Monday, February 20, 2017

अशी ही बनवा बनवी.

                 
 
  मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय मनोरंजनात्मक सिनेमा म्हणजे 'अशी ही  बनवा बनवी'. हसून हसून बेजार करायला लावणारा हा चित्रपट आज ही टीव्हीवर लागला की आवर्जून पाहिला जातो. पुरुष असूनही स्त्री भासवून राहण्यासाठी जागा पटकावली जाते आणि त्यातून घडणारे मजेशीर किस्से या चित्रपटात आहेत.  अभिनय कसा करायचा हे या चित्रपटाकडून शिकावे लागेल. मुळातच तुम्ही वेगळे आहात पण काही तरी मिळवण्यासाठी तुम्हांला संपूर्णपणे बदलावे लागते. प्रसंगी पुरुषाची स्त्री सुद्धा व्हावं लागतं. आता या सिनेमाची आठवण अशी मध्येच का झाली ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  या चित्रपटाची आठवण होण्याचं कारण म्हणजे सध्या आमच्या आणि तुमच्याही आजूबाजूला हा चित्रपट घडत  आहे. आणि दर पाच वर्षांनी हा चित्रपट पुन्हा आपल्या वास्तव जीवनात घडत असतो. निवडणुकीच्या हंगामात हमखास आम्हांला 'बनवाबनवी' ची प्रचिती येते. 
       सध्या स्थानिक निवडणुकीसाठी 'बनवाबनवी' ची पात्रे ज्यांना निवडणूक भाषेत 'उमेदवार' असे म्हटले जाते.  तर या उमेदवारांचा अभिनय पाहून तर आम्हांला बुवा हसायलाच येत.  अतिशय भारी मनोरंजन आमचे सध्या होत आहे.(मनोरंजनाची सोय केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार ) या उमेदवारांच्या चेहऱ्यावरील भाव, बोलण्यातील नम्रता, हात जोडणे काय, जेष्ठ व्यक्ती दिसली रे दिसली की पाया पडणे काय? बिचाऱ्या जेष्ठ नागरिकांची किती पंचायत होत आहे. कोण कधी येईल आणि पाय धरेल याचा नेम नाही. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. आणि आशीर्वाद तरी किती जणांना द्यायचा.?   उमेदवार  पण इतकं नम्र बोलत आहेत की 'सदाशिव पेठेतील' मराठी पण फिकी पडेल.  ताई, आई ;लक्ष असू द्या. आजी तुमची सेवा करायची संधी द्या. ( खरं तर 'मेवा खायची' साधी द्या) . आमचंच  बटण दाबा. आमच्या पक्षाला मत म्हणजे विकासाला मतं  ( 'डोंबल्याचा विकास?'  आजीच्या मनात येणारा विचार).  आम्ही निवडून  आलो की तुमच्या प्रभागाचा विकास करू. असे ठरलेले डायलॉग प्रत्येक उमेदवार मारतो.खरंतर आता हे डायलॉग खूप बोअर झाले आहेत पण तरीही या डायलॉगचा मोह उमेदवारांना सुटत नाही.
    आमच्या सोलापुरात इतकी भारी अभिनय संपन्न व्यक्ती आहेत हे पाहून आमची छाती ५६ इंचाची झाली आहे. विकासाची भाषा प्रत्येकाच्या तोंडी आहे, त्यामुळे  सोलापूर आता 'स्मार्ट' होऊन सिंगापूरला पण मागे टाकतं का काय अशी स्वप्नं आम्हांला या नेत्या मंडळींची भाषणं ऐकून दिवसाढवळ्या पडत आहेत.  इतका जबरदस्त अभिनय हे लोक करत आहेत. सोलापूर म्हणजे ' आबे तुबे ची भाषा. बोलण्यात एक करारीपणा'. पण ही भाषा निवडणूक काळात एकदम गायब . आता अतिशय सौम्य अशी भाषा उमेदवारांच्या तोंडी बघून चमत्कार झाल्याचा भासच आम्हांला होत आहे. या आनंदाच्या भरात पटकन सदाशिव पेठेत जावे एक शेंडीवाला पकडावा आणि त्याला म्हणावं ," चलं सोलापुरात आता शुद्ध भाषा ही तुझी मक्तेदारी राहिली नाही.बघ आमचं सोलापूर कसं भाषेच्या बाबतीत चकचकीत झालं आहे ".  निवडणुकीतील अनेक उमेदवारांना आपण हरणार आहोत हे चांगलेच माहित असतं.  पण तरीही त्यांच्या बोलण्यात, चेहऱ्यावर ते मुळीच जाणवू देत नाहीत.  त्यांचा चेहऱ्यावर विजय आमचाच होणार अशी भावना असते. असा अभिनय केवळ निडणुकीतील उमेदवारच करू शकतो. त्यामुळे आम्ही ठरवले आहे या लोकांची शिफारस सरळ ऑस्कर समितीकडे करायची. भारताला खरंच अभिनयाचं ऑस्कर मिळून जाईल.      
         मतदारांना खुश करण्यासाठी मोफत वाय फायचे स्वप्न दाखवण्यात येत आहे. काही जणांना पार्टी देण्यात येत आहे. पार्टी पण मग ओली सुकी दोन्ही प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीतील 'बनवा बनवीच्या' सिनेमाने मात्र अर्थव्यस्थेला चालना दिली आहे. नोटबंदीनंतर सर्वच त्रस्त झाले होते. लोकांना आता रोजगार भेटला आहे. खायची प्यायची सोय झाली आहे. बाजारात पैसा येत आहे. बकऱ्या ,कोंबड्याच्या भाव वाढला आहे. हॉटेल मालकांचा धंदा जोरात चालू आहे. रॅलीच्या माध्यमातूनही नवी ' रोजगार निर्मिती ' होत आहे. मनरेगा पेक्षा अतिशय फायदेशीर आणि कष्ट न करता रोजगार मिळतो, खायची प्यायची सोयही होते. त्यामुळे प्रत्येकजण यात हात धुवून घेत आहे.
        ‘बनवा बनवी’ मध्ये सध्या राज्यात सेना भाजपवाले आघाडीवर आहेत.  भलेही सत्तेमध्ये भागीदार असले तरी यांचे अजून प्रेम जुळून आले नाही. संसाराला अडीच वर्षे होत आली तरी यांच्या कुरबुरी मिटल्या नाहीत. विधानसभेच्या वेळीस यांनी अतिशय भारी परफॉर्मन्स अभिनयात दिला होता. एकमेकांवर काय चिखलफेख केली होती.  (आणि जनतेच्या डोळ्यांत धूळफेखही) . इतिहासचं या लोकांनी उकरून  काढला होता. अफजलखानाच्या फॊजा काय ? वेगवेगळी विशेषणं एकमेकांना वापरून समोरच्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याच  अफजलखानाच्या फोजा सोबत मौजा मारताना जनाची नाही पण मनाचीही यांनी ठेवली  नाही.  सध्या काहीजण औकात दाखवण्याची भाषा करीत आहेत. मातोश्रीवाले म्हणत आहेत की भाजप गुंडाचा पक्ष आहे तर नागपूरवाले म्हणत आहेत शिवसेना खंडणीखोरांचा पक्ष आहे. एकमेकांची उणीधुणी जाहीररित्या काढली जात आहे. प्रचाराची भाषा पार रसातळाला गेली आहे. खंडणीखोर, गुंड मग एकमेकांना साथ का देत आहेत?  इतकाच तिटकारा आहे तर मग सत्ता का सोडत नाहीत? सत्ता यांना सुटणार नाही.  आता हे एकमेकांना शिव्या देत आहेत पण निवडणुका झाल्या आणि गरज पडली तर पुन्हा एकमेकांना मिठ्या मारतील. एकमेकांचे गोडवे गातील. 
       उमेदवारांच्या सोबतच मतदारांचा अभिनय पण जबरदस्त असतो. प्रत्येक उमेदवाराला आश्वासन दिले जाते, आमचं मत तुम्हालाच. काळजी करू नका तुम्ही. या वेळीस तुम्हीच ‘भाऊ नगरसेवक’. आपल्याच वहिनी निवडून येणार. चिंता नसावी. आमच्यासहित आपण प्रत्येकाने आपल्या भागातील उमेदवारांना हेच आश्वासन दिले आहे हे आम्ही जाणतोच. शेवटी मत ज्याला द्यायचे त्यालाच दिले जाणार आहे.
         उमेदवार कितीही अभिनय करो, तो  अभिनय किती खरा किती खोटा हे  ठरवणारा असतो तो  मतदार.  कुणाला पाडायचे कुणाला निवडून द्यायचे हे मतदार नावाची समीक्षा यंत्रणा ठरवत असते. आत्ताचे मतदार हे अतिशय सुज्ञ झाले आहेत. कोण ढोंगीपणाने वागत आहे आणि कोण तळमळीने बोलत आहे हे आता मतदार लगेच ओळखतात. बनवा बनवीच्या चित्रपटाला किती यश मिळवून द्यायचं हे मतदार राजा ठरविणार आहे. भल्या भल्या मात्तबरांना पाणी पाजण्याची किमया मतदार राजाने केली आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे निकाल लागण्याची शक्यता सध्या जास्त आहे. हा लेख वाचेपर्यंत तुम्हांला  उमेदवारांच्या बनवा बनवीचा आणि त्याला मतदारांनी दिलेला प्रतिसाद काय आहे याची प्रचिती आली असेल. अनेक ठिकाणी धक्कादायक निकालही आले असतील. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. किती ही बनवा बनवी केली तरी आपले पितळ उघडे पडणारच आहे मग तो चित्रपट असो किंवा वास्तवातील जगणं असो.
     बनवा बनवीचा नाद सोडून जोपर्यंत निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नावर लढवली जाणार नाही तो पर्यंत आमची लोकशाही यशस्वी होणार नाही.   उमेदवारांनी कितीही  ' बनवा बनवी' करू द्या शेवटी कुणाला निवडायचे हे सुज्ञ मतदार जाणून आहे. त्यामुळे सध्या तरी आम्ही  या बनवाबनवीचा आनंद लुटत आहोत तुम्हीही लूटा. टेन्शन घ्यायचं काम आपलं नाही ते उमेदवाराचं आहे. त्यामुळे सध्याच्या आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतील उमेदवाराच्या मनातील ओळी आम्ही देत आहोत   ------
      " बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, 
        साडी अशी नेसू आणि गालावरी  हसू
         ज्याला जसे हवे तसे, तसे दिसू, 
          भीती वाटे मला कि कुठेतरी फसू 
          बनवा बनवी अशी ही बनवा बनवी "
बुद्धजय भालशंकर 
मो. नं. ९९६०३७२७३६
                 

No comments:

Post a Comment