Friday, March 9, 2018

बायकांनी बायकांमधल्या पुरुषाला झिडकारावं

     चार दिवसांपूर्वी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने समाजातील कर्तबगार महिलांचा सत्कार अनेक ठिकाणी केला गेला. काही महिला भगिनींची भाषणे आम्ही ऐकली,वाचली. अनेकजनींनी माझ्या नवऱ्याने,सासू सासऱ्यानी मला शिकायला परवानगी दिली. नोकरी करायला परवानगी दिली म्हणून त्याबद्दल आभार प्रदर्शन केले. आम्हांला याचे फार वाईट वाटले. कारण अजूनही स्त्री ही  पुरुषसत्ताक व्यवस्थेची मानसिक गुलाम आहे हेच दिसून येते. कारण शिक्षणासाठी,नोकरी करण्यासाठी जर नवऱ्याची, सासू सासऱ्याची परवानगी लागत असेल तर तुम्ही स्वतंत्र कसे? ज्याप्रमाणे सुनबाई सासरबद्दल आभारप्रदर्शन करते तसेच आभार प्रदर्शन कोणत्या जावयाने केले आहे काय? कोणता जावई आपल्या भाषणात असे म्हणतो की , "माझ्या सासू सासऱ्यानी मला परवानगी दिली म्हणून मी लग्नानंतर नोकरी करू शकलो. त्यामुळे माझे आजचे यश आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."
    मोठ्या धुमधडाक्यात महिला दिन साजरा झाला. फोटोसेशन झाले. पेपर मध्ये बातम्या आल्या. पण हा महिला दिन खोटा होता असे आमचे ठाम मत आहे.(बोटावर मोजण्या इतके सोडले तर) लिंग समानतेचा जयघोष प्रत्येकाच्या भाषणात होता. पण खरंच लिंग समानता (Gender Equality )आहे? काही लोक मोठ्या फुशारक्या मारत म्हणतात,"आम्ही बुवा मुलगा मुलगी भेद करत नाही. जे मुलाला तेच मुलीला. आम्ही मुलीला शिक्षण देतो मुलासारखं". आम्ही या लोकांचे कौतुक करून त्यांना विचारू इच्छितो की मग तुम्ही मुलीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार देता काय? त्यांना मनासारखे कपडे घालण्याचा अधिकार आहे काय? त्यांना कसं हसायचं कसं बसायचं हे तुम्ही शिकवता काय? नुसते शिक्षण दिले म्हणजे आम्ही लिंग समानता मानतो असे नव्हे. मुळात ती सुद्धा माणूस आहे. जे अधिकार पुरुषाला आहेत तेच तिला आहेत हे मान्य करणं आणि ते तिला मिळवून देणे ही खरी लिंग समानता. आणि यासाठी भांडणे हा खरा पुरुषार्थ होय. 
    स्त्रीला गुलाम केलं ते इथल्या पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने.याच समाजव्यवस्थेने विवाहसंस्था जन्माला घालून स्त्रीची गुलामी घट्ट केली. मुलाला विचारलं जात तुला मुलगी पसंद आहे का? पण मुलीला तो ही अधिकार नाही. आईबाप, पाहुणे जे म्हणतील त्याच मुलासोबत तिला लग्न करावं लागतं. थोडं विषयांतर करून आम्ही प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचं उदाहरण देऊ इच्छितो. त्यांनी त्यांच्या मुलांना बजावून सांगितलं की,"तुमच्यासाठी मुलगा/मुलगी मी बघणार नाही. ते तुमचं तुम्ही बघा. कारण जर तुम्ही तुमचा जोडीदार निवडू शकत नसाल तर तुम्ही अजून सज्ञान झाला नाहीत". त्यामुळे जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं असं आम्हांला वाटत.  पण आमच्या व्यवस्थेने हे स्वातंत्र्य दिले नाही. आमची विवाहव्यवस्थाच मुळात थोतांड आहे. कारण ही व्यवस्था निर्माण करण्यात आली ते केवळ स्वार्थ साधण्यासाठी. धर्मव्यवस्था, जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी. आमची विवाहसंस्था दोन जीवांचे मिलन करण्यापेक्षा धर्माचा,जातीचा पगडा कसा अबाधित राहील याचसाठी कार्यरत असते. त्यामुळे जातीबाहेर धर्माबाहेर येथे लग्न करणे म्हणजे मोठे दिव्य काम करण्यासारखे आहे.पोराने जातीबाहेर लग्न करण्याचा हट्टच धरला तर समजूतदार आई बाप म्हणतात, " अरे आम्हांला काहीच अडचण नाही. पण लोक काय म्हणतील?" ही खरं तर सरळ सरळ त्यांची पळवाट असते.  
   गुलाम आणि मालक अशी व्यवस्था याठिकाणी निर्माण करण्यात आली. स्त्री ही गुलाम तर पुरुष तिचा मालक आहे. वेगवेगळी आमिषे दाखवून तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात मात्र ते तिला समजतही नाही.लग्न झालेल्या मुलीने साडीतच रहायचं. डोक्यावर पदर घ्यायचा. ही बंधने का? कश्यासाठी? मंगळसूत्र, पायातील जोडवी, सोन्याचांदीचे दागिने या गुलामगिरीच्या शृंखलांनी तिच्या 'गुलामीचा खुट्टा' मजबूत केला गेला. पुरुषाला अश्या पद्धतीची व्यवस्था का नाही हा प्रश्न आम्हाला पडतच नाही.संसारात बलिदान द्यायचे ते फक्त तिनेच. राब राब राबायचे तिनेच.  खर्चासाठी नवऱ्याकडे १० रुपयांसाठी सुद्धा तिला हात पसरावे लागतात. बरं ते सहज मिळतात असं ही नाही. "रोज दिलेले पैसे काय करतेस? आताच घराबाहेर जाताना पैसे मागतेस. अक्कल नाही का तुला?" अश्या पद्धतीचं 'ज्ञान' तिला नवऱ्याकडून ऐकावं लागत. ' हाऊस वाइफ' या गोंडस नावाखाली तिला उष्टी ,खरकटी काढण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्यासाठी आम्ही तिला वापरून घेत आहोत.  ' हाऊस वाइफ' मान्य असणाऱ्यांना 'हाऊस हजबंड'नावाची संकल्पना चालेल काय?      
       सामाजिक बंधने ,रूढी पाळण्याचा सर्वात मोठा हट्ट महिलांकडूनच केला जातो. बाईने बाईला साथ द्यायच्या ऐवजी तीच तिची मारेकरी झाली आहे हे सर्वात मोठे दुर्देव आहे. या मागचं एकच कारण पुरुषसत्ताकव्यवस्था त्यांच्या नसानसात भिनली आहे. त्यामुळे आमचे आवाहन आहे की जर  तुम्हांला स्वातंत्र हवे असेल तर आधी तुमच्या मधल्या पुरुषाला झिडकारा. तुम्ही सुद्धा माणूस आहात आणि मनासारखे जगण्याचा अधिकार आम्हांलाही आहे हे स्वतःच्या मनावर बिंबवा. भारतीय संविधान तुमचा सोबतीला आहेच. ज्यादिवशी बायका स्वतःमधील पुरुषाला झिडकारतील तो त्यांचा खरा महिला दिवस असेल.
- बुद्धजय भालशंकर
    भीमटोलाकार
     मो.९९६०३७२७३६
(सा.बहुजन आवाजच्या १२ मार्च ते १८ मार्च २०१८ या अंकात प्रकाशित)

No comments:

Post a Comment