सत्ता नावाची सुंदरी प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते. ती मोहक तर असतेच असते पण तिची ताकदही फार मोठी असते. तिच्या जोरावर तुम्ही भल्या भल्या लोकांना वाकवू शकता ,आपल्या बोटांवर नाचवू शकता. त्यामुळेच तर मग साम-दाम -दंड-भेद वापरून सत्ता नावाच्या सुंदरीसोबत विवाह करण्यास नवरदेव उत्सुक असतात. केंद्राची सत्तासुंदरी सध्या नरेंद्राच्या ताब्यात आहे तर महाराष्ट्राची सत्तासुंदरी देवेंद्रच्या ताब्यात आहे. स्थानिक पातळीवरची सत्ता सुंदरीही नुकतीच नरेंद्र, देवेंद्र यांच्या घराण्यातच नांदायला गेली आहे. सत्ता सुंदरी आपल्याच घराण्यात यावी यासाठी देवेंद्रने चांगलाच जोर लावला होता. त्यासाठी प्रसंगी गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची ताकद वाढवली.त्यांच्या कष्टाचे चीजही झाले असेच म्हणावे लागेल.
आम्ही बहुजन, दलित मात्र या सत्तासुंदरी सोबत अजूनही विवाह करू शकलो नाही. आमची ताकद नाही अशातला भाग नाही. आम्ही आमची ताकद दुसऱ्यांच्या वरातीत नाचण्यात घालवत आलो आहोत. आणि त्याबद्दल आमच्या नेते नावाच्या नवरदेवाला कसल्याही प्रकारची लाजही वाटत नाही हे सुद्धा विशेष. कालपर्यँत आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरातीत भान विसरून नाचत होतो आणि आज भाजपच्या वरातीत नाचत आहोत. दुसऱ्याच्या वरातीतच नाचण्यात आम्हांला धन्यता वाटते. सत्तासुंदरी आमच्या बळावर मिळवण्यासाठी आम्ही कसलाच प्रयत्न करीत नाही. डिजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग असतात आम्ही पण त्याच प्रमाणे पैशाच्या तालावर आणि दारूच्या नशेत पार गुंग होऊन नाचत असतो.
आमची काही विद्वान लोक म्हणतील की भाजप मधून पण आमचे लोक, आमच्या जातीची माणसं निवडून आलीच आहेत की. आमचे वाघ आता डरकाळ्या फोडणार आहेत... वगैरे वगैरे. अहो, विद्वान लोकहो सत्ता कोणत्या पक्षाची आहे ? तुमचे स्थान त्या पक्षात काय आहे ? आमचे वाघ स्वतःचे हक्काचे घर सोडून दुसऱ्याच्या महालात गेले आहेत पण ते त्याचे मालक नाहीत तर त्याचे आश्रित आहेत. वेळ संपताच तुमच्या उमेदवाराला लाथा मारून बाहेरही काढतील. तुम्ही वाघ असा अगर अजून कोणी तुम्हाला त्यांच्या घरात शेळी बनूनच रहावं लागेल त्याच काय ? भाकरी पेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या असे सांगणारा महामानव आमचा बाप आहे असे आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून माईक वर सांगतो. आणि स्टेज वरून खाली येताच पुन्हा लाचारी करायला मोकळे होतो. बाबासाहेबांचे नाव घेऊन, त्यांचा फोटो घेऊन आमचे नेते बाबासाहेबांना दिवसाढवळ्या विकत आहेत आणि आम्ही पण अश्याच नेत्यांना निवडून देऊन " खरकट्या हातात निळा झेंडा घेऊन, उष्ट्या तोंडाने " जय भीम म्हणत आहोत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही.
खरं तर यावेळेस सत्ता सुंदरी आमच्यावर फिदा झाली असती. कोणतीही सुंदरी असो ती ताकदवर माणसाच्या प्रेमात पडते. सत्ता सुंदरीचं पण तसच आहे. या निवडणुकीत मुळातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गांगरून गेले होते. शक्तीहीन झाल्यामुळे ते दिशाहीनही झाले होते. त्यामुळे सत्तेच्या स्वयंवरातील दोन स्पर्धक आपोआपच गार झाले होते. आणि राहिलेले दोन आपापसात भांडत होते. त्यामुळे आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून "तिसरी आघाडी" करून आमचा खंबीर, तगडा नवरदेव रिंगणात उभा करायला हवा होता. यावेळी आम्ही नवरदेवचं उभा केला नाही मग काय डोंबल्याचं लग्न होणार? लेचे पेचे उमदेवार तेही बेकीच्या ताकदीवर उभे राहिले आणि सपाटून पडले . आता फक्त दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं. " कष्ट करायचं ,उष्ट खायचं " एवढेच काय ते आमचे जीवन.
याला जितके नेते कारणीभूत आहेत तितकीच कारणीभूत आमची जनता आहे. ५ वर्षे शरद पवारला नाव ठेवायची, ५ वर्षे नरेंद्र मोदीला नाव ठेवायची, ५ वर्षे देवेंद्र फडणवीसला नाव ठेवायची आणि बरोबर मतदानाच्या दिवशी पुन्हा त्यांनाच मतदान करायचे. हा निव्वळ बकवासपणा आहे असे आम्हास वाटते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आमच्या राष्ट्रीय पक्षाच्या आणि त्याच प्रमाणे स्थानिक आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारांना किती मते पडली ? केवळ ५००, ७०० च्या घरातच आम्हाला मते मिळाली आहेत. समोर आपला नवरदेव असताना दुसऱ्याच्या नवरदेवाला कसं काय आमच्या लोकांनी घोड्यावर बसवलं समजायला वाव नाही. समाजाने आता ज्यांना घोड्यावर बसविले आहे त्यांच्या "गाढवलाथा" वेळ येताच मिळतीलच. विकला न जाणारा नेता निर्माण करण्यासाठी विकला न जाणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे हेच आम्ही मुळात विसरून गेलो आहोत. विकल्या जाणाऱ्या आणि आंधळेपणाने मतदान करणाऱ्या आमच्या समाजबांधवांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या , प्रामाणिकपणे आंबेडकरी पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांचा हिरेमोड होत आहे. त्यांचे खच्चीकरण होत आहे.
आमच्याकडे ताकद आहे. कष्ट करण्याची वृत्ती आहे. वेळप्रसंगी पैसाही खर्च करू शकतो. मग आमच्या कष्टातून, आमच्या पैशातून दुसऱ्याची बायको आम्ही का नटवायची ? आम्ही आमचीच बायको नटवू शकणार नाही का ? दुसऱ्याची बायको नटवून आम्हांला काय मिळणार आहे.? त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही आमचीच बायको नटवू , सत्तासुंदरी सोबत आम्हीच विवाह करू त्यासाठी आता पासूनच तयारीला लागणे ही काळाची गरज आहे.
बुद्धजय भालशंकर (भीमटोलाकार)
सोलापूर
मो. ९९६०३७२७३६
(सा.बहुजन आवाजच्या २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २०१७ या अंकात प्रकाशित )






