बनवी’ मध्ये सध्या राज्यात सेना भाजपवाले आघाडीवर आहेत. भलेही सत्तेमध्ये भागीदार असले तरी यांचे अजून प्रेम जुळून आले नाही. संसाराला अडीच वर्षे होत आली तरी यांच्या कुरबुरी मिटल्या नाहीत. विधानसभेच्या वेळीस यांनी अतिशय भारी परफॉर्मन्स अभिनयात दिला होता. एकमेकांवर काय चिखलफेख केली होती. (आणि जनतेच्या डोळ्यांत धूळफेखही) . इतिहासचं या लोकांनी उकरून काढला होता. अफजलखानाच्या फॊजा काय ? वेगवेगळी विशेषणं एकमेकांना वापरून समोरच्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याच अफजलखानाच्या फोजा सोबत मौजा मारताना जनाची नाही पण मनाचीही यांनी ठेवली नाही. सध्या काहीजण औकात दाखवण्याची भाषा करीत आहेत. मातोश्रीवाले म्हणत आहेत की भाजप गुंडाचा पक्ष आहे तर नागपूरवाले म्हणत आहेत शिवसेना खंडणीखोरांचा पक्ष आहे. एकमेकांची उणीधुणी जाहीररित्या काढली जात आहे. प्रचाराची भाषा पार रसातळाला गेली आहे. खंडणीखोर, गुंड मग एकमेकांना साथ का देत आहेत? इतकाच तिटकारा आहे तर मग सत्ता का सोडत नाहीत? सत्ता यांना सुटणार नाही. आता हे एकमेकांना शिव्या देत आहेत पण निवडणुका झाल्या आणि गरज पडली तर पुन्हा एकमेकांना मिठ्या मारतील. एकमेकांचे गोडवे गातील.
उमेदवारांच्या सोबतच मतदारांचा अभिनय पण जबरदस्त असतो. प्रत्येक उमेदवाराला आश्वासन दिले जाते, आमचं मत तुम्हालाच. काळजी करू नका तुम्ही. या वेळीस तुम्हीच ‘भाऊ नगरसेवक’. आपल्याच वहिनी निवडून येणार. चिंता नसावी. आमच्यासहित आपण प्रत्येकाने आपल्या भागातील उमेदवारांना हेच आश्वासन दिले आहे हे आम्ही जाणतोच. शेवटी मत ज्याला द्यायचे त्यालाच दिले जाणार आहे.
उमेदवार कितीही अभिनय करो, तो अभिनय किती खरा किती खोटा हे ठरवणारा असतो तो मतदार. कुणाला पाडायचे कुणाला निवडून द्यायचे हे मतदार नावाची समीक्षा यंत्रणा ठरवत असते. आत्ताचे मतदार हे अतिशय सुज्ञ झाले आहेत. कोण ढोंगीपणाने वागत आहे आणि कोण तळमळीने बोलत आहे हे आता मतदार लगेच ओळखतात. बनवा बनवीच्या चित्रपटाला किती यश मिळवून द्यायचं हे मतदार राजा ठरविणार आहे. भल्या भल्या मात्तबरांना पाणी पाजण्याची किमया मतदार राजाने केली आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे निकाल लागण्याची शक्यता सध्या जास्त आहे. हा लेख वाचेपर्यंत तुम्हांला उमेदवारांच्या बनवा बनवीचा आणि त्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद काय आहे याची प्रचिती आली असेल. अनेक ठिकाणी धक्कादायक निकालही आले असतील. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. किती ही बनवा बनवी केली तरी आपले पितळ उघडे पडणारच आहे मग तो चित्रपट असो किंवा वास्तवातील जगणं असो.
बनवा बनवीचा नाद सोडून जोपर्यंत निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नावर लढवली जाणार नाही तो पर्यंत आमची लोकशाही यशस्वी होणार नाही. उमेदवारांनी कितीही ' बनवा बनवी' करू द्या शेवटी कुणाला निवडायचे हे सुज्ञ मतदार जाणून आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही या बनवाबनवीचा आनंद लुटत आहोत तुम्हीही लूटा. टेन्शन घ्यायचं काम आपलं नाही ते उमेदवाराचं आहे. त्यामुळे सध्याच्या आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतील उमेदवाराच्या मनातील ओळी आम्ही देत आहोत ------
" बनवा बनवी अशी ही बनवा बनवी,
साडी अशी नेसू आणि गालावरी हसू
ज्याला जसे हवे तसे, तसे दिसू,
भीती वाटे मला कि कुठेतरी फसू
बनवा बनवी अशी ही बनवा बनवी "
बुद्धजय भालशंकर मो. नं. ९९६०३७२७३६
Subscribe to:
Posts (Atom)








