काही दिवसापूर्वी
तीन बेरोजगार तरुणांनी रेल्वेखाली
जीव देण्याचा प्रयत्न
केला होता त्याची बातमी पेपर
मध्ये वाचली असेल.
किती जणांना फरक
पडला माहित नाही.
रोजगार भेटला काय किंवा
नाही भेटला काय
जातीची आणि धर्माची
अस्मिता टिकली पाहिजे. त्यासाठी
आम्ही तत्पर आहोत.
नोकऱ्या शिक्षण नंतर कधी
तरी बघू. जागृत असणाऱ्या काही
तरुणांनी आपल्या नोकऱ्यांसाठी वर्षभरापूर्वी
दिल्लीत मोर्चा काढला होता.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही प्रत्येक
जिल्ह्यात बेरोजगारांचे मोर्चे निघाले होते.
रोजगार न मिळण्यामागे
अनेक कारणे आहेत. प्रत्येक
कारणावर याठिकाणी लिहणे शक्य
नाही. सर्वात जास्त
चीड ज्या कारणावर आहे
त्या कारणावर लिहण्याचा
प्रयत्न केला आहे. वशिलेबाजी
! सगळ्यात महत्वाचा फॅक्टर नोकरीला
लावणारा आणि नोकरी
नाकारणाराही. टॅलेंट असणारी मुले
प्रवाहाबाहेर आहेत तर
ज्यांची शिपाईही व्हायची लायकी
नाही ते मोठ्या
पदावर आहेत. प्रत्येक
क्षेत्रांत नोकरी मिळवण्यासाठी वशिला
किंवा पैसे फेकावा
लागतो. इतर क्षेत्रात
नोकरीसाठी थोडंफार कौशल्य असावं
लागतं तरच वशिलेबाजीवर
मिळालेली नोकरी टिकवता येते.
उदाहरण म्हणून कारखानदारी क्षेत्र
घेता येईल. मशीन
चालवता येत नसेल
तर नोकरी
मिळून पण काही
फायदा नाही.
इतर क्षेत्राप्रमाणेच
शिक्षण क्षेत्रातही वशिलेबाजीचा शिरकाव
झाला. आता तर
खाजगी शाळेत नोकरी
हवी असेल तर
खिसा मोठा हवा
किंवा वरदहस्त. शिक्षणाची
गंगा वंचित वर्गाच्या
दारापर्यंत आणणारे कर्मवीर भाऊराव
पाटील सारखे शिक्षणमहर्षीं
कुठे आणि आजचे
बाजारू शिक्षण महर्षी कुठे?
शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी खाजगी शिक्षण
संस्थांना शासनाने परवानगी दिली.
पण यातून वंचित
वर्गाचे सबलीकरण होण्याऐवजी अनेक
सत्तासम्राट बाहुबली निर्माण झाले.
आपापली सत्तास्थाने बळकट करण्यासाठीच
या शिक्षण संस्थाचा
उपयोग करण्यात आला
आणि करण्यात येत
आहे. समाजाची सेवा
करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या
संस्था कधी प्रायव्हेट
कंपन्या बनल्या हे समजलंच
नाही. पोरं,बाळ
, नातेवाईक,सगेसोयरे,मित्रमंडळीच्या लेकरांची
रोजगार हमी योजना
म्हणजे शिक्षण संस्था. इतर
ठिकाणी थोडंफार कौशल्य लागत
हे आम्ही वर
नमूद केलं आहे
पण शिक्षण संस्थेत
तशी गरज नाही.
कारण इथे तुम्हीच
मालक असता. सत्ताधीश
असता. त्यामुळे तुम्हाला
नियम लागू होत
नाहीत. तुमची कामं करण्यासाठी
इतर लोक असतात.
त्यात जबाबदारी निश्चित
नाही. त्यामुळे कारखाना
किंवा सरकारी खात्यात
प्रत्येक टेबलावर काम करणाऱ्या
व्यक्तीचं आउटपुट
काय हे तपासलं
जात. इथे
ही भानगड नाही. निकाल
१००% लागला काय
किंवा ५० % लागला
काय पगार
मिळायचा तो मिळणारच.
शाळा बंद पडली
तरी इतर शाळेत
समावेशन होतं. प्रत्येक शिक्षक
असे वर्तन करतोय
असे आम्ही म्हणत
नाही. वशिलेबाजीवर आलेल्या
किंवा कुणाच्या तरी
आशीर्वादावर जगत असलेल्या
शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकापासून
ते कर्मचाऱ्यापर्यंतचे वर्तन
एकंदरीत असेच आहे.
बिनारांगेची नोकरी मिळाल्यामुळे त्याची
किंमत नाही. खिसा
जसा जसा गलेलठ्ठ
होत गेला तशी
तशी चरबी वाढल्याने
मन, शरीर सुस्त
झाले त्यामुळेच मग
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत
मराठी टक्का घसरला.
कारण ज्ञानदान करणे
म्हणजे केवळ पुस्तक
वाचून दाखवून स्वाध्याय
सोडवायला लावणे हाच अर्थ
यांनी घेतला.
काही जण
दहावीचा निकाल पुढे करून
आपला बचाव करतील
परंतु ती परीक्षा
पाठांराची असते. ज्ञानाची नसते.
गुणवत्ता तपासायची असेल तर
बुद्धीच्या परीक्षा असणाऱ्या वेगवेगळ्या
शिष्यवृत्या परीक्षा किंवा नवोदय
मध्ये निवड होणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या संख्येवरून तपासा. दहावीचा
१०० % निकाल
लावणाऱ्या शाळेपेक्षा ५०% शिष्यवृत्तीचा निकाल लावणारी शाळा
गुणवत्तेत वरचढ ठरेल.
चित्रकला,खेळ,साहित्य,नृत्य इत्यादि कला
प्रकारात प्राविण्य संपादन करणारे
विद्यार्थी गुणवंत ठरतील. ती
शाळा आदर्श ठरेल. शिक्षण
क्षेत्रात फोफावणाऱ्या वशिलेबाजीमुळे काही
जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला असेल.
परंतु भविष्यातील विद्यार्थ्यांचा
पोटापाण्याचा प्रश्न अधिक गंभीर
बनला आहे. कारण
यांना पाठांतर करण्याचं
शिक्षण मिळालं , संकल्पना नीट
कळाल्या नसल्यामुळे ही पोरं
व्यवहारात मागे पडू
लागली आहेत.
शिक्षण क्षेत्रातील बाहुबली
अधिक बलवान आहेत.
त्यांनी गुणवंत उमेदवारांना विना
वशिलाची आणि केवळ
परीक्षा फी भरून
नोकरी मिळण्याची शाश्वती
देणारी शासनाची "पवित्र" प्रणाली नुकतीच कोर्टात
जाऊन हाणून पाडली.
शिक्षक नेमण्याचा शासनाकडे जाणारा
अधिकार त्यांनी आकाशपाताळ एक
करून स्वतःकडे ठेवला.
यामागील उघड गुपित
सर्वाना माहीतच आहे. शिक्षणामुळे
समाज शिक्षित होतो
परंतु गरज आहे
ती सुशिक्षित नागरिकांची.
आणि हे काम
फक्त तळमळ असणारा
शिक्षकच करू शकतो.
ज्या माणसाने आयुष्यत
कष्ट करून नोकरी
मिळवली आहे तोच
शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस झटतो. शाळा
राष्ट्र घडविणारी प्रयोगशाळा आहे.
परंतु सद्यस्थितीत शाळा
बेरोजगारांची निर्मिती करणारा कारखाना
बनली आहे. हे चित्र
बदलायचे असेल तर
गरज आहे कष्ट
करणाऱ्या आणि अंगात
विविध कला गुण असणाऱ्या आणि
मेंदूचा कौशल्याने वापर करून
राष्ट्राची जमीन सुपीक
करणाऱ्या शिक्षकाची.
समाजाची सुद्धा जबाबदारी
वाढली आहे. कारण
अनेक पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली
तर त्यात वशिलेबाजी
हेच कर्तृत्व असणाऱ्या
नरांची नावं असतात.
अश्याच रत्नांचा कृत्रिम प्रकाश
सगळीकडे पसरत आहे.
त्याला वेळीच आवर घाला.
शाळेत काय चाललंय
हे आपल्या पाल्याकडून
समजून घ्या. चांगल्या
शिक्षकांचा हट्ट संस्थेकडे
धरा. तो तुमचा
हक्क आहे. गुणवत्ता
असणारी पोरं
जनावरांचं शेण काढत
असतील आणि मार्च
ऑक्टोबरच्या वाऱ्या करून दहावी
पास झालेली ,धड नीट
वाचताही न येणारी
पोरं वशिलेच्या जोरावर
जर शिक्षक म्हणून
वर्गात उभी राहत
असतील तर मित्रांनो
घोड्यांची शर्यत गाढव जिंकू
लागले आहे. तुम्हीच
सांगा समाजाची आणि
शिक्षण क्षेत्राची वाटचाल योग्य
दिशेने चालू आहे
असे कसे म्हणता
येईल?
बुद्धजय भालशंकर
मो. ९९६०३७२७३६
(सा. बहुजन आवाज ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१८ च्या अंकात प्रकाशित )


