Sunday, February 19, 2017

'भीमटोलाने ' चपराक लगावली आहे.


             वाचकांचा आवाज 
        खबरदार...! जात बघून मतदान कराल तर  हा भीमटोला मागच्या अंकात वाचला . अतिशय सडेतोड प्रहार  बुद्धजय भालशंकर यांनी केला आहे.  वास्तव तर त्यांनी मांडलेच  आहे पण गद्दार आंबेडकर अनुयायांना जोराची चपराक लगावली आहे. त्या बद्दल त्यांचे प्रथमतः हार्दिक अभिनंदन. अतिशय मुद्देसूद असा हा भीमटोला आहे. जातीसाठी तुम्ही माती खायला तयारही असाल पण तुमचा उमेदवार तुमच्यासाठी  माती खायला तयार नाही त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जात बघून मतदान करणाऱ्यांना भानावर आणले आहे. अतिशय जबरदस्त भाषा शैलीतून त्यांनी या भीमटोलाची मांडणी केली आहे.

    व्हॅलेंटाइन डे ची मांडणी सुध्या अप्रतिम. त्यांच्या  कल्पक बुद्धीला तोड नाही. आजच्या तरुण पिढीला  'व्हॅलेंटाइन डे' म्हणजे नेमके काय हे त्यांनी अतिशय चांगली उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे. महापुरुषांची खरोखर वेगळी मांडणी यातून झाली आहे असे मला वाटते. बदलणाऱ्या जीवनशैलीला त्यांच्याच भाषेत महापुरुष समजावून सांगण्याची नवीन पद्धत बुद्धजय यांनी निर्माण केली आहे. असा प्रयोग या पूर्बी कुणीच केला नव्हता.  आजच्या युवकांसमोर हा आदर्श गरजेचा होता. बहुजन आवाजचा मागचा अंक खूपच नाविन्यपूर्ण होता आणि तो संग्रही ठेवण्यासारखा आहे. बहुजन आवाजच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा !!!!

आयु. सतीश सोनवले
जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर 
      
                    

Friday, February 17, 2017

इस्रो बंगलौर,येथे कार्यरत असणाऱ्या तरूणीची भीमाटोला वाचून आलेली प्रतिक्रीया



नव्या वर्षाची सुरुवात "भीमटोला" च्या वाचनाने
       
     नव्या वर्षात चांगली पुस्तके वाचण्याचा मी संकल्प केला आहे. पहिले पुस्तक त्यासाठी मी भीमटोला निवडले.  बुद्धजय तू खरंच फारच भन्नाट लिहलं आहेस. तुझा प्रत्येक लेख अप्रतिम. तुझा प्रत्येक मुद्दा मनाला भावतो.  भाषेवरची तुझी जबरदस्त पकड आहे.
 विषयही वेगवेगळे निवडले आहेस.   "हुंडा नको मामा ,फक्त पोरगी द्या मला "हा लेख मला खूप आवडला. मस्त सुरुवात करून अप्रतिम वास्तव मांडल आहेस. जावयाला तू पार बैलचं करून टाकलं आहेस. तुझा लेख वाचून पोरी
हुंडा देणार नाहीत आणि पोरं हुंडा घेणार नाहीत.  मी तरी ठरवून टाकलं आहे लग्नात हुंडा देणार नाही.
   "नागपूरच्या चड्डिला,बारामतीचा नाडा" हा लेख वाचून तर हसून हसून बेजार झाले.  फारच सही लिहल आहेस तू.
  तुझा पहिला लेख "मास्तर टेन्शन नका घेऊ,आधी झाडू मारा घंटा वाजवा अन् जमलं तर पोरांना शिकवा " हा फारच अप्रतिम. सरकारच्या जी.आर.ला तू बोलायला लावलस.  हसू ही आलं आणि वाईटही वाटलं. फारच त्रास आहे शिक्षकांना,हे तुझ्या लेखातून जाणवलं.
   बाहुबलीच्या लेखातून तू समाजाला  चांगलच फटकारलं आहेस.  तुझे प्रश्न खरेच योग्य आहेत.  समाजचं वास्तव मस्त मांडल आहे तू.  तुझ्या निरीक्षणशक्तीला माझा तर सलाम बाबा. पार वाभाड काढतोस तू.
    "राष्ट्रवादा" वरचा तुझा लेखही फारच  भारी.  बुद्ध,आईंनस्टाईन, आंबेडकर, नेहरू यांची उदाहरणे देऊन खरं तर तू माझ्या सारख्या असंख्य लोकांना भानावर आणलं आहेस.
   खूप चांगल लिहल आहेस तू.  समाजाला दिशादर्शक असं तुझं लिखाण आहे.  55 च्या 55 लेख सुपर आहेत. तुझ्या भाषाशैलीची जादू पुस्तक खाली ठेऊ देत नाही. पुस्तक पूर्णच वाचव लागतं. त्या शिवाय चैन नाही पडत. वाचकांना तू चांगल पुस्तक दिल आहेस. भीमटोला खूप मोठं नाव करणार याची मला खात्री आहे.
  तू मोठा लेखक हो, या साठी माझ्या तुला शुभेच्छा. मी तुझी खूप आभारी आहे कारण एवढं चांगल पुस्तक तू माझ्यासारख्या वाचकांना दिलं आहेस. All  the best.keep it up 💐💐💐
                 -मोनाली मेश्राम
                     बंगलोर

Monday, February 13, 2017

खबरदार... ! जात बघून मतदान कराल तर

 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. सगळीकडे नुसती धावाधाव सुरु झाली. उमेदवारांची पळवापळवीही झाली. काहींनी तर इकडून तिकडे पटापट  उड्याही मारल्या. उंदरांपेक्षाही जलदगतीने उड्या मारण्याचे कौशल्य आपणांस निवडणुकीच्या हंगामात दिसून येते. या निवडणुकीचे वैशिष्ट्य पाहिले तर आमच्या दृष्टीने  भटजी-शेटजींचा पक्ष, जातीयवाद्यांच्या पक्ष धार्मिकपणाचा अहंभाव असणारा पक्ष हा 'बहुजनांचा पक्ष ' झाला आहे. कालपर्यंत काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसने निळ्या झेंड्याचा वापर करून सत्ता उपभोगली.  भाजप, सेनेला बहुजनांचा, दलितांचा, निळ्या झेंड्याचा तिटकारा होता. पण निळ्या झेंड्याशिवाय सत्ता हस्तगत होऊ शकत नाही हे त्यांना समजले असल्यामुळे लागलीच त्यांनी 'नवी झूल' अंगावर पांघरली आहे. केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे स्थानिक पातळीवरही  हा पक्ष सत्तेत येऊ शकतो असा आशावाद निर्माण झाल्यामुळे मग  अनेक पक्षाच्या मातब्बरांनी पक्षनिष्ठा खुंटीवर टांगली आणि 'कमळ ' हातात घेतले. काहींना ते शक्य न झाल्यामुळे  त्याचा जवळचा म्हणून मग शिवधनुष्य हाती घेतले. या कार्यात स्वतःला आंबेडकरी वाघ म्हणवून घेणारे 'लांडगे' मागे राहिले नाहीत हेही विशेष.अनेकांनी भाजपाच्या चिखलात उतरून कमळाला आलिंगन दिले. आमच्या समाजाच्या अनेकांना कदाचित फार मोठा आनंद झाला असेल आपल्या नेत्याला, दादाला, भाऊला, अण्णाला तिकीट मिळाले. तर हा आनंद नाही तर तुमच्या अंधकारमय भविष्याची पाऊलवाट आहे.
       प्रचाराचा धुमधडाका सुरु झाला आहे. घरोघरी, बुध्दविहारात उमेदवार हात जोडून, लोटांगण घालत  येत आहेत. लक्ष असू द्या. मी तुमचाच आहे. त्यात 'मी तुमच्या जातीचा,मी तुमच्या धर्माचा' यावर फार मोठा जोर.मग आमच्या पण लोकांच्या हृदयाला पाझर फुटू लागतो. काहींची मग लगेच टिमकी वाजते, 'आपल्याला  पक्षाचं काय करायचं? आपला माणूस निवडून आला म्हणजे झालं.'  आम्ही इथंच मार  खातो. कालपर्यंत आम्ही याच षड्यंत्रात अडकलो होतो. त्यामुळे आमची राजकीय प्रगती होऊ शकली नाही. नोकरीत जात नको, शिक्षणात जात नको म्हणून बोंबलणारे भाजप, सेनेवाले निवडणुकीत मात्र 'जात' बघूनच तिकीट वाटप करतात. (सर्वच पक्ष असे करतात.) निवडणुकीच्या वेळेस बरं यांना जात आठवते. त्यांना माहिती आहे आमची लोकं जात बघूनच मतदान करतात, धर्म बघूनच मतदान करतात.
    सोलापूरसह महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी जातीची गणितं बघूनच तिकीट वाटप झाले आहे. अनेक आंबेडकरी उमेदवारांनी भाजपचा आसरा घेतला आहे. आता जर आम्ही यांना मतदान केले तर आम्ही आमचा भविष्य काळ पुसून टाकू. कारण स्थानिक स्तरापासून ते दिल्लीपर्यंत जातीयवादी पक्ष बळकट होतील. सध्या राज्यसभेत भाजपाला बहुमत नसल्याने कायदा पारित करण्यासाठी फार झगडावे लागते. आता जर आम्ही जात बघून  मतदान केले आणि जर २०१९ ला भाजप सत्तेत आला तर राज्यसभेतही या पक्षाचे बहुमत होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अप्रत्यक्षपणे यात आपापली मोलाची भूमिका उमटवितात. आणि एकदा का जातीयवादी पक्ष सत्तेत आला तर प्रत्येक कायदा विना अडथळा पास होणार. बहुजनांच्या हक्कांवर गदा  आणली जाईल. शिक्षण, नोकर भरती सगळे दरवाजे बंद होतील. त्यामुळे आता  जातीचा विचार करू नका त्या पेक्षा पक्षाचा विचार  करा.
      उमेदवार कोणत्या पक्षाकडून उभा आहे ते पहा.  'तुम्ही जातीसाठी माती खायला' तयारही  असाल पण तुमचा उमेदवार तुमच्यासाठी माती खायला तयार नाही त्याचे काय? तुमच्या बद्दल, बाबासाहेंबाबद्ल त्याला काहीच वाटत नाही त्याला तुमचे  काही देणे घेणे नाही. म्हणून तर हा जातीयवादी पक्षाकडे गेला आहे. आता त्याचा बाप बाबासाहेब आंबेडकर नसून हेडगेवार,गोळवलकर,सावरकर  हे त्याचे बाप आहेत. पक्षाच्या पुढे  कोणताही उमेदवार काहीच करून शकत नाही. पक्षाच्या विरोधात तो मतदान करू शकत नाही कारण त्याचे सदस्यत्व रद्द होते. सत्तेसाठी आमचे 'डुप्लिकेट' वाघ लाचार झालेत. ते वेळप्रसंगी सत्तेला, खुर्चीला लाथ मारणार नाहीत. त्यामुळे विनाकारण समाजाने 'जातीसाठी' माती खाऊ नये असे आमचे म्हणणे आहे. . 
     उमेदवार जेंव्हा तुमच्याकडे मत मागायला येईल तेंव्हा त्याला विचारा , ' बाबा रे आमचा रोहित वेमुला तुमच्या पक्षाने मारला. त्याला न्याय कधी मिळणार? एस. सी. ,एस. टी ,ओ . बी. सी. यांच्या नोकऱ्यांचे प्रमाण तुझ्या पक्षाचे सरकार सत्तेत  आल्याबरोबर इतके कमी कसे झाले? नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प मांडला  गेला त्यात  एस. सी. ,एस. टी यांची तरतूद मागच्या वेळेस पेक्षा कमी का केली? अखलाखला न्याय कधी मिळणार? मुसलमानांना तुमचा पक्ष पाकिस्तानात पाठवायला निघाला आहे त्या बाबतीत तुमचे काय मत? मग आम्ही तुला मत का द्यायचे?
      'खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' हे जातीयवादी पक्षाचे वागणे आहे. कालपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने   आम्हांला वापरून फेकून दिले. आता  भाजप सेनेवाले तेच करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेत आता  आम्हाला निळे झेंडे दिसत आहेत. स्टेजवर बाबासाहेबाचा  फोटो दिसत आहे. बंधू भगिनींनो  याला बळी  पडू नका.
       मग आम्ही काय करायचे? मतदान कुणाला करायचे? यावेळेस आम्हाला चार वेळा बटन दाबायचे आहे. प्रभागातून चार उमेदवार निवडून द्याचे आहेत. आंबेडकरी समाजाची ताकद ही 'हत्तीची ताकद' आहे. त्यामुळे आपली ताकद दाखविण्याची ही  योग्य वेळ आहे. मतदान करताना आंबेडकरी विचारधारेच्या राष्ट्रीय पक्षाच्या तसेच स्थानिक आंबेडकरी पक्षांचे  पर्याय आमच्या समोर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत केवळ पक्ष बघूनच मतदान करा. भलेही  तुमचा उमेदवार तगडा नसेल, श्रीमंत नसेल, तुमची त्याच्या सोबत ओळखही नसेल पण तो आंबेडकरी पक्षाचा आहे हे बघूनच मतदान करा. जातीयवादी पक्ष मजबूत करण्यापेक्षा आम्ही आमचे पक्ष मजबूत करू. त्यांच्या मतांची टक्केवारी वाढवू.
     काही जण म्हणतील मग विकासाचे काय? नाही तरी आजपर्यंत कसला विकास झाला आहे? रस्ते, पाणी, गटारी शहरात किती भागात उपलब्ध आहेत.? गावकुसाबाहेर बहिष्कृत म्हणूनच आपण जगत होतो. आमच्याच भागाचे उदाहरण घ्या. नालंदा नगरात आज ज्या काही थोड्या फार नागरी सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत ते इथल्या नागरिकांनी महानगरपालिकेशी भांडून, आयुक्तांशी भांडून मिळविल्या आहेत. कोणत्याच नगरसेवकाची मदत नालंदा नगरला मिळाली नाही.
    त्यामुळे या निवडणुकीत लाचारी पत्करणारा , जातीयवादी पक्षाच्या आश्रयास गेलेल्या उमेदवाराला एकाकी पाडा आणि स्वाभिमानी उमेदवार निवडून आणा. जातीचे गाजर दाखवून तुम्हाला लुटायला बसलेल्या जातीयवादी पक्षांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. 

बुद्धजय भालशंकर (भीमटोलाकार)
अभियंता, सोलापूर
मो. ९९६०३७२७३६
         (सा. बहुजन आवाजच्या १३ ते १९ फेब्रुवारी २०१७ अंकात प्रकाशित) 




Sunday, February 12, 2017

अग्रलेखांचा बादशहा




      पुरोगामी महाराष्ट्राला थोर अग्रलेखांची परंपरा आहे. किंबहुना या थोर अग्रलेखांमुळेच महाराष्ट्राला पुरोगामीत्व लाभले आहे, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही.याचे महत्वाचे कारण म्हणजे या थोर अग्रलेखाचे लेखन पुरोगामीत्व घडवणारे होतेच पण त्यांचे आचरणही पुरोगामी होते.
   मात्र काळाच्या ओघात अग्रलेखांचे आचरण किंवा कृती आणि प्रत्यक्ष लिखाण यात फरक जाणवू लागला आणि लिखाणातही तटस्थपणाऐवजी सोयिस्करपणा जाणवू लागला. आणि त्याच मुळे पूर्वीच्या थोर परंपरेच्या अग्रलेखांची कमतरता जाणवू लागली. या  पार्श्वभूमीवर सडेतोड,वास्तववादी,भूमिका मांडणारा एक तरुण अग्रलेखाच्या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राला परिचित होत आहे, ही  स्वागतार्ह बाब आहे.
    विषयाची सूक्ष्म जाण, सडेतोड मांडणी, जात-पात -धर्म  च्या पलीकडे जाऊन मांडलेली वास्तववादी भूमिका प्रत्यक्ष तिखट, झोबणारी पण तितकीच मिश्किल भाषाशैली हे बुद्धजय यांच्या लेखांचे वैशिष्ट्य आहे.
   कोणत्याही गोष्टीकडे त्रयस्थपणे पाहून केलेले विश्लेषण, तितक्याच समर्पक उदाहरणांची साथ,तरुणाला आपलेशी वाटणारी भाषा हे कोणत्याही थोर अग्रलेखाचे गुणधर्म असतात. हे सर्व गुण या तरुणाच्या अग्रलेखांमध्ये दिसून येतात.याचबरोबर कुठलाही विषय असो त्या प्रत्येक विषयाची सखोल चिकीस्था पाहता हा तरुण भविष्यामध्ये पत्रकारितेमधील 'लंबी रेस का घोडा' ठरेल यात शंका नाही.
   भूतकाळात आपण अनेक अग्रलेखांचे बादशहा पाहिले. आमचा हा गुणसंपन्न तरुण मित्रही 'बादशहा' असून या 'बादशहाचे अग्रलेख' वाचण्यासाठी संबंध महाराष्ट्र आतुर झाला आहे. महाराष्ट्रभर हे पुस्तक धुमाकूळ घालेल यात शंका नाही.
  भीमटोला या पुस्तकास आणि बुद्धजय यांच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.    

महादेव कारंडे 
नायब तहसीलदार ,
बीड.

भाच्चीकडून मामाचे कौतुक

भाच्चीकडून  मामाचे कौतुक
---------------------------------------

      'भीमटोला 'ची भाषा आबालवृद्धांना आवडत आहे. प्रत्येक वर्गाला हे पुस्तक आपले वाटत आहे. वाचताना खूपच चांगलं वाटत आहे. मेंदूत काहीतरी अजब घडत आहे असं वाटतं ,अशी प्रतिक्रिया प्रत्येक वाचकांकडून येत आहे.  'भीमटोला ' प्रत्येक वाचकाला आपलासा वाटत आहे याचे समाधान भेटत आहे. आपण काही तरी नवे करू शकलो आणि समाजातील लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे हा आनंद खूप मोठा आहे. लाखो रुपये कमावता येतील ,पण लाख मोलाची माणसं आणि प्रेम नाही कमवता येतं , हे प्रेम मला भेटत आहे याचा खूप अभिमान वाटत आहे.
 ही सारी पुण्याई महामानवाच्या कष्टाची आणि भारतीय संविधानाची !

feedback


भीमटोला पुस्तकाला आलेली प्रतिक्रिया

                          "भीमटोला" मुळे समाजकार्याचा रथ नक्की पुढे जाणार  




    भीमटोला हे पुस्तक हातात घेतले आणि सुरवातीचे काही लेख लगेच वाचूनही काढले. अतिशय बेधडक पणे बुद्धजय याने लिखाण केले आहे. आजच्या तरुण पिढीचे वाचन, लिखाण नाही. पण बुद्धजय याला अपवाद आहे. घणाघाती लिखाणाची त्याची शैली जबरदस्त आहे. बाबासाहेब एकदा म्हणाले होते की, " समाजकार्याचा रथ जो मी इथपर्यंत आणला आहे तो पुढे नेता नाही आला तरी चालेल पण मागे मात्र नका नेऊ. " बुद्धजयचा भीमटोला वाचून मनात नवीन आशावाद निर्माण झाला आहे की हा रथ नक्की पुढे जाईल. ती ताकद मला बुद्धजयच्या लिखाणात दिसून येते. अभियंता लेखक कसा असू शकतो हा खरा  तर मोठा प्रश्नच आहे,  आणि तोहि इतका झुंजार लेखक. कुणाचीही भीडभाड न ठेवता बुद्धजयने जे वास्तव आहे तेच मांडलं आहे. त्याबद्दल त्याचे अभिनंदन. संपूर्ण महाराष्ट्रभर हे पुस्तक पोहचलं पाहिजे. चळवळीच्या घरात हे पुस्तक असलंच पाहिजे. तरुण वर्गाने बुद्धजयच्या पुस्तकाचे वाचन जरूर करावे.  बुद्धजयला भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.



प्राचार्य दिलीप कसबे
वळसंग, जिल्हा सांगली